शबानाची उत्कंठावर्धक गोष्ट ((नवा चित्रपट-नाम शबाना)

naam shabana
naam shabana

"वेन्सडे', "स्पेशल 26' असे काही चित्रपट नीरज पांडेने बनविलेले आहेत. दोनेक वर्षांपूर्वी त्याने "बेबी' हा चित्रपट आणलेला होता. त्यामध्ये अक्षय कुमार, अनुपम खेर, डॅनी डेन्झोप्पा... अशी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटात तापसी पन्नूची भूमिका छोटीशी होती खरी; पण त्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. त्याचमुळे आता तिची कथा सांगण्यासाठी "नाम शबाना' हा चित्रपट नीरज पांडेने बनविला आहे. "बेबी' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत नेपाळला जाऊन दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या शबानाची ही कहाणी आहे. हा "बेबी'चा प्रिक्वेल जरी असला, तरी याची कथा संपूर्णपणे वेगळी आहे. शबाना खान (तापसी पन्नू) आपल्या आईसोबत राहात असते. कॉलेज आणि मार्शल आर्टस्‌ या विश्‍वातच ती रमणारी असते. तिचा एक बॉयफ्रेण्ड असतो खरा; पण सुरुवातीला तो आपले प्रेम तिच्याकडे व्यक्त करीत नाही. आपल्या वाढदिवसाला तो शबानाला घेऊन डिनरला जातो आणि तेथे आपले प्रेम तिच्यासमोर व्यक्त करतो. तेथून परतत असताना एक दुर्घटना घडते. त्या दुर्घटनेत शबानाच्या बॉयफ्रेण्डचा दुर्दैवी अंत होतो. या घटनेनंतर शबाना पुरती भांबावून जाते. कारण आपल्या एकट्याच भावविश्‍वात रमणाऱ्या शबानाच्या आयुष्यात आनंद फुलत असताना अशी घटना घडते. त्याच दरम्यान शबानाला एक फोन येतो. तो फोन स्पेशल टास्क फोर्सच्या प्रमुखाचा (मनोज वाजपेयी) असतो आणि शबाना या स्पेशल टास्क फोर्सचा एक भाग बनते. तिला बंदूक चालविण्यापासून ते मार्शल आर्टस्‌चे प्रशिक्षण दिले जाते आणि एके दिवशी तिच्यावर मोठी जबाबदारी टाकली जाते. मग ती जबाबदारी शबाना कशी काय पार पाडते... त्याकरिता तिला कुणाकुणाची मदत होते... त्या वेळी तिला कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो. वगैरे वगैरे गोष्टी जाणून घेण्यासाठी "नाम शबाना' हा चित्रपट पाहावा लागेल. या चित्रपटात तापसी पन्नूची भूमिका ही मुख्य आहे आणि तिने कमाल केली आहे. ऍक्‍शन आणि इमोशन्स अशा दोन्ही पातळीवर तिचा अभिनय कमालीचा खुललेला आहे. तिने या भूमिकेसाठी घेतली मेहनत निश्‍चित जाणवते. "पिंक'नंतर तिच्या वाट्याला आलेली ही महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे, निर्माते नीरज पांडे आणि दिग्दर्शक शिवम नायर यांनी तिच्यावर जो विश्‍वास टाकला तो तिने सार्थ केला आहे. अक्षय कुमार, मनोज वाजपेयी, अनुपम खेर, डॅनी डेन्झोप्पा... हे इंडस्ट्रीतील अनुभवी आणि कसलेले कलाकार. त्यांच्या वाट्याला काही मोजकेच सीन्स आले आहेत आणि त्यांनी ते आपल्या परीने साकारले आहेत. मनोजने साकारलेला स्पेशल टास्क फोर्सचा प्रमुख उत्तम. 
साऊथमधील कलाकार पृथ्वीराज सुकुमारनने मिखाईल या नकारात्मक भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. बाकी संपूर्ण जबाबदारी तापसीने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. चित्रपटातील काही संवाद चांगले आहेत; तसेच सिनेमॅटोग्राफीही. मलेशिया, तसेच अन्य ठिकाणची काही दृश्‍ये सिनेमॅटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात छान टिपलेली आहेत. शिवम नायर या दिग्दर्शकाने ही कथा मांडताना पटकथेचा डोलारा योग्य सांभाळला आहे. त्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. संगीताची बाजू काहीशी कमजोर वाटत आहे आणि पूर्वार्ध हा शबानाची बॅकस्टोरी सांगणारा आहे. त्यामुळे तो दिग्दर्शकाने छान टिपला आहे; मात्र उत्तरार्धात चित्रपट काहीसा ताणलेला वाटतो. तरीही हा चित्रपट अक्षय कुमार, मनोज वाजपेयी आणि विशेष म्हणजे तापसी पन्नूसाठी पाहायला हरकत नाही. एक उत्कंठावर्धक चित्रपट म्हणून त्याकडे पाहता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com