पुन्हा एकदा "जोरका झटका' - कहानी 2 (नवा चित्रपट)

महेश बर्दापूरकर
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

"कहानी 2' हा सुजय घोष दिग्दर्शित चित्रपट पहिल्या भागाइतकाच थरारक आहे आणि या भागातही विद्या बालनची भूमिका तेवढीच ताकदीची आहे. एका अन्यायग्रस्त मुलीला स्वतःची ओळख लपवून सांभाळणारी आई आणि मुलीला वाचवण्यासाठीची तिची धडपड याचा थरार चित्रपट मांडतो व पहिल्या भागाप्रमाणंच "जोरका झटका' देतो. नेमकं कथानक आणि संकलन, जबरदस्त चित्रण आणि पार्श्वसंगीत या चित्रपटाच्या जमेच्या बाजू. सर्वांत मोठ्या बाजू अर्थातच सुजय घोष यांचं दिग्दर्शन आणि विद्या बालनचा अभिनय.

"कहानी 2' हा सुजय घोष दिग्दर्शित चित्रपट पहिल्या भागाइतकाच थरारक आहे आणि या भागातही विद्या बालनची भूमिका तेवढीच ताकदीची आहे. एका अन्यायग्रस्त मुलीला स्वतःची ओळख लपवून सांभाळणारी आई आणि मुलीला वाचवण्यासाठीची तिची धडपड याचा थरार चित्रपट मांडतो व पहिल्या भागाप्रमाणंच "जोरका झटका' देतो. नेमकं कथानक आणि संकलन, जबरदस्त चित्रण आणि पार्श्वसंगीत या चित्रपटाच्या जमेच्या बाजू. सर्वांत मोठ्या बाजू अर्थातच सुजय घोष यांचं दिग्दर्शन आणि विद्या बालनचा अभिनय.

"कहानी 2'ची कथा कोलकत्यापासून दूर एका छोट्या गावात सुरू होते. दुर्गाराणी सिंग (विद्या बालन) आपली अपंग मुलगी मिनीसोबत (निशा खन्ना) राहत असते. मिनीची खूप काळजी घेणाऱ्या व तिच्यासाठी सर्वस्व देणाऱ्या दुर्गाराणीला मिनीच्या अपहरणानं मोठा धक्का बसतो. सब इन्स्पेक्‍टर इंद्रजित सिंगकडं (अर्जुन रामपाल) या घटनेचा तपास येतो. तपासात त्याच्या हाती दुर्गाराणीची एक डायरी लागते आणि त्यातून काही धक्कादायक सत्य बाहेर येण्यास सुरवात होते. कोण असते दुर्गाराणी, मिनीचा इतिहास काय असतो, दुर्गाराणी खरी कोण असते, तिचे इंद्रजितशी काय संबंध असतात, मिनीचं अपहरण कोणी केलेलं असतं, मिनीला वाचविण्यात दुर्गाराणी यशस्वी होते अशा अनेक उत्कंठावर्धक प्रश्‍नांची उत्तरं या चित्रपटाच्या खिळवून ठेवणाऱ्या प्रवासात मिळतात.
दिग्दर्शकानं "कहानी'च्या या दुसऱ्या भागात निवडलेलं कथानक खूपच उत्कंठावर्धक असून, पटकथाही तेवढीच ताकदीची आहे. छोट्यात छोटं पात्र लिहिताना लेखक-दिग्दर्शकानं घेतलेले कष्ट दिसतात. वास्तवात दुर्गाराणीच्या आयुष्यातील घटना घडत असताना इंद्रजित तिची डायरी वाचतो व त्यातून तिच्या पूर्वायुष्याबद्दल समजत जातं. या सर्वांची सांगड दिग्दर्शकानं बेमालूमपणे घातली आहे. कथा कुठंही रेंगाळणार नाही अथवा उत्कंठा कमी होणार नाही याची काळजी दिग्दर्शकानं घेतली आहे. कथेच्या ओघात काही प्रश्‍नांची उत्तरं देणं टाळलं असलं, तरी कथा योग्य परिणाम साधतेच. छोट्या घरांतून, गल्ली बोळांतून, पोलिस स्टेशनच्या कोंदट वातावरणातून फिरताना तपन बसू यांचा कॅमेरा जबरदस्त परिणाम साधतो व एक महत्त्वाचं "पात्र' बनून जातो. चित्रपटाचं पार्श्‍वसंगीतही छान परिणाम साधतं.

चित्रपटाचं सर्वांत मोठं आकर्षण अर्थातच विद्या बालनचा अभिनय आहे. दुर्गाराणी सिंग ऊर्फ विद्या सिन्हा हे पात्र तिनं (अर्थात पुन्हा एकदा) भन्नाट उभं केलं आहे. चित्रपटातील सर्व थरार तिच्या चेहरा आणि डोळ्यातून उभा राहतो. अर्जुन रामपालनं साकारलेला सब इन्स्पेक्‍टरही लाजबाव. त्याच्या वाट्याला काही हलके-फुलके प्रसंग आले आहेत व त्यात त्यानं धमाल केली आहे. जुगल हंसराज खलनायकी भूमिकेत शोभून दिसला आहे. इतर अगदी छोट्या छोट्या पात्रांनाही दिग्दर्शक लक्षात राहणारं व्यक्तिमत्त्व देतो. काही ठिकाणी कथेतील ट्‌विस्ट खूपच अपेक्षित असल्यानं थोडी निराशाही होते. पहिल्या भागापेक्षा सरस नसला, तरी हा चित्रपट सुजय घोष आणि विद्या बालनसाठी साठी एकदा नक्कीच पाहायला हवा...
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kahaani 2 review