बिनधास्त प्रेमाला फ्रेंच तडका! (बेफिक्रे)

महेश बर्दापूरकर
शनिवार, 10 डिसेंबर 2016

आदित्य चोप्राचा "बेफिक्रे' हा चित्रपट जबरदस्त सरप्राइज पॅकेज आहे. हलकी फुलकी कथा, चटपटीत संवाद, पॅरिसमधील लोकेशन्स आणि रणवीर सिंग आणि वाणी कपूरची जमलेली केमिस्ट्री यांच्या जोरावर चित्रपट फूल टू करमणूक करतो. आदित्य चोप्रानं एक लव्ह स्टोरी सांगताना उगाच सेंटिमेंटल होण्याचा, डोस पाजण्याचा प्रयत्न टाळला आहे. कथा आणि शेवट खूपच अपेक्षित असला, तरी मांडणीसह सर्वच गोष्टी जुळून आल्यानं बिनधास्त प्रेमाचा हा फ्रेंच तडका परफेक्‍ट जमला आहे. "बेफिक्रे'ची कथा सुरू होते पॅरिसमध्ये. धरम (रणवीर सिंग) हा दिल्लीत स्टॅंडअप कॉमेडिअनचं काम करणारा युवक नशीब आजमावण्यासाठी पॅरिसमध्ये दाखल होतो.

आदित्य चोप्राचा "बेफिक्रे' हा चित्रपट जबरदस्त सरप्राइज पॅकेज आहे. हलकी फुलकी कथा, चटपटीत संवाद, पॅरिसमधील लोकेशन्स आणि रणवीर सिंग आणि वाणी कपूरची जमलेली केमिस्ट्री यांच्या जोरावर चित्रपट फूल टू करमणूक करतो. आदित्य चोप्रानं एक लव्ह स्टोरी सांगताना उगाच सेंटिमेंटल होण्याचा, डोस पाजण्याचा प्रयत्न टाळला आहे. कथा आणि शेवट खूपच अपेक्षित असला, तरी मांडणीसह सर्वच गोष्टी जुळून आल्यानं बिनधास्त प्रेमाचा हा फ्रेंच तडका परफेक्‍ट जमला आहे. "बेफिक्रे'ची कथा सुरू होते पॅरिसमध्ये. धरम (रणवीर सिंग) हा दिल्लीत स्टॅंडअप कॉमेडिअनचं काम करणारा युवक नशीब आजमावण्यासाठी पॅरिसमध्ये दाखल होतो. मित्राच्या "दिल्ली बेली धाब्या'वर भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची नोकरी त्याला मिळते. पॅरिसमध्ये मनसोक्त जगायचं, प्रेमात पडायचं असं आधीच ठरवून आलेल्या धरमची भेट पहिल्याच दिवशी शायराशी (वाणी कपूर) होते. प्रेमात अनेक टक्के-टोणपे खाल्लेल्या शायराला पुन्हा हा प्रयोग करायचा नसतो, धरम मात्र तिच्या प्रेमात पडतो. दोघं काही काळ एकत्रही येतात, शायरानं लावलेल्या पैजांमुळं धरमची पळता भुई थोडी होते. मात्र, दोघं धमाल आयुष्य जगतात. एका टप्प्यावर दोघंही एकमेकांना कंटाळतात व त्यांच्यात ब्रेकअप होतो. शायराच्या आयुष्यात एक भारतीय बॅंकर येतो, तर धरम पॅरिसमधल्याच एका मुलीच्या प्रेमात पडतो. मात्र, दोघांना एकमेकांच्या सहवासाचं महत्त्व कळतं. मग दोघंही आपल्या "बेफिक्रे' शैलीमध्ये या परिस्थितीवर मात करतात. कशी ते पाहणं हा खूपच मनोरंजक भाग आहे.
चित्रपटाच्या कथेत खरंतर कोणतंही नावीन्य नाही, मात्र दिग्दर्शकानं मांडणीमध्ये कमाल केली आहे. चित्रपट पहिल्या प्रसंगापासूनच छान वेग पकडतो व तो कुठंही कमी न होता कथा तुफान मनोरंजन करीत पुढं सरकत राहते. यासाठी निवडलेले प्रसंग धमाल आहेत. धरम व शायराची पहिली भेट, त्यांचा बिनधास्त वावर, एका हॉटेलमध्ये बॉलिवूड नाइट साजरी करताना उडालेली धमाल, त्यांच्या ब्रेकअपचं कारण व त्यावर दोघांची प्रतिक्रिया, शायराच्या आई-वडिलांबरोबरचं धरमचं वागणं हे प्रसंग भन्नाटच जमले आहेत. हे सर्व पॅरिसमधील नेत्रसुखद लोकेशन्सवर घडत असल्यानं त्याची लज्जत आणखीनच वाढते. दोघांच्या पुनर्मिलनासाठी निवडलेला प्रसंगही दाद मिळवून जातो. थोडक्‍यात, कथेतील नावीन्याचा अभाव दिग्दर्शकानं मांडणी, प्रसंगांची निवड व छायाचित्रणातून भरून काढला आहे. संवाद हे चित्रपटाचं सर्वांत मोठं बलस्थान आहे. प्रेमाला बंजी जंपिंगची उपमा देऊन केलेलं विवेचनही मनोरंजक आहे. चित्रपटातील गाणी कोणताही रसभंग करीत नाहीत. पात्रांची गर्दी व किंवा प्रसंगांचा पसारा न घालता चित्रपट दोन तासांतच संपतो.

चित्रपटाचं सर्वांत मोठं आकर्षण अर्थातच रणवीर सिंग. शाहरुख खाननंतर उत्स्फूर्त आणि एनर्जेटिक अभिनयाची गादी हा कलाकार चालवतोय. (कदाचित त्यामुळं आदित्यनं शाहरुखला सोडून प्रथमच दुसऱ्या अभिनेत्याबरोबर काम केलंय) विनोदाचं छान टायमिंग, रिऍक्‍शन्स, डान्स यांच्या जोरावर तो तुफान मनोरंजन करतो. वाणी कपूरबरोबर त्याची केमिस्ट्री 100 टक्के जुळली आहे. आजच्या पिढीची भाषा बोलणारा आणि खरंतर एकविसाव्या शतकातील रिलेशनशीपचा अंदाज देणारा हा चित्रपट पाहायलाच पाहिजे...(अर्थात फार "सोवळ्या'त असाल, तर मात्र एकदा विचार करा...)

श्रेणी : 3.5
निर्माता, दिग्दर्शक : आदित्य चोप्रा
भूमिका : रणवीर सिंग, वाणी कपूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: French Tadka audacious love! (befikre review)

व्हिडीओ गॅलरी