वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनयाची संधी..!

वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनयाची संधी..!

मी  मूळचा कोल्हापूरचा; पण वडील बॅंकेत मॅनेजर, त्यामुळं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. सारं बालपण आणि शिक्षण राज्यभरातील विविध ठिकाणी झालं. शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी व्हायचो. वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनेता अशोक सराफ, रंजना यांच्याबरोबर ‘बहुरूपी’ चित्रपटात बालकलाकार म्हणून संधी मिळाली. त्याचवेळी ठरवलं, करिअर म्हणून जरी नाही जमलं तरी अभिनय सोडायचा नाही. सध्या माझं मेडिकलचं स्टोअर आहे; पण आजवर पंचवीसहून अधिक चित्रपटांत अभिनयाची संधी मिळाली आणि कैक मालिकांतूनही आजही काम करतो आहे... अभिनेता सचिन मोरे संवाद साधत असतात. ते राहायला जरगनगर परिसरात आणि देवकर पाणंद परिसरात त्यांचं मेडिकल स्टोअर आहे.   

शालेय शिक्षण घेताना स्नेहसंमेलनातून सहभाग तर होताच पण आकाशवाणीवर बडबड गीतांचे कार्यक्रमही त्यांनी केले. अभिनयाची आवड असल्यानं दिग्दर्शक सतीश रणदिवे, यशवंत भालकर यांनीही अनेकदा संधी दिली. मामा पांडुरंग शिंदे आणि भुयेवाडीचे सिनेस्टार दादा भोसले यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं.

‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘भारतीय’, ‘पोपट’, ‘बायको झाली गायब’, ‘लपाछपी’पासून ते अगदी अलीकडच्या ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटांत भूमिका केल्या. ‘क्राईम डायरी’ या मालिकेचे एकशेवीस एपीसोड केले. ‘पंचनामा’, ‘सीआयडी’, ‘सावधान इंडिया’ या मालिकांतूनही संधी मिळाली. सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकांतूनही ते विविध भूमिका साकारत आहेत. चित्रपट आणि मालिकांबरोबरच नाटकातही त्यांनी अनेक भूमिका केल्या.

‘चांदणे शिंपीत जा’, ‘एका घरात होती’, ‘मोहिनी’, ‘सावलीचं घर उन्हात’, ‘पाहिजे जातीचे’, ‘नटसम्राट’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘दुसरा मृत्यू’, ‘अग्नीपंख’, ‘ती फुलराणी’, ‘कुटुंब कल्लोळ’ आदी नाटकांत त्यांनी काम केलं. या साऱ्या प्रवासात त्यांना वाय. जी. भोसले, विवेक देशपांडे, कांचन नायक, अजय कुरणे, सुनील खानोलकर, सतीश राजवाडे, गिरीश मोहिते, विशाल फुरिया, अनंत महादेवन, संजय मोहिते, युवराज घोरपडे, सुनील घोरपडे, मकरंद लिंगनूरकर यांचंही सहकार्य मिळालं. अभिनेता भरत जाधव, मकरंद अनासपुरे, विक्रम गोखले, अरुण नलावडे, शिवाजी साटम, शक्ती कपूर, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, कुलदीप पवार, मोहन आगाशे, रमेश भाटकर, दीपक शिर्के, तेजस्विनी पंडित, प्रिया बेर्डे, निशा परुळेकर आदींबरोबर त्यांनी भूमिका साकारल्या.

व्यवसायाने फार्मासिस्ट असलो तरी अभिनय हा माझा प्राण आहे. त्यामुळं येत्या काळातही उत्तम नट म्हणून स्वतःला घडवण्यासाठी आणखी प्रयत्न करत राहणार आहे.
- सचिन मोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com