...म्हणून बाबांनी माझं नाव अभिनय ठेवलं; अभिनय बेर्डेने लक्ष्मीकांत यांच्या आठवणींना दिला उजाळा

रविवार, 28 ऑक्टोबर 2018

'सचिन सरांनी मला सांगितलं कि बाबांनी माझं नाव अभिनय का ठेवलं. 'माझे बाबा म्हणायचे, आता कुणी म्हणणार नाही की लक्ष्याचा अभिनयाशी काही संबंध नाही.' 

नुकताच 26 ऑक्टोबरला दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची 65 वी जयंती झाली. 'अशी ही बनवाबनवी', 'एका पेक्षा एक', 'चिकट नवरा', 'रंग प्रेमाचा', 'लपवाछपवी', 'बजरंगाची कमाल' असे एका पेक्षा एक हिट मराठी चित्रपट देणारे लक्ष्मीकांत बेर्डे वयाच्या केवळ 50 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतील हे कुणालाच वाटलं नव्हतं. मराठी चित्रपट सृष्टीतील लक्ष्मीकांत यांच्या कामाचे आजही खूप चाहते आहेत. केवळ मराठी चित्रपटच नव्हे तर हिंदी चित्रपटातही लक्ष्मीकांत यांच्या उल्लेखनीय भूमिका राहिल्या आहेत. 'मैंने प्यार किया', 'मेरी बीवी का जवाब नही', 'हम तुम्हारे है सनम', 'खंजर', 'बीवी और पडोसन', 'शिकार', 'रहस्य', 'गंगा मांगे खून', 'तकदीरवाला', 'हम आपके है कौन', 'दिलबर', 'गुमराह', 'बेटा', 'साजन' हे काही गाजलेले त्यांचे हिंदी चित्रपट होते. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्याशी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लग्नगाठ बांधली. या जोडप्याला स्वानंदी आणि अभिनय असे दोन अपत्य आहेत. आपल्या वडिलांच्या आठवणीत काय म्हणतोय अभिनय जाणून घेऊया...

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday aaba!

A post shared by Abhinay Berde (@abhinay3) on

 

  • ​बाबांकडून माणूस म्हणून काय शिकलास?

'ते गेलेत तेव्हा मी फक्त 7 वर्षाचा होतो. बाबांनी सगळं शून्यातून घडवलं. मुंबईत नशीब असून चालत नाही. त्यामुळे बाबांनाही अभिनय क्षेत्रात स्थान निर्माण करण्यासाठी कष्ट करावे लागले. मला तर लहाणपणापासूनच या क्षेत्रात येण्याची ईच्छा होती. सचिन सरांनी मला सांगितलं कि बाबांनी माझं नाव अभिनय का ठेवलं. 'माझे बाबा म्हणायचे, आता कुणी म्हणणार नाही की लक्ष्याचा अभिनयाशी काही संबंध नाही.'

  • फिल्मफेअर मिळाला तो अनुभव कसा होता?

मला 'ती सध्या...'साठी फिल्मफेअर मिळाला तेव्हा मला कल्पनाही नव्हती बाबांचाही फिल्मफेअर घरी ठेवला आहे. मी स्टेजवर जायला खूप घाबरलो होतो. मला आधी तर विश्वासच बसला नाही. बाबांना मिळालेला इतका मोठा अवॉर्ड मी माझ्या पदार्पणात मिळवू शकलो याचा आनंद शब्दात मावणार नाही एवढा आहे.' 

  • लक्ष्मीकांत सरांच्या काळातील चित्रपट आणि आताचे चित्रपट यात काही फरक वाटतो?

'बाबा आणि अशोक मामा ज्या भूमिका करायचे त्यापैकी बहुधा भूमिका या काल्पनिक असायच्या. पण आताच्या जीवनशैलीतले बरेच पैलू चित्रपटात असायचे. आताच्या चित्रपटांच्या बऱ्याच कथा या खऱ्या आयुष्यावरुन प्रेरीत असतात. आताच्या चित्रपटांचा विषय जास्त चांगला असतो. शिवाय वायाकॉम सारखे प्रोडक्शन हाउस मराठी सिनेमांसाठी पुढे यायला पाहिजे. जेणेकरुन मराठीतील मजबुत विषयांना मांडणारा मजबुत प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल.'

  • चित्रपट क्षेत्रातील तुझे गुरु कोण?

'आई, सतीश राजवाडे आणि सचिन पिळगावकर हे या क्षेत्रात माझे कायम गुरु राहिले आहेत. इंडस्ट्रीत मिलींद, आकाश ठोसर, अमेय वाघ यांच्यासारखे अनेक नव्या दमाचे कलाकार उत्तम काम करत आहेत. या इंडस्ट्रीला नक्कीच फायदा होईल.'

  • लक्ष्मीकांत सरांची एखादी धूसर आठवण...?

'दिवाळी बाबांना खूप आवडायची. त्यांच्यात वेगळाच उत्साह असायचा. मला आठवतंय, बाबा दिवाळीला खूप फटाके घेऊन यायचे. आमची सगळी भावभावंडं जमायची. ते दिवाळीत काहीच शूटींग करायचे नाही. दिवाळीसाठी ते इतके हौशी होते की पूर्ण वेळ ते आपल्या कुटुंबासाठीच ठेवायचे.' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Laxmikant Berdes Son Abhinay Berde Interview