esakal | लग्नाची गोष्ट : ‘यश’ आयडियल कपलचं!
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाची गोष्ट : ‘यश’ आयडियल कपलचं!

लग्नाची गोष्ट : ‘यश’ आयडियल कपलचं!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मराठी मनोरंजन सृष्टीतील एक तरुण आणि सर्वांना आवडणारं कपल म्हणजे अभिनेता अभिषेक देशमुख आणि अभिनेत्री कृत्तिका देव. या दोघांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयानं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिषेक मूळचा जळगावचा आणि कृत्तिका नाशिकची. दोघांचं शिक्षण झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले. ‘दोन गोष्टी’ या प्रायोगिक नाटकाचं दिग्दर्शन अभिषेक करत होता. त्या नाटकात कृत्तिका एका महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. या नाटकाच्या तालमीदरम्यान या दोघांची ओळख झाली. पुढं त्यांच्यात छान मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी ४ ते ५ वर्षं एकमेकांना व्यवस्थित समजून घेतल्यावर ३ वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकले. कृत्तिका आणि अभिषेकचा स्वभाव बऱ्यापैकी विरुद्ध आहे.

कृत्तिका म्हणाली, ‘‘अभिषेक अत्यंत गोड, मनमिळाऊ आणि जेन्यून आहे. तो कधीही त्याच्या भावना लपवत नाही. तो वयाने मोठा असला, तरी त्याच्यातलं लहान मूल अजूनही तसंच आहे. तो खूप गप्पिष्ट आहे. त्याला मैत्री करायला, माणसं जोडायला खूप आवडतात. तो फक्त मैत्री करत नाही, तर त्याची सगळ्यांशी चांगली ओळख असते आणि वरचेवर तो प्रत्येकाच्या संपर्कात असतो. तो सगळ्यांना आपलं करून घेतो आणि त्यामुळं त्याला भेटल्यावर प्रत्येक जण खूषच होतो. कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार या सगळ्यांबरोबर तो उत्तमरीत्या जोडला गेला आहे. मी थोडी अबोल होते, समोरच्याशी उत्कृष्ट संवाद कसा साधायचा हे मला जमत नव्हतं. पण अभिषेकमुळं माझी ही बाजू सुधारत गेली आणि आता मलाही समोरच्याशी चांगला संवाद साधता येतो. तो अतिशय समजूतदार आहे. कामाच्या व्यग्र शेड्युलमुळं आम्हाला एकत्र घालवायला कमी वेळ मिळतो, पण आम्ही एकत्र असताना फिरायला जाणं, चित्रपट बघणं किंवा घरीच राहून भरपूर गप्पा मारणं, छान डिश बनवणं हे करीत आम्ही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करतो.’’

अभिषेकनं कृतिकाबद्दल बोलताना सांगितलं, "कृत्तिका ही शांत आणि थोडीशी अबोल आहे. समोरच्याशी नीट ओळख होईपर्यंत ती मितभाषी असते आणि एकदा समोरच्या व्यक्तीशी तिची छान ओळख झाल्यावर ती मस्करी करते; तिच्या गप्पा संपतच नाहीत. यासोबतच ती खूप संयमी आहे. कुठलाही निर्णय व्यवस्थित वेळ घेऊन, शांतपणे विचार करून घेते. तिला पटकन राग येत नाही. ती खूप मॅच्युअर आहे. प्रत्येक गोष्टीचा ती सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करते. माझा स्वभाव तिच्या बऱ्यापैकी विरुद्ध आहे. एखाद्या गोष्टीचा तिच्याइतका शांतपणे मला विचार करता येत नाही. तिच्यातला हा गुण मला आत्मसात करायला आवडेल. मी सुरुवातीपासूनच प्राणीप्रेमी होतो, पण कृत्तिकामुळं माझ्या मनातलं प्राण्यांविषयी वाटणारं प्रेम आणखी वाढलं.’’

अभिषेक सध्या स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘यश’ ही भूमिका साकारत आहे. खऱ्या आयुष्यातही अभिषेक हा यशसारखाच आहे. अभिषेकच्या या भूमिकेला सगळ्यांकडून प्रेम मिळत आहे. कृत्तिकालाही अभिषेक साकारात असलेली ही भूमिका विशेष आवडते. अभिषेकला कृत्तिकानं ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटात आणि ‘फ्रिडा’ या नाटकात साकारलेली भूमिका अतिशय भावली. आपलं घर आणि काम याचा समतोल कृत्तिका उत्तमरीत्या सांभाळते. तसंच, दिवसभर काम करून घरी आल्यावर घरात शांत आणि प्रसन्न वातावरण कृत्तिका ठेवत असल्यानं दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने काम करण्याचा उत्साह निर्माण होतो, असं अभिषेकने सांगितलं. अशाप्रकारे एकमेकांना समजून घेत, एकमेकांना प्रोत्साहन देत कृत्तिका आणि अभिषेक अनेकांच्या नजरेत एक आयडियल कपल म्हणून ओळखले जातात.

(शब्दांकन : राजसी वैद्य)

loading image
go to top