अल्लड वयातील प्रेमकथा (एफ यू : फ्रेंडशिप अनलिमिटेड )

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 जून 2017

स्टार : तीन 

"एफ यू' अर्थात "फ्रेंडशिप अनलिमिटेड' चित्रपट अपेक्षेप्रमाणे कॉलेजविश्‍वात पाऊल टाकलेल्या टीनएजर्सच्या आयुष्यावर, मैत्रीवर आणि प्रेमावर आधारित आहे. इथली मुलं सुखवस्तू कुटुंबातली आहेत. एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत. कसलीच विवंचना नाही त्यांना. तरुणपणी मुलं कोवळ्या वयात जे जे काही करतात ते आपल्याला सिनेमात दिसतं. अभ्यास सोडून धमाल करणं, मुलींना इम्प्रेस करणं, दारू-सिगारेट पिणं, पीजे मारणं, प्राचार्यांना सतावणं, देखण्या टिचरवर लाईन मारणं अन्‌ पालकांपासून काही गोष्टी लपवणं असे सगळे प्रकार "एफ यू'तले मित्र करतात; मात्र नसानसात भिनलेलं तरुण रक्त त्यांना गोत्यात आणतं अन्‌ आयुष्यभराची शिकवण देतं, असं साधारण कथानक आहे सिनेमाचं. 

सिनेमाचे हिरो-हिरोईन अर्थात साहिल महाजन (आकाश ठोसर) आणि रेवती शास्त्री (वैदेही परशुरामी) एका नाटकाच्या रिहर्सलच्या वेळी पाच वर्षांनी भेटतात नि फ्लॅशबॅकमध्ये कथेला सुरुवात होते. रेवती साहिलच्या कॉलेजमध्ये येते नि तो बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडतो. साहिलचे मित्र गौतम, मकरंद, चिली अन्‌ बिल्ली मग त्याचे लव्ह गुरू होतात. मकरंदचीही प्रेयसी असते. गौतम तर त्यांच्या दोन पावलं पुढे म्हणजे टिचरच्याच प्रेमात पडतो; मग त्यांच्यातल्या गमतीजमती, नाचगाणी, रुसणं-फुगणं, राग-सूड, आई-वडिलांची बोलणी खाणं आणि शेवटी एकमेकांपासून दुरावणं असा प्रवास सिनेमात दिसतो. इथपर्यंत सारं काही तुम्ही अनेकदा मोठ्या पडद्यावर पाहिलं असेल; पण दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सिनेमाला फ्रेश लूक अन्‌ रिच फिल द्यायचा प्रयत्न केलाय. युरोपमधली चांगली लोकेशन्स, स्टायलीश हिरो-हिरोईन अन्‌ त्यांचे ब्रॅण्डेड कपडे दिसतात; पण मनाचा ठाव घेणारी कथा मिसिंग आहे, ही खंत जाणवते. प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालतील, असे संवाद अभावानेच ऐकायला मिळतात. डोळ्यात पाणी आणतील, असे इमोशनल सीनही फारसे नाहीत. सलमान खानने गायलेली "गच्ची', त्याचबरोबर "पिपाणी' आणि "गर्लफ्रेंड कमिनी है' अशी काही गाणी सध्या गाजत असली, तरी एक म्युझिकल ट्रिट देण्याचा प्रयत्न जमून आलेला नाही. हिंदी बोल असलेलं "दर्मिया' गाणं मात्र सुरेल झालंय. 

मात्र पाच मित्रांची धमाल, त्यांचं प्रेमात पडणं, भरकटणं, अडचणीत येणं अन्‌ दुरावणं इथपर्यंतचा प्रवास कमी-अधिक प्रमाणात गंमत आणतो. कोवळ्या वयातल्या मुलांच्या चुकांवर पांघरूण घालणारे, त्यांच्यावर रागावणारे किंवा त्यांना नैराश्‍यात सगळे गुन्हे माफ करून मित्रासारखे आधार देणारे पालकही सिनेमात दिसतात. 
मनोरंजनाबरोबरच नातेसंबंधांबाबत एक संदेश देण्याचा मांजरेकरांचा प्रयत्न त्यातून जाणवतो. वडील-मुलांमधील काही संवाद पुरेसे अन्‌ त्यांच्यातील नातं अधोरेखित करणारे आहेत. इतर संवाद पीजेसारखे असले, तरी टीनएजर्स अशाच भाषेत बोलतात, हे लक्षात घेतलंत तर ते खपून जातात. 

"सैराट'नंतरचा आकाशचा पहिलाच सिनेमा असल्याने उत्सुकता होतीच; पण त्याला फारशी छाप पाडता आलेली नाही. त्याचं नाचणं-दिसणं चांगलंय; पण संवादात "परशा'चीच झलक दिसते. पुढील सिनेमासाठी त्याला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. वैदेहीचा चेहरा फ्रेश आहे. आनंद इंगळे, शरद पोंक्षे, सचिन खेडेकर, बोमन इराणी, अश्‍विनी एकबोटे, मेधा मांजरेकर, भारती आचरेकर आदी प्रमुख पात्रांचा अभिनय सिनेमाची जमेची बाजू आहे. सत्या मांजरेकर, शुभम किरोडिअन, मयूरेश पेम, पवनदीप, माधव देवचक्के, संस्कृती बालगुडे आदी चेहरे लक्ष वेधून घेतात. 
"एफयू'मध्ये अल्लड वयातली प्रेमकथा एका वेगळ्या जॉनरने मांडण्याचा प्रयत्न आहे. नव्या प्रयोगाचे स्वागत करायला हरकत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FU Movie review