esakal | प्रभावी अन्‌ प्रेरणादायी... दंगल
sakal

बोलून बातमी शोधा

dangal

प्रभावी अन्‌ प्रेरणादायी... दंगल

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे
कथा काय?
हरियाणातील छोट्याशा बिलाल गावात महावीर फोगट (आमीर खान) आपल्या कुटुंबासह राहत असतात. कुस्तीमध्ये आपल्या देशाला ऑलिंपिक सुवर्णपदक मिळावे असे त्यांचे स्वप्न असते; परंतु काही कारणास्तव ते पूर्ण होत नाही. आपला मुलगा आपले स्वप्न पूर्ण करील, असा त्यांना विश्‍वास असतो. मात्र, एकामागोमाग एक चार मुली होतात आणि त्यांचे स्वप्न मागे पडते. एका प्रकरणात त्यांच्या दोन मुली गीता आणि बबिता दोन मुलांना बेदम मारतात. त्यांचे पालक महावीर यांच्याकडे त्याबाबत तक्रार करतात. तेव्हा मात्र महावीर यांना आपल्या मुली मुलांपेक्षा कमी नाहीत... त्यादेखील हुशार आणि पराक्रमी आहेत, याची जाणीव होते. मग ते आपल्या दोन मुलींना कुस्तीचे धडे देण्याचा निर्णय घेतात. सुरुवातीला गावातील काही मंडळी त्यांच्याकडे कुचेष्टेने पाहतात; परंतु महावीर निर्णयावर ठाम असतात. एके दिवशी आपल्या मुली देशाला सुवर्णपदक निश्‍चितच मिळवून देतील, असा त्यांना विश्‍वास असतो. अत्यंत कठोर परिश्रम ते गीता आणि बबिताला घ्यायला लावतात. त्यांना कुस्तीतील बारीकसारीक बारकावे शिकवितात. मग काय... दोन्ही मुली कशी प्रगती करतात आणि आपले व आपल्या देशाचे नाव कसे उज्ज्वल करतात, हे चित्रपटात पाहायला मिळेल.

हाय काय?
दिग्दर्शक नितेश तिवारीने चित्रपटाला चांगली ट्रिटमेंट दिली आहे. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांचे आयुष्य, त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांचे स्वप्न आणि आपल्या मुलींच्या आयुष्याला दिशा देण्याचे त्यांनी केलेले कार्य... कुस्तीसारख्या मर्दानी खेळात मुलीही कुठे कमी नाहीत... अशा सगळ्याच गोष्टी छान टिपल्या आहेत. "दंगल' केवळ चित्रपटच नाही तर एक प्रभावी, प्रेरणादायी आणि आशावादी प्रवास आहे. मुलींविषयीच्या मानसिकतेवर प्रभावी भाष्य आहे. देशभक्ती, नातेसंबंध आणि भावनांच्या हिंदोळ्यांबरोबरच जगण्याला नवीन अर्थ देणारा अन्‌ दिशा दाखविणारा चित्रपट आहे. नितेशच्या एकूणच कलाकृतीला कलाकारांच्या अभिनयाची मोठी जोड लाभली आहे. आमीर खानबद्दल काय बोलावे? त्याचे दिसणे, असणे आणि वावरणे खूप काही सांगणारे आहे. मुलींना कुस्तीपटू बनविण्याची त्याची चाललेली धडपड, देशाला ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवून देण्याचे त्याचे स्वप्न... कधी आपल्या मुलींचा गुरू; तर कधी बाप... भूमिकेच्या अगदी जवळ पोहोचण्यासाठी त्याने केलेली शारीरिक कसरत आदी सगळ्या मेहनतीला "व्वा क्‍या बात है!' अशा शब्दांत दाद द्यावी लागेल. कुस्तीतील बारकावे त्याने छान टिपलेत. त्याचे हरियाणवी भाषेतील संवादही सफाईदार आहेत. गीता आणि बबिताच्या व्यक्तिरेखाही तितक्‍याच महत्त्वाच्या आहेत. दोन्ही भूमिका अनुक्रमे फातिमा सना शेख आणि सानया मल्होत्रा यांनी साकारल्या आहेत. लहानपणीच्या गीता आणि बबिताची भूमिका झायरा वसिम आणि सुहानी भटनागर यांनी केल्या आहेत. चारही जणींनी भूमिकेसाठी घेतलेले परिश्रम निश्‍चितच जाणवतात. सुरुवातीला कुस्तीचे प्रशिक्षण घेताना वडिलांचा येणारा राग आणि त्यानंतर त्यांनी घेतलेली मेहनत, वडील आणि मुलीचे नातेसंबंध असे भूमिकेचे बेअरिंग चौघींनी चांगले सांभाळले आहे. आमीरच्या पत्नीच्या भूमिकेत साक्षी तन्वरने चोख काम केलेय. कोचच्या भूमिकेत असलेल्या गिरीश कुलकर्णीचीही कामगिरी उल्लेखनीय आहे. चित्रपटातील काही संवाद चटपटीत आहेत. हिंदी आणि हरियाणवी भाषेचा लहेजा कलाकारांनी परफेक्‍ट पकडला आहे. विशेष म्हणजे, चांगल्या कथेला तितक्‍याच चांगल्या पटकथेची साथ लाभली आहे. नितेश तिवारी, पियूष गुप्ता, श्रेयस जैन आणि निखिल मेहरोत्रा यांचे लिखाण धारदार आहे. प्रीतम यांनी संगीताची बाजू सांभाळलेली आहे. अमिताभ भट्टाचार्य यांच्या शब्दांना त्यांनी स्वरसाज चढविलेला आहे. चित्रपटाच्या कथेला गती देणारी गाणी आहेत. सिनेमॅटोग्राफी आणि कलादिग्दर्शन उत्तम आहे.

नाय काय?
चित्रपटाचा उत्तरार्ध अधिक आकर्षक होणे आवश्‍यक होते; पण तसे झालेले नाही. त्यामुळे उत्तरार्धाबाबत उत्सुकता राहत नाही. चित्रपट कुस्तीवर आहे म्हटल्यानंतर ती येणार हे ओघाने आलेच; पण ती किती असावी, याचा विचार होणे आवश्‍यक होते.

थोडक्‍यात काय?
एक ऊर्जा देणारा चित्रपट नितेश तिवारी आणि आमीर खान यांनी दिला आहे. मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लावणारा "दंगल' चित्रपट आहे. मर्दानी खेळात मुली किती आणि कशी प्रगती करू शकतात अन्‌ उत्तुंग भरारी घेऊ शकतात, हे दाखविणारा चित्रपट आहे. एक यशस्वी प्रेरणादायी चित्रपट बनविण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे.

स्टार : चार
* कलाकारांचा अभिनय
* चित्रपटाचा विषय व मांडणी
* संवाद व दिग्दर्शन
* सिनेमॅटोग्राफी व संगीत
loading image