‘आगासवाडी’ सर्वोत्कृष्ट माहितीपट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पुणे - वर्षानुवर्षांच्या दुष्काळामुळे शेती, नोकरी, व्यवसायाचे सर्व मार्ग बंद झाले. मग जगण्यासाठी गावातील तरुणांना स्थलांतराशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. यामुळे गावात वृद्धांशिवाय कोणीच दिसत नाही. अशा परिस्थितीत शेती टिकविण्यासाठी दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या माणसांच्या आयुष्यावर आधारित ‘आगासवाडी’ या माहितीपटाला ४ ते ८ डिसेंबरदरम्यान रोमानियात झालेल्या विद्यार्थी चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्‍यातील ‘आगासवाडी’ या गावातील परिस्थितीवर भाष्य करणारा हा माहितीपट आहे.

पुणे - वर्षानुवर्षांच्या दुष्काळामुळे शेती, नोकरी, व्यवसायाचे सर्व मार्ग बंद झाले. मग जगण्यासाठी गावातील तरुणांना स्थलांतराशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. यामुळे गावात वृद्धांशिवाय कोणीच दिसत नाही. अशा परिस्थितीत शेती टिकविण्यासाठी दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या माणसांच्या आयुष्यावर आधारित ‘आगासवाडी’ या माहितीपटाला ४ ते ८ डिसेंबरदरम्यान रोमानियात झालेल्या विद्यार्थी चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्‍यातील ‘आगासवाडी’ या गावातील परिस्थितीवर भाष्य करणारा हा माहितीपट आहे. भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) रमेश होलबोले या विद्यार्थ्याने बनविला असून, एफटीआयआयमध्ये तो चित्रपट दिग्दर्शनाचे शिक्षण घेत आहे.

रोमानियातील ज्येष्ठ माहितीपटकार ‘पॉल कॅलनेसु’ यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार प्रतिष्ठेचा समजला जातो. पुण्यात २०१६ मध्ये झालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रमेश याने बनविलेल्या ‘द ब्युटी ऑफ बेबी का मकबरा’ या लघुपटाला उत्कृष्ट लघुपटाचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या ‘चिरेबंद’ कथेवर ‘चिरेबंद’ नावाचा लघुपटही त्याने बनविला आहे. 

गावामध्ये पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसे पाणी नसल्यामुळे नाइलाजास्तव विहीर खोदणारा तरुण गावात पाणी घेऊन येतो. अशा दुष्काळ व असंख्य अडचणींना सामोरे जाणाऱ्या आगासवाडीतील लोकांचा कोलाज या माहितीपटात मांडण्यात आला आहे.

दिग्दर्शनाचे शिक्षण घेताना माहितीपट बनविण्याची असाइनमेंट देण्यात आली होती. खूप विचार केल्यानंतर दुष्काळावर आधारित माहितीपट बनविण्याची संकल्पना मनात आली आणि यातून हा माहितीपट साकारला. रोमानियामध्ये याला पुरस्कार मिळाल्याने आत्मविश्‍वास वाढला आहे. इथून पुढे आणखी चांगल्या पद्धतीचे सिनेमे बनविण्याची ऊर्जा यामुळे मिळाली.
- रमेश होलबोले ः विद्यार्थी, एफटीआयआय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aagaswadi Best Documentary