पद्मावत : प्रेम, संघर्षाचा देखणा काव्यानुभव (चित्रपट परीक्षण)

रविवार, 28 जानेवारी 2018

'पद्मावत' हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट इतिहासाच्या पानातील एक अनोखी शौर्यगाथा, त्यातील तीव्र संघर्ष, अत्युच्च त्याग यांचा देखणा पट सादर करतो.

कथा, पटकथा, छायाचित्रण, भव्य सेट व युद्धाचे प्रसंग, संगीत, अभिनय, दिग्दर्शन आदी सर्वच पातळ्यांवर उजवा असलेला हा चित्रपट खिळवून ठेवतो. दिग्दर्शकानं हा जबरदस्त संघर्ष पहिल्या फ्रेमपासूनच समोर आणल्यानं कथा रेंगाळत नाही व त्यामुळंच प्रेम व संघर्षाचा हा देखणा काव्यानुभव अविस्मरणीय ठरतो 

'पद्मावत' हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट इतिहासाच्या पानातील एक अनोखी शौर्यगाथा, त्यातील तीव्र संघर्ष, अत्युच्च त्याग यांचा देखणा पट सादर करतो.

कथा, पटकथा, छायाचित्रण, भव्य सेट व युद्धाचे प्रसंग, संगीत, अभिनय, दिग्दर्शन आदी सर्वच पातळ्यांवर उजवा असलेला हा चित्रपट खिळवून ठेवतो. दिग्दर्शकानं हा जबरदस्त संघर्ष पहिल्या फ्रेमपासूनच समोर आणल्यानं कथा रेंगाळत नाही व त्यामुळंच प्रेम व संघर्षाचा हा देखणा काव्यानुभव अविस्मरणीय ठरतो 

चितोडगडचा राजा रतनसिंग (शाहीद कपूर) मोत्यांच्या शोधत सिंघल राज्यात आलेला असताना राजकन्या पद्मावतीच्या (दीपिका पदुकोण) प्रेमात पडतो आणि तिला चितोडला आपली राणी बनवून घेऊन जातो. इकडं दिल्लीच्या सत्तेमध्ये रक्तरंजित क्रांती होत अल्लाउद्दीन खिलजी सत्ता काबीज करतो. अत्यंत क्रूरकर्मा आणि कपटी अल्लाउद्दीनला चितोडमधून हद्दपार झालेला एक पुजारी (मूळ काव्यामध्ये पोपट) राणी पद्मावतीच्या सौंदर्याबद्दल सांगतो आणि तो तिला हस्तगत करण्याचा मनसुबा जाहीर करतो. आपलं सैन्य घेऊन चितोडच्या वेशीवर ठाण मांडून बसतो. रजपूत शरण येत नाही हे पाहिल्यावर कट रचत राजा रतनसिंगचं अपहरण करतो. राणी पद्मावती मोठ्या शौर्यानं त्याला दिल्लीतून परत आणते, मात्र डिवचला गेलेला अल्लाउद्दीन आणखी त्वेषानं पुन्हा चितोडगडवर हल्ला करतो...या अनोख्या कथेचा शेवटही तेवढाच अनोखा ठरतो. 

भन्साळींनी मलिक मोहंमद जैश यांच्या मूळ काव्यात अनेक बदल करीत कथा सादर केली आहे. त्यांना (त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच) प्रेमाची उत्कटता आणि त्यातील संघर्ष व समर्पण दाखवण्यात रस दिसतो. कथा तेराव्या शतकातील असल्यानं त्यातील काही प्रथा व परंपरा समजून घ्याव्या लागतात. भन्साळींनी त्या आपल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्नही केला आहे. 

कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची मोठी जमेची बाजू ठरली आहे. रणवीर सिंगनं अल्लाउद्दीनची नकारात्मक भूमिका जबरदस्त साकारली आहे. विचित्र आणि खुनशी स्वभाव आपलं हास्य आणि डोळ्यातून दाखवत तो भूमिकेला मोठी उंची देतो. पात्राला साजेसे अतरंगी नृत्य व संवाद मिळाल्यानं त्याची भूमिका सर्वाधिक प्रभावी ठरते. दीपिका पदुकोणनं निश्‍चयी राणीच्या भूमिकेत छान रंग भरले आहेत. राजावरचं आणि प्रजेवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी तिनंही डोळ्यांचा छान वापर केला आहे. शाहीद कपूरही रतनसिंगच्या भूमिकेत छाप पाडतो. आदिती राव, मलिक गफूरच्या भूमिकेत जिम सर्भ, रजा मुराद यांची कामंही लक्षात राहतात. 

एकूणच, अनेक वादांना तोंड फुटलं असलं तरी हा चित्रपट इतिहासातील एक काव्य भव्यतेनं सादर करीत एक अविस्मरणीय अनुभव देतो. नक्की पाहा. 
 

श्रेणी 4 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Padmavat Movie Review by Mahesh Bardapurkar