माझ्या गाण्यात समरस सूर म्हणजे मिलिंद

गाण्याच्या माध्यमातून मी आज घराघरात पोचलो असलो, तरी मिलिंदशिवाय माझा प्रवास पूर्ण होत नाही. गाण्याची शिकवण, कव्वाली, सामने, मोठमोठे स्टेज शो आनंद-मिलिंद याच नावाने केले.
Anand and Milind
Anand and Milindsakal
Summary

गाण्याच्या माध्यमातून मी आज घराघरात पोचलो असलो, तरी मिलिंदशिवाय माझा प्रवास पूर्ण होत नाही. गाण्याची शिकवण, कव्वाली, सामने, मोठमोठे स्टेज शो आनंद-मिलिंद याच नावाने केले.

गाण्याच्या माध्यमातून मी आज घराघरात पोचलो असलो, तरी मिलिंदशिवाय माझा प्रवास पूर्ण होत नाही. गाण्याची शिकवण, कव्वाली, सामने, मोठमोठे स्टेज शो आनंद-मिलिंद याच नावाने केले. आमच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाच्या कॅसेट यायला लागल्या त्यातदेखील आमची एकत्र गाणी असायची. त्यामुळे महाराष्ट्राला माझी खरी ओळख आनंद शिंदे-मिलिंद शिंदे अशीच आहे. आयुष्यामध्ये ३५-४० वर्षांचा काळ संगीताला वाहून घेतल्यानंतर केवळ माझा लहान भाऊ म्हणून नाही, तर माझ्या संगीतात आणि गाण्यात समरस असलेला सूर म्हणजे मिलिंद आहे.

आमच्या घरामध्ये मी मोठा; तर मिलिंद व दिनकर हे माझे लहान भाऊ. सूर्यकांत आणि चंद्रकांत यांचीदेखील संगीतसाधना साधारणतः आमच्यासोबत सुरू झाली. घरात लोकसंगीताचे वातावरण असल्याने माझे वडील प्रल्हाद शिंदे यांच्याकडूनच आम्हाला गायन आणि वादनाचे धडे मिळाले. मी वयाने मोठा असलो, तरी गायनामध्ये माझ्यापेक्षा मिलिंद पुढे होता. दादा नेहमी म्हणायचे मिलिंद हा माझा गायनाचा वारसा चालवेल. गायक म्हणून मी यशस्वी होईन, याबाबत त्यांना शंका होती, त्यामुळे माझ्या उदरनिर्वाहाविषयी त्यांच्या मनात थोडी चिंताही होती. म्हणून त्यांनी मिलिंदला गायन व मला वादनकला शिकण्याचा सल्ला दिला. दादा मला तबला शिकवायचे आणि मिलिंदला गायन. दादांच्या कडक शिस्तीमुळे आम्ही दोघेही त्यांना प्रचंड घाबरायचो. मला शिकवताना तबल्याला बढवणाऱ्या हातोड्याने दादा मारायचे. हे बघून मिलिंदला घाम फुटायचा. त्यामुळे तो तबला शिकायला जवळ यायचाच नाही. दादा मला जे काही शिकवायचे, ते मिलिंद दरवाजामध्ये उभा राहून पाहायचा. त्यामुळे मी शास्त्रशुद्ध तबला शिकलो; तर मिलिंद केवळ बघून तबला आणि ढोलकी शिकला. आम्ही त्याला उलटे दिसायचो, त्यामुळे तो आजही तबला उलट्या प्रकारे वाजवतो.

आम्ही शाळेमध्ये असतानाच गाणं गायला सुरुवात केली होती. चांगलं गाणं गाऊ, याबद्दल दादांना थोडी शंका होती. असंच एकदा प्रसिद्ध गायक गोविंद म्हशीलकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमांमध्ये दादादेखील उपस्थित होते. त्यांच्यासमोर त्यांचेच ‘उड जायेगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली’ हे गाणं गायलं. दादा प्रचंड खुश झाले. त्यांनी तिथेच घोषित केले की ‘आज जरी मला मरण आले तरी चालेल. कारण माझा मुलगा माझ्या गाण्याचा वारसा पुढे नेईल.’ तिथूनच खऱ्या अर्थाने माझी आणि मिलिंदची गायनाला सुरुवात झाली. मंगळवेढा या ठिकाणी शाळेमध्ये असतानाच आम्ही हलकीफुलकी गाणी गायचो. ‘सुगंधी फुला’ हे गणपतीचं गाणं शाळेत गायल्याचे आम्हाला आठवतं.

मी आणि मिलिंद आम्ही दोघे न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये होतो. माझा भाऊ दिनकर आणि माझी पत्नी हे दुसऱ्या शाळेमध्ये होते. माझी पत्नी सातवीला असताना शाळेमध्ये सेंड ऑफचा कार्यक्रम होता. त्यात आम्ही परफॉर्म करायचे ठरवले. आम्ही आमचे दादा विठ्ठल शिंदे यांचे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या गाण्यावर परफॉर्म केला. मिलिंदने हे गाणं गायलं, मी तबला वाजवला, तर माझ्या होणाऱ्या पत्नीने डान्स केला. तेव्हापासूनच आमचं सर्वांचं संगीतमय नातं जुळलं होतं. माझं अठराव्या वर्षी लग्न झालं. यानंतर भावंडांची जबाबदारी मलाच घ्यायची होती. मिलिंदच्या लग्नाचीही मला रुखरुख होती. कारण तेवढी व्यावसायिक कामं आम्हाला मिळत नव्हती. त्यामुळे आर्थिक स्थिती जेमतेम होती. त्यामुळे मिलिंदच्या लग्नासाठी पैसे जमा करण्याचा निर्णय मी घेतला. मला आठवतं मी त्यासाठी एक गल्लादेखील आणला होता आणि त्याच्यावर ‘मिलिंदच्या लग्नासाठी गल्ला’ असं एक लेबलदेखील चिटकवलं होतं. वडिलांची जागा घेऊन मला भावंडांसाठी काहीतरी करायचं होतं; पण माझ्या भावांनीही मला दादांइतकं प्रेम दिलं. आजही माझी सर्व भावंडं मला वडिलांच्या जागी पाहतात. मला दादा अशी हाकदेखील मारतात.

गाण्यामध्ये करिअर करायचं असल्यानं मुंबईशिवाय पर्याय नव्हता. या वेळी मी गोरेगावला भगतसिंगनगर माझ्या सासरवाडीत राहायला आलो. कल्याणवरून गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओला जाणं लांब पडत होतं. गोरेगाव येथे मी सूर्यकांतलादेखील आणलं. तो इथेच गाणं शिकला. ‘सगुण गुणाचं बाळ हे तान्हं’, ‘माठाला गेला तडा’, ‘बाई माझ्या दुधात नाही पाणी’ अशी काही सूर्यकांतची गाणी प्रचंड प्रसिद्ध झाली. वैशाली सामंत हिच्यासोबत सूर्यकांत यानेच पहिलं ड्युएट गाणंदेखील गायलं.

माझे आणि मिलिंदचे छोटे-मोठे कार्यक्रम होत होते. अशाच प्रकारे मुरबाड येथे सामना आयोजित केला होता. मिलिंदच्या समोर रंजना शिंदे होत्या. सामन्यामध्ये त्यांनी मैनेचं गाणं गाऊन धमाल उडवून दिली होती. सामना असल्याने त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं, त्यासाठी गाण्यावर मेहनत घेतली जात होती. ‘मैने’ला उत्तर म्हणून कवी मनवेल गायकवाड यांनी ‘माझा नवीन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला’, हे गाणं लिहिलं. त्याला दादा विठ्ठल शिंदे यांनी चाल दिली आणि मिलिंदने हे गाणं गायलं... खरंतर हे गाणं मिलिंदच. मिलिंदने ते गाणं फुलवलं. मायबाप प्रेक्षकांनाही गाणं खूप भावलं आणि त्या सामन्यात वेगळीच रंगत आली. प्रेक्षकांना गाणं आवडलं. व्हीनसने हे गाणं रेकॉर्ड करायचं ठरवलं, त्यावेळी ‘ए’ साईड आणि ‘बी’ साईड अशी गाणी असायची. ‘माझा नवीन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला’ हे गाणं कॅसेटसाठी ध्वनिमुद्रित केल्यानंतर चालेल की नाही, याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या होत्या, मात्र दादा विठ्ठल शिंदे या गाण्याविषयी जाम कॉन्फिडन्ट होते. हे गाणं चालेल आणि याचमुळे तुमची ओळख होईल, असे दादांना वाटायचे. हे गाणं जरी मिलिंदचं असलं तरी व्हीनस कंपनीमध्ये रेकॉर्डिंग करताना हे गाणं माझ्या हिश्श्यात आलं; पण आमची या अल्बममधील सर्व गाणी हिट झाली आणि आनंद शिंदे-मिलिंद शिंदे जोडीचा उगम झाला.

या काळात आर्थिक स्थैर्य फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे आम्ही काहीना काही काम करण्याचा, काम मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. यातूनच मी आणि मिलिंद आम्ही दोघे संगीतकार म्हणून काम करण्याची सुरुवात केली. यादरम्यान आम्ही अनेक गाणी बनवली. ‘मंगला भेट मला’, ‘हॅपी गणपती बाप्पा’ अशी काही गाणी त्या वेळी हिट झाली. याशिवाय आम्ही हिंदी गाण्यांकडेही लक्ष केंद्रित केलं. मिलिंदचं हिंदी गाण्यांकडे फारस लक्ष नव्हतं. त्यामुळे त्याला मी हिंदीतदेखील गाणी करायची आणि गायची, असं सांगितले. त्यानंतर मग आम्ही ‘मेरी साई की पालखी’ आणि ‘मै भीम का दिवाना हू’ यांसारखी गाणी केली. या गाण्यांनाही रसिकांचा भरपूर प्रेम मिळालं.

आमचं दोघांचंही बऱ्यापैकी काम सुरू झालं होतं. दोघांनी मिळून आनंद-मिलिंद नाईट्‌स या प्रकारचे शो सुरू केले. सुरुवातीला ‘काळूबाळू’ यांच्यासोबतदेखील आम्ही अनेक कार्यक्रम केले. अनेक नवनवीन गाणी आम्ही स्वतः तयार करत होतो. त्या वेळी कुठल्याही गाण्यांचा अल्बम आम्ही दोघे मिळूनच करायचो. कॅसेटच्या ‘ए’ साईडला मी; तर ‘बी’ साईडला मिलिंदची गाणी असायची. टी सीरिज या कंपनीने माझा सोलो अल्बम काढायचे ठरवले; मात्र माझी आणि मिलिंदची जोडी त्या वेळी हिट ठरल्याने मी त्याला स्पष्ट नकार दिला. कॅसेट काढायची तर दोघांनी एकत्र गायचं, असं मी ठरवलं होतं. आमच्या दोघांनाही चांगलं यश मिळत होतं. माझं ‘माझा नवीन पोपट’; तर मिलिंदचं ‘काय राव तुम्ही, धोतराच्या सोग्यात’, ‘मंगला भेट मला मंगळवारी’ अशी गाणी हिट होत होती. मिलिंदला हिंदी गाण्यांचे अल्बम काढण्यासाठी साईबाबांच्या गीतांचा अल्बम काढून मिलिंदला हिंदी गाणी गायला सांगितली.

मिलिंद अभ्यासात फार हुशार होता. शिक्षणाची ओढ होती. तुलनेत मला मात्र शिक्षणाचं वावडं होतं. त्यामुळे अभ्यास मी कधीही फारसा सीरियस घेतला नाही; पण मिलिंद नेहमी सांगायचा ही मला वकील व्हायचं आहे. त्याचं बरंच शिक्षण हे बोर्डिंगमध्ये झालं. माझा भाऊ बोर्डिंगमध्ये बऱ्याचदा आमच्यापासून दूर राहिला. त्यामुळे त्याच्याविषयी माझ्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे. माझ्या आदर्श आणि उत्कर्ष या दोन मुलांचं जास्त ट्युनिंग मिलिंदशी आहे. मी स्वभावाने थोडा दादासारखा तापट असल्याने मी आदर्श आणि उत्कर्ष यांना गाणं शिकवताना किंवा गाणं रेकॉर्डिंग करताना खूप चिडत असे. त्यामुळे माझी दोन्ही मुले मला खूप घाबरत असत. त्यामुळे त्यांना काहीही सुचलं किंवा सांगायचं असेल, तर ते माझ्याशी न बोलता मिलिंदला सांगतात आणि तोही त्यांचं तितक्याच प्रेमानं ऐकतो आणि काम करतो. आदर्श आणि उत्कर्ष यांचं पहिलं गाणं मी नाही; तर मिलिंदनेच रेकॉर्ड करून घेतलं होतं. त्यामुळे आनंद-मिलिंद हे समीकरण केवळ गाण्यापुरतंच नाही, तर आमच्या संपूर्ण कुटुंबाला एकसंध बांधून ठेवण्यामध्येदेखील महत्त्वाचं ठरलं आहे. मिलिंदचं गाणं, त्याचा आवाज मला खूप आवडतो, त्याच्या गाण्याविषयी मी इतकंच म्हणेन की, आनंद शिंदे यांचा कुणी कॉम्पिटिटर असेल तर तो फक्त मिलिंद शिंदे आहे!

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com