ग्रामीण बाज कलापूरचा प्राण...!

ग्रामीण बाज  कलापूरचा प्राण...!

मी पन्हाळा तालुक्‍यातील पोहाळे तर्फ आळते गावचा. गावातीलच एका कलाकाराबरोबरच भुयेवाडी (ता. करवीर) येथील जय भवानी नाट्य मंडळासोबत तिटवे येथे स्पर्धेसाठी गेलो होतो. नाटकातील एक कलाकार ऐनवेळी गैरहजर राहिल्याने मला त्याची भूमिका साकारायची संधी मिळाली. स्पर्धेत हे नाटक अव्वल ठरले आणि यानिमित्ताने मीही नाटकाकडं आकर्षित झालो. त्यानंतर मग अनेक नाटकं आणि चित्रपटातून मिळालेल्या भूमिकांचं सोनं केले. शेवटी काय, ग्रामीण बाज हा तर कलापूरचा प्राण आहे... तानाजी बोरचाटे संवाद साधत असतात आणि कमी शिक्षण असूनही या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवता येतो, असेही आवर्जून सांगतात. 

पूर्वी करमणुकीची साधने कमी होती. त्यामुळे ग्रामीण नाटकांना मोठी मागणी होती. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ग्रामीण नाट्य स्पर्धा भव्य प्रमाणात व्हायच्या. त्याला मोठा प्रतिसादही मिळायचा. शासनाच्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेतही ग्रामीण नाटकांसाठी स्वतंत्र विभाग होता. त्यामुळे गावगाड्यातल्या कलाकारांसाठी हीच हक्काची व्यासपीठे होती. बोरचाटे अल्पशिक्षित पण पहाडी आवाज आणि अभिनयाची आवड या त्यांच्या जमेच्या बाजू. दिग्दर्शक पांडुरंग उन्हाळे (पोहाळे) व सिनेस्टार दादा भोसले (भुयेवाडी) यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांनी पहिल्याच तीन अंकी ‘रक्तात न्हाहली प्रीती’ या ग्रामीण नाटकात दौलतराव पाटील ही खलनायकाची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची पसंती मिळवली. त्यानंतर त्यांनी ‘डाकू मानसिंग’, ‘कर्दनकाळ’, ‘वंशाचा दिवा’, ‘भूक मला सौभाग्याची’ या नाटकांतही भूमिका साकारल्या. ‘वारणेचा वाघ’ या नाटकात प्रमुख नायकाची भूमिका केली.

‘सरपंच खूनी पाटील बेईमानी’, ‘डोंगराचा राजा’, ‘जय येळकोट मल्लार’ या नाटकातही त्यांच्या भूमिका होत्या. ‘महिमा जोतिबाचा’, ‘मिंगो’, ‘झाली कृपा जोतिबाची’ या मराठीत चित्रपटातूनही  त्यांनी अभिनय केला. अनेक नाटकातील संवाद त्यांना आजही तोंडपाठ आहेत. केवळ सातवी शिक्षण झालेल्या या कलाकारानं ग्रामपंचायत निवडणूक लढवून सरपंचपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली आहे. 

दूरचित्रवाहिनी, टीव्ही मालिका, मोबाईल यामुळे ही कला लोप पावत चालली आहे. ग्रामीण नाटकाचे प्रमाण हळूहळू कमी होते आहे. पण, पुन्हा त्याला नव्याने बहर येईल, अशी अपेक्षा आहे. 
- तानाजी बोरचाटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com