अभिनेता सुबोध भावेचा ट्विटरला रामराम

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 23 September 2020

बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता काही मराठी कलाकारही यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहेत. नुकतंच अभिनेता सुबोध भावेने देखील असाच निर्णय घेतलेला दिसून येतोय.

मुंबई- सोशल मिडियावर गेल्या अनेक महिन्यांपासून  नकारात्मक वातावरण पाहायला मिळतंय. बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता काही मराठी कलाकारही यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहेत. नुकतंच अभिनेता सुबोध भावेने देखील असाच निर्णय घेतलेला दिसून येतोय. सुबोधने ट्विटरवरुन एक्झिट घेतली आहे.

हे ही वाचा:  तापसी पन्नू म्हणाली, 'जर अनुराग कश्यप दोषी आढळून आला तर मी..'  

घराणेशाही, एकमेकांवर आरोप, ट्रोलिंग, अफवा या सगळ्या प्रकारामुळे सोशल मिडियावर सध्या दुषित वातावरण तयार झालं आहे. यामुळेच बॉलीवूडमधून अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियाला रामराम केला तर काहींनी कमेंट सेक्शन बंद केलं, अकाऊंट प्रायव्हेट केलं. सोशल मिडियावरील नकारात्मक वातावरणामुळे आणि सततच्या ट्रोलिंगमुळे अनेक सेलिब्रिटींनी हा निर्णय घेतला आहे. यातंच आता अभिनेता सुबोध भावेने ट्विटरला राम राम केल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत.

सुबोधने नुकतीच एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली. सुबोधने लिहिलंय, 'आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझं ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे. काळजी घ्या ,मस्त रहा! जय महाराष्ट्र जय हिंद'. सुबोधच्या या पोस्टवर त्याचे चाहते कमेंटचा पाऊस पाडतायेत. यातही चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 

सुबोध भावेने ई सकाळशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली. नेमक्या कोणत्या कारणामुळे सुबोधने हा निर्णय घेतला असं विचारलं असता तो म्हणाला, 'सोशल मिडियाचा कंटाळा आला आहे. मी या प्लॅटफॉर्मवर माझं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलो होतो. मात्र सध्या सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठी लोक ज्या काही घाणेरड्या भाषेचा वापर करत बरळत आहेत त्याचा कंटाळा आला आहे. खूप नकारात्मकता तयार झाली आहे. मला अशा वातावरणात राहण्याची जराही इच्छा नाही.'

सुबोधने त्याचं हे अकाऊंट आता काही वेळासाठी डिऍक्टीव्हेट केलंय की कायमचा रामराम केलाय असं विचारलं असता तो म्हणाला 'याबाबत अजुन असं काही ठरवलेलं नाही मात्र सध्या तरी यापासून लांब राहणं पसंत करेन.'सुबोध भावेची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.  

actor subodh bhave exits from twitter says the platform is now full of negativity   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor subodh bhave exits from twitter says the platform is now full of negativity