'आई कुठे काय करते?' मालिकेच्या टीमने घरातूनच शूट केला सीन.. पहा व्हिडिओ

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
Tuesday, 21 April 2020

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडच्या कलाकारांनी आणि मराठी कलाकारांनीही घरबसल्या व्हिडिओ तयार केला होता असाच काहीसा प्रयत्न आता एका मराठी मालिकेने देखील केला आहे..

मुंबई- कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे..अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याच गोष्टींना परवानगी देण्यात आलेली नाही..मनोरंजन क्षेत्रही याला अपवाद नाही..मराठी सिनेसृष्टीपासून ते पार हॉलीवूडपर्यंत सगळ्यांचेच शूटींग सध्या बंद आहे..याचकारणामुळे टीव्हीवरही सध्या मालिका आणि सिनेमांचं पुनःप्रक्षेपण दाखवण्यात येत आहे..इतकंच नाही तर जुन्या मालिकाही पुन्हा टीव्हीवर दाखवण्यात येत आहेत आणि प्रेक्षकांचाही त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे..काही दिवसांपूर्वी बॉलीवूडच्या कलाकारांनी आणि मराठी कलाकारांनीही घरबसल्या व्हिडिओ तयार केला होता असाच काहीसा प्रयत्न आता एका मराठी मालिकेने देखील केला आहे..

हे ही वाचा: सलमानच्या 'प्यार करोना' गाण्यावर शाहरुखची कोपरखळी

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते'या मालिकेतल्या कलाकारांनी घरातूनच सीन शूट केला आहे.. 'घरासाठी राबणाऱ्या आपल्या गृहिणीला तिच्या कामांमध्ये हातभार लावून तिच्यावरील ताण थोडा कमी करण्याचा प्रयत्न करु' हा मोलाचा संदेश या सीन मधून देण्यात आलाय. या देशमुख कुटुंबाला तुम्ही मिस करत असाल म्हणूनच मालिकेच्या टीमने घरातून हा व्हिडिओ खास प्रेक्षकांसाठी शूट केलाय.. हा सीन यशस्वीपणे पूर्ण करण्यात सर्वच कलाकारांनी मेहनत घेतली आहे पण मालिकेत यशची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक देशमुखचं विशेष कौतुक कारण या सीनचं स्क्रिप्ट आणि एडिटिंग अभिषेकने केलं आहे. 

कोरोना आजारावर आपण लवकरच मात करू पण त्यासाठी घरात राहून सरकारी सूचनांचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणूनच घरात राहून तो वेळ सत्कारणी लावा हाच संदेश 'आई कुठे काय करते?' मालिकेच्या टीमने दिला आहे.

देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला असताना या सगळ्यातून आलेला मानसिक ताण कमी करण्यासाठी सेलिब्रिटी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतायेत.. सोशल मिडीयावर मनोरंजनात्मक व्हिडिओ तयार करुन त्यातून योग्य तो संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम अनेक सेलिब्रिटी करत आहेत..घराबाहेर न पडता घरात बसूनंच आपण हा वेळ कसा सत्कारणी लावू शकतो याचे व्हिडिओ आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

aai kuthe kay karte marathi serial artists shoots a scene from home during quarantine


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aai kuthe kay karte marathi serial artists shoots a scene from home during quarantine