Salman Khan : बॉलिवूडच्या भाईला अखेर 'बंदुकी'चं संरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan

Salman Khan : बॉलिवूडच्या भाईला अखेर 'बंदुकी'चं संरक्षण

बॉलीवूडमध्ये भाईजान नावाने प्रसिद्ध असलेल्या सलमान खानला अखेर आत्मसंरक्षणासाठी मुंबई पोलिसांकडून शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमक्या मिळाल्यानंतर सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून सलमान खानला शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे. सलमान आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर सलमानने मुंबई पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता.

सलमानच्या परवान्याला संर्घषचा विरोध

दरम्यान, अभिनेता सलमान खानला शस्त्र परवाना न देण्याबाबत ‘संघर्ष’ संघटनेने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहून त्याला शस्त्र परवाना न देण्याची मागणी केली होती. यात सलमानचा यापूर्वी हिट अँड रन प्रकरणापासून ते पत्रकाराशी झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेपर्यंत गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याला शस्त्र परवाना देण्याच येऊ नये, अशी विनंती करण्यात आली होती.

नेमकं काय आहे प्रकरण?

पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला खून प्रकरणाची जबाबदारी घेणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई यानेच अभिनेता सलमान खान व सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठविल्याची घटना यापूर्वी घडली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे गुन्हाही दाखल आहे. त्यादृष्टीने मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

दरम्यान, मुसेवाला खून प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांनी जाहीर केलेल्या आठ शार्प शुटरपैकी संतोष जाधव व सिद्धेश कांबळे ऊर्फ महाकाल यांच्यासह नवनाथ सुर्यवंशी या तिघांना ग्रामीण पोलिसांनी काही दिवसातच बेड्या ठोकल्या. प्रारंभी पोलिसांनी महाकालला अटक केली. त्याच्या अटकेनंतर पंजाब पोलिस, मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महाकालची चौकशी केली होती. महाकालला अटक केल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी सलमान खान धमकी प्रकरणाची चौकशी केली. तेव्हा, त्याला धमकीच्या घटनेची पूर्ण माहिती असल्याचे पुढे आले होते. महाकाल याच्या चौकशीतून या प्रकरणाबाबत आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.