'आता निघायची वेळ झाली'; 'अरुंधती'ची भावनिक पोस्ट | Aai Kuthe Kay Karte | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe Kay Karte

'आता निघायची वेळ झाली'; 'अरुंधती'ची भावनिक पोस्ट

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत गेल्या काही दिवसांत लगीनघाई पहायला मिळाली. बऱ्याच दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा मालिकेत पार पडला. या संपूर्ण लग्नसोहळ्याच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. 'घरात नवीन सून आली, आता अरुंधतीचीही निघायची वेळ झाली इथून..' असं लिहित त्यांनी सेटवरील घडामोडींचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मधुराणी यांची पोस्ट-

'देशमुखांचं घर गेले महिनाभर अगदी गजबजून गेलेलं. केळवणापासून सुरू झाली ही धामधूम, मग संगीत, मेहेंदी, हळद, लग्न, गृहप्रवेश काही विचारू नका... सगळे आपले रोज नटून थटून तयार! फारच मजेत गेला हा महिना. पाहुण्यासारखी कधीतरी सेटवर येणारी आमची सारी जिवलग मंडळीसुद्धा रोज भेटत होती. मग काय गप्पा, किस्से, चहा खारी आणि हशा आणि टाळ्या... खरोखरंच लग्नघर हो! या मूडमध्ये सगळे असताना आमच्याकडून काम करून घ्यायला आमचे दिग्दर्शक रवी करमरकर आणि असोसिएट सुबोध बारे यांना त्रासच पडला असणार. पण ते ही मुरलेले, आम्हाला वळणावर कसं आणायचं त्यांना चांगलं माहित आणि तसे आम्ही सगळे थोडेफार प्रामाणिक वगैरे म्हणून हे कार्य पार पडलं हो. आम्हाला सगळ्यांनाच माणसांची ये-जा आवडतेच. भरलेलं घर अजून भरलेलं किती छान वाटतं हो. पण आता सूप वाजणार, मांडव परतणी होणार, घरात नवीन सून आली. आता अरुंधतीचीही निघायची वेळ झाली इथून.. कसं करमणार?,' अशा शब्दांत मधुराणी यांनी शूटिंगचं वर्णन केलं.

हेही वाचा: नाद खुळा! 'पुष्पा'मधल्या 'श्रीवल्ली' गाण्याचं मराठमोळं व्हर्जन

मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. मालिकेतील भूमिकेविषयी त्या अनेकदा आपलं मत मांडत असतात, तर कधी सेटवरील अनुभव सांगतात. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत भावना व्यक्त केल्या आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top