तालेवार खवय्यांचं...! कोल्हापूर

संभाजी गंडमाळे
गुरुवार, 18 एप्रिल 2019

आजवर अनेक मालिका, चित्रपट, मराठी-हिंदी नाटकं केली. पण, पेठेने नसानसांत भिनवलेली तालेवार खवय्यैगिरी मात्र अगदी मनसोक्तपणे सुरू असते. कुठेही असलो तरी महिन्यातून किमान एकदा तरी मिसळ आणि तांबडा-पांढऱ्यावर ताव मारतोच

शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे सगळे अत्यंत जवळचे आणि जिव्हाळ्याचे विषय. आजवर अनेक मालिका, चित्रपट, मराठी-हिंदी नाटकं केली. पण, पेठेने नसानसांत भिनवलेली तालेवार खवय्यैगिरी मात्र अगदी मनसोक्तपणे सुरू असते. कुठेही असलो तरी महिन्यातून किमान एकदा तरी मिसळ आणि तांबडा-पांढऱ्यावर ताव मारतोच...अभिनेता प्रसाद माळी भरभरून बोलत असतो आणि अस्सल पेठेतला असल्याचा अभिमानही त्याच्या चेहऱ्यावर झळकत असतो. 

‘ओवाळणी’, ‘घरंदाज’, ‘दैवाचे खेळ’, ‘नातं तुझं माझं’, ‘झुंझार’, ‘कभी कभी होता है’, ‘गुड बाय ऑफिसर’, ‘मिंगो’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘प्रेमकहाणी’, ‘जखमी कुंकू’, ‘राजा पंढरीचा’, ‘राजकारण’, ‘उदय’, ‘सद्‌गुरू संत बाळूमामा’, ‘दुसऱ्या जगातली’, ‘तेरा साथ’, ‘मायेची सावली’ आदी चित्रपट त्याने केले. विशेषतः ‘राजा पंढरीचा’ चित्रपटातील ‘विठ्ठल नामाची शाळा भरली’ हे गीत आजही अनेकांना भुरळ घालते आणि ते ज्याच्यावर चित्रीत झालं आहे तोच हा प्रसाद. ‘स्पंदन’,‘सर्वज्ञ चक्रधर स्वामी’, ‘कन्यादान’, ‘पंचनामा’, ‘लक्ष्य’, ‘आकांक्षा’, ‘सावित्रीबाई फुले’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘आनंदमहिमा’, ‘ज्ञानियाचा राजा’ या मालिकानंतर आता तो ‘जीव झाला येडापिसा’च्या शूिटंगमध्ये व्यस्त आहे. ‘मंडळ आपलं आभारी आहे’ चित्रपटही तो सध्या करतो आहे. 

सई परांजपे लिखित आणि दिग्दर्शित ‘धिक ताम’, कुमार सोहोनी दिग्दर्शिथ ‘याच दिवशी याच वेळी’ , ‘मग्न तळ्याकाठी’, ‘कालाय तस्मै नमः’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘एरर नं. ००९७१८’, ‘नाव झालं पाहिजे’,‘राहिले दूर घर माझे’ या मराठी नाटकांसह नादिरा राज बब्बर, कुमार सोहोनी, रोहित वर्मा, अंकिता नरवणेकर दिग्दर्शित हिंदी नाटकंही त्यांनं केली आहेत. प्रसाद सांगतो, ‘‘शिवाजी विद्यापीठात मानसशास्त्र, मुंबई विद्यापीठातून ‘थिएटर आर्टस्‌’चं शिक्षण झालं. विजय केंकरे, शफाअत खान, गोविंद नामदेव, अभिराम भडकमकर, सई परांजपे, नादिरा बब्बर आदींचं मार्गदर्शन आजवरच्या वाटचालीत मोलाचं ठरलं.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Prasad Mali interview in Amhi Kolhapuri