ऍक्‍शन आणि रोमान्सचा "रंगून' 

संतोष भिंगार्डे
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

"ओ मकारा', "मकबूल', "हैदर'... नंतर आता रंगून. नेहमीच आपल्या चित्रपटातून विशाल भारद्वाज यांनी काहीसा वेगळा विचार मांडलेला आहे. नेहमीचे तद्दन चाकोरीबद्ध मसालापट न बनवता त्यांनी काही तरी हटके काम करण्याचा विचार केलेला आहे. त्यांचे याअगोदरचे चित्रपट शेक्‍सपीअरच्या लिखाणावर आधारित होते; मात्र आता आलेल्या "रंगून'मध्ये त्यांनी चाळीसच्या दशकातील कथा सांगितली आहे. सन 1943 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घडणारी ही कहाणी आहे. त्या वेळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी लढा देत होती.

"ओ मकारा', "मकबूल', "हैदर'... नंतर आता रंगून. नेहमीच आपल्या चित्रपटातून विशाल भारद्वाज यांनी काहीसा वेगळा विचार मांडलेला आहे. नेहमीचे तद्दन चाकोरीबद्ध मसालापट न बनवता त्यांनी काही तरी हटके काम करण्याचा विचार केलेला आहे. त्यांचे याअगोदरचे चित्रपट शेक्‍सपीअरच्या लिखाणावर आधारित होते; मात्र आता आलेल्या "रंगून'मध्ये त्यांनी चाळीसच्या दशकातील कथा सांगितली आहे. सन 1943 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घडणारी ही कहाणी आहे. त्या वेळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी लढा देत होती. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्‍वभूमी आणि त्यातच मांडलेला प्रेमाची त्रिकोण अशी "रंगून'ची कथा आहे. ज्युलिया (कंगना राणावत) ही एक त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री असते. ती निर्माता व ऍक्‍टर रुसी बिलिमोरिया (सैफ अली खान)च्या इशाऱ्यावर चालत असते. रुसी हा एका स्टुडिओचा मालक असतो. त्याचं ज्युलियावर खूप प्रेम असतं. एके दिवशी ब्रिटिश सेनेचा मेजर जनरल डेव्हिड (रिचार्ज मॅकबे) रुसीशी बोलणी करून ज्युलियाला भारत आणि बर्मा येथे सीमारेषेवर असलेल्या ब्रिटिश सैनिकांचं मनोरंजन करण्यासाठी पाठवण्यास सांगतो. तिच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी आपण घेऊ, असं त्याला वचन देतो. मग रुसी ज्युलियाला तिथे पाठवण्यास तयार होतो. ज्युलियाच्या संरक्षणासाठी 
ब्रिटिश सैनिकांची एक तुकडी असते. त्यामध्ये जमादार नवाब मलिकही (शाहीद कपूर) असतो. पण अचानक स्थिती बिघडते आणि ज्युलिया व नवाब शत्रूने वेढलेल्या भागात अडकतात. धो धो कोसळणारा पाऊस, होणारी उपासमार आणि त्यातच शत्रूची भीती या सगळ्या प्रसंगातून वाटचाल करीत असतानाच ज्युलिया आणि नवाब एकमेकांच्या प्रेमात पडतात. कारण परिस्थितीच तशी निर्माण होते. त्यांची प्रेमकहाणी त्यादरम्यान फुलते. इकडे रुसी ज्युलियाचा शोध घेत असतो आणि अशातच ज्युलिया आपल्या तुकडीमध्ये सुखरूप पोहोचते. ज्युलियाला पाहताच रुसी आनंदित होतो. तो ज्युलियाबरोबर लग्नाचा बेत आखत असतो. एकीकडे रुसीचा ज्युलियाबरोबरचा हा लग्नाचा बेत; तर दुसरीकडे ज्युलिया आणि नवाब यांचा रोमान्स सुरू असतो. अशातच कथानक पुढे सरकतं. त्यातच अधेमधे या कथेत काही टर्न आणि ट्‌विस्ट येतात. खरं तर विशाल भारद्वाज हा अत्यंत कल्पक आणि हुशार दिग्दर्शक आहे. एखादी कथा निवडली की तिची मांडणी, कलाकारांची अचूक निवड, त्याला संगीताची साजेशी जोड वगैरे गोष्टींकडे तो बारकाईने बघत असतो. 
"रंगून' पाहताना त्याची प्रचीती नक्कीच येते. या चित्रपटासाठी त्याने शाहीद कपूर, कंगना राणावत आणि सैफ अली खान या कलाकारांची त्या-त्या पात्रांसाठी केलेली निवड अगदी योग्यच आहे. या तिन्ही कलाकारांनी जीव ओतून काम केलंय. विशेष कौतुक करावं लागेल ते कंगनाचं. तिने केलेली ऍक्‍शन जबरदस्त आहे. ऍक्‍शन आणि इमोशन्स करताना तिने डोळ्यांतून व्यक्त केलेले भाव अफलातून आहेत. तिचे डोळे बरंच काही सांगतात. तिच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपण एक परिपक्व अभिनेत्री आहोत, हे तिने सिद्ध केलं आहे. सैफ अली खानने साकारलेला बिलिमोरियाही देखणा-दिमाखदार झाला आहे. त्याने आपल्या भूमिकेत श्रीमंती थाटमाट चांगलाच दाखवला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये या चित्रपटाच्या काही भागाचं चित्रीकरण झालंय. तेथील निसर्गरम्य दृश्‍यं सिनेमॅटोग्राफर पंकजकुमार यांनी आपल्या कॅमेऱ्यात नजाकतीने कैद केली आहेत. त्यांचंही कौतुक करावंच लागेल. संगीताची बाजू विशाल भारद्वाज यांनीच सांभाळलेली आहे. मात्र चित्रपटातील काही दृश्‍यं विनाकारण ताणलेली आहेत. काही दृश्‍यं अनावश्‍यक झालेली आहेत. त्या दृश्‍यांना संकलनाच्या वेळी कात्री लागली असती, तर सिनेमाची कथा अधिक आटोपशीर झाली असती. कंगनाची ऍक्‍शन जबरदस्त आहे. ऍक्‍शन आणि रोमान्स पुरेपूर या चित्रपटात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rangoon movie review