गिरगावचा डान्सर चंदेरी दुनियेतील तारा

गिरगावचा डान्सर चंदेरी दुनियेतील तारा

गिरगावात (ता. करवीर) शाळकरी मुलं एकत्र यायची, जमेल तसा डान्स करायची, गणेश उत्सवातील डान्स स्पर्धेत गिरगावातल्या इतर मुलांमध्ये संजू तसा ‘बरा’ नाचायचा. थोडी मोठी मुले संजूच्या नाचाला ‘भारी नाचतोस’ म्हणत प्रोत्साहन द्यायची. तशी त्याच्या नृत्याची आवड वाढत गेली. कोल्हापुरात ग्रुप डान्स स्पर्धा गाजवल्या. पुढे तो पुण्या मुंबईत पोचला आणि नृत्य अभिनयाचे एकेक पैलू गिरवत पाच चित्रपट, सहा मालिका, काही जाहिरातीत झळकला, चंदेरी दुनियेत यशाच्या दिशेने ठोस पावले टाकली. तशी त्याची ओळख अभिनेता संजय पाटील अशी झाली. 

गिरगाव तसं सैनिकांचे गाव, या गावातील अनेकजण सैन्यात आहेत. त्यामुळे संजयचे शालेय शिक्षण सैनिकी शाळेत झाल्यामुळे शिस्तीच्या चौकटीत वावरण्याची त्याला सवय लागली. त्याचे व्यक्तिमत्त्व तंदुरुस्त आरोग्यदायी बनले. वडिलांचे छत्र लहानपणी हरपल्यावर आईच्या मायेने संजयला वाढवले. नृत्याची आवड जोपासत तो गावागावांत प्रत्येक कार्यक्रमांत नृत्य सादर करीत संजय पुढे विशाल कालेकर यांच्या ग्रुपला जॉईन झाला. पुढे नृत्यात करिअर करायचे म्हणून पुण्यात गेला, तिथे देवेंद्र पेम यांची एक कार्यशाळा केली. त्यात अभिनय, दिग्दर्शन या अंगाची ओळख झाली. सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्याकडून वाचिक अभिनय समजून घेतले. कमिंग सून, मुख्यमंत्री, नाते गोत्यात, राण जाई, लेडीज बार अशा नाटकात भूमिका केल्या.

नृत्य अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती असे विविध पैलू कला क्षेत्रात असतात, याची ओळख झाली. सुरवातीला काही जाहिरातींची कामे मिळाली, त्या जाहिरातीत रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची छाप अशी पडली, की पुढे मालिकांची कामे चालून आली. 
सह्याद्री वाहिनीवर ‘सुकन्या’ ‘पाषण पती’ अशा मालिकात भूमिका मिळाल्या. 

गोंडस चेहरा, अभिनयाचे अंग त्यामुळे ‘जंगल मेहल’  हिंदी चित्रपटात भूमिका मिळाली. यात विदेशी कलाकारासोबत मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. यासोबतच ‘जय मल्हार’ या मालिकेतील ‘चंद्रदेव’ हे पात्र साकारले. त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. खासगी वाहिनीवर ‘महाराष्ट्र जागते रहो’ या शोमध्ये आठवड्यातील चार दिवस शो सुरू असतात, यात संजय यांची भूमिका आहे. 

गिरगावात होतो, तेव्हा कोल्हापर येथे नृत्य शिकायला आलो. माझी चित्रपट सृष्टीत कोणाशीही ओळख नव्हती किंवा नात्यातील कोणी कलाकारही नव्हते, तरीही मी केवळ नृत्यांची आवड अभिनयाचे प्रशिक्षण एवढ्या बळावर मुंबईत गेलो. तिथे स्वतःहून ओळखी करीतच कामे मिळवली, त्यात जिद्दीने कष्टाने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली. 
- संजय पाटील, अभिनेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com