'कोणी म्हणायला नको, अलकाताईंच्या मुलींचे दुधाचे पैसे आम्ही दिले म्हणून..'

'आई कुठे काय करते'मधील 'अनिरुद्ध'ने सांगितली आठवण
Miind Gawali and Alka Kubal
Miind Gawali and Alka Kubal

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांची मुलगी ईशानी हिचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हेसुद्धा ईशानीच्या लग्नाला पोहोचले होते. या लग्नसमारंभातील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मिलिंद यांनी एक खास आठवण सांगितली. कामाचा व्याप सांभाळत अलका यांनी त्यांच्या मुलींना कशा पद्धतीने लहानाचं मोठं केलं याबाबतही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं.

मिलिंद गवळी यांची पोस्ट-

'माणसाच्या आयुष्यात सगळ्यात मौल्यवान किंवा जीव की प्राण काय असेल तर ती असते 'लेक'. लेकी कशा पटकन मोठ्या होतात आणि एक राजकुमार येतो, दोघ उंच भरारी घेतात, आपण आनंदानं त्यांचं उड्डाण पाहत राहायचं. समीर आठल्ये आणि अलकाताईंची लेक ईशानी.. ती खरंच एक पायलट आहे आणि तिचा विवाह ज्याच्याशी झाला.. निशांत वालिया, तोसुद्धा पायलटच आहे. म्हणजे खरंच ते आकाशात दोघेही भरारी घेतात. ईशानी परदेशात विमान चालवायचं प्रशिक्षण घेण्यासाठी निघाली होती, तेव्हा मी तिला म्हणालो होतो एक दिवस मला तू जे विमान चालवतेस त्या विमानाने प्रवास करायचा आहे. माझ्या काही स्वप्नांपैकी ते एक स्वप्न आहे. लेकी जेव्हा अशा भरारी घेतात, यशस्वी होतात, त्यामागे आई-वडिलांचे खूप परिश्रम असतात, आईचे थोडे जास्तच.'

'मी आणि अलकाताई गेली वीस वर्षे एकत्र सिनेमांमध्ये काम करत आहोत. आमचे प्रोफेशनल रिलेशन तर आहेतच पण त्यापेक्षाही फॅमिली रिलेशन जास्तच. ईशानी आणि कस्तुरीला मी त्यांच्या लहानपणापासून ओळखतो. अलकाताई आणि समीरने त्यांच्यावर जे संस्कार केले आहेत, ते मी अनेक वर्ष जवळून पाहात आलोय. आपण आदर्श ठेवावा असं हे दांपत्य आहे. दोघेही नवरा बायको कर्तृत्वाने खूप मोठे आहेत, पण माणूस म्हणून ते त्याच्यापेक्षाही अनेक पटीने महान आहेत. अनेक कुटुंबांना त्यांनी वर्षानुवर्षे पोसली, सांभाळली आहेत. अनेक वर्षे सिनेमांमध्ये काम करूनसुद्धा ते दोघं कधीही फिल्मी झाले नाहीत. कामानिमित्ताने सातत्याने दोघांना महाराष्ट्रभर फिरावं लागत होतं. पण एक घार जशी आपल्या पिल्लांवर आकाशातून नजर ठेवत असते, तसंच समीर आणि अलकाताईंनी दोन्ही मुलींकडे पूर्ण लक्ष देऊन त्यांना घडवलं.'

'अलकाताईंचं एक उदाहरण मी माझ्या जन्मात कधी विसरणार नाही. नागपूरला मराठा बटालियन या सिनेमाच्या शूटिंगला ईशानी आणि कस्तुरीला घेऊन आल्या होत्या. चित्रपटाचा समीरच कॅमेरामन होता, मुली लहान होत्या. शूटिंग संपवून आम्ही एअरपोर्टला निघालो होतो. अर्ध्या रस्त्यावर अलकाताईंनी गाडी वळवायला सांगितली. ज्या गेस्टहाऊसमध्ये आम्ही उतरलो होतो, त्या गेस्टहाऊसमध्ये परत घ्यायला सांगितलं. माझं महत्त्वाचं काम राहीलं, जावंच लागेल गेस्टहाऊसवर, असं त्या म्हणाल्या. अलकाताईंनी पटकन पन्नास-शंभर रुपये काढून प्रॉडक्शनवाल्याला दिले. मी विचारलं एवढ्यासाठी आपण का परत आलो? अलकाताईंचे उत्तर ऐकून मी थक्क झालो. ताई म्हणाल्या सकाळी दूध मागवलं होतं मुलींसाठी, त्याचे पैसे द्यायचे राहून गेले होते. मी म्हणालो त्यात काय एवढं? अलकाताई म्हणाल्या, कोणी म्हणायला नको, अलकाताईंच्या मुलींचे दुधाचे पैसे आम्ही दिले म्हणून.'

Miind Gawali and Alka Kubal
अलका कुबल यांची 'लेक चालली सासरला'; थाटात पार पडला लग्नसोहळा

मिलिंद यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'अलकाताई विद्यापीठ आहेत. ज्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे,' असं एकाने लिहिलं. तर काहींनी मिलिंद यांच्या लिखाणाचं कौतुक केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com