अस्सं सासर सुरेख बाई, कलापूर माझं...!

संभाजी गंडमाळे
बुधवार, 8 मे 2019

चित्रपट किंवा नाटकातच करियरची सर्वांचीच स्वप्नं पूर्ण होतात असे नाही. अशा कैक जणांना आपापली नोकरी, व्यवसाय सांभाळून या स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतो, तो फक्त कलापूर कोल्हापुरातच. 
- गिरिजा गोडे

मी विट्याची. पण, वडील कोल्हापूर शुगर मिलमध्ये नोकरीला. त्यामुळे सारे लहानपण कोल्हापुरातच गेले. ‘जीवनकल्याण’ची नाटकं पाहतच मोठी झाले. त्यामुळे गाणे आणि अभिनय हा संस्कार तिथूनच रुजू लागला. पुढे विवाहानंतर पुन्हा कलापूरच सासर म्हणून मिळाले आणि ते इतकं सुरेख मिळाले, की गाणे आणि अभिनयातही अनेक संधी मिळत गेल्या. त्या प्रत्येक संधीचे सोने करत गेले...गायिका आणि अभिनेत्री गिरिजा गोडे संवाद साधत होत्या. तुम्हाला जे काही मनापासून करावंसं वाटतं, ते झोकून देऊन करण्याची संधी कलापूर देतं आणि त्यातून मिळणारं समाधान मोठं असतं, असेही त्या आवर्जून सांगतात.

विवाहानंतर त्यांना कोल्हापुरात पहिली संधी मिळाली, ती ‘जागो हिंदुस्थानी’ या कार्यक्रमातून. या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यानंतर ‘संगीत शृंगार वात्रटिका’ हे संगीत नाटकही केले. मात्र, चित्रपटात पहिली संधी मिळाली, ती ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या चित्रपटाच्या निमित्ताने. त्यानंतर मग ‘हिरवं कुंकू’, ‘देवावतारी बाळूमामा’, ‘सवाल माझ्या प्रेमाचा’, ‘आई, तुझा आशिर्वाद’, ‘रझाकार’, ‘आक्रंदन’, ‘भूक’, ‘हंबरडा’, ‘तुझ्यापासून तुझ्यापर्यंत’, ‘सवतीचं कुंकू’, ‘लॅंड १८५७’, ‘मन्नाशेठ’, ‘प्रेमकहाणी’, ‘मेड फॉर इच ऑदर’, सुबोध भावेंबरोबरचा ‘काशिनाथ घाणेकर’ आदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.

‘कोल्हापूर डायरीज्‌’ या आगामी चित्रपटातूनही त्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘पी से पीएम तक’, ‘अनफ्रेंड’ या हिंदी चित्रपटासह ‘क्राईम डायरी’, ‘लेक लाडकी या घरची’ या मालिकांतूनही त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. ‘कागल रंकाळा कागल’, ‘क्रांती’, ‘लाँच’ आणि अनेक महोत्सवांत बक्षिसांची लयलूट करणाऱ्या ‘बलुतं’ या लघुपटातूनही त्यांनी विविध भूमिका साकारल्या. ‘बलुतं’ लघुपटासाठी तर त्यांचं मोठं योगदान लाभलं.

राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातूनही ‘दुसरा मृत्यू’, ‘समिधा’, ‘अशी पाखरे येती’ आदी नाटकांतून त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांचा हा सारा प्रवास विविध कॉलेजमध्ये ॲडमिन ऑफिसर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळत सुरू राहिला. सध्या त्या एका गारमेंट शोरूममध्ये मॅनेजर म्हणूनही कार्यरत आहेत. ‘संस्कारभारती’च्या नाट्य विधा प्रमुख म्हणूनही त्यांनी अनेक नाट्य प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत.  

चित्रपट किंवा नाटकातच करियरची सर्वांचीच स्वप्नं पूर्ण होतात असे नाही. अशा कैक जणांना आपापली नोकरी, व्यवसाय सांभाळून या स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतो, तो फक्त कलापूर कोल्हापुरातच. 
- गिरिजा गोडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Girija Goda interview for Amhi Kolhapuri