मयुरी देशमुख ठरली 'सर्वोत्कृष्ट लेखिका'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

थिएटर आर्ट्समध्ये मास्टर्स केलेल्या मयुरीने पाच वर्षांपूर्वीच हे नाटक लिहिले होते. लिखाणाच्या प्रयत्नाने लिहिलेली तिची ही कथा अनेक दिग्गजांना आवडली.

'डिअर आजो' या नाटकासाठी अभिनेत्री मयुरी देशमुख हिला 'सर्वोत्कृष्ट लेखिका' हा पुरस्कार मिळाला आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे हे नाटक आहे.

हेमंत आपटे निर्मित, अजित भुरे दिग्दर्शित या नाटकात संजय मोने आणि मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली आहे.  परिपक्व संहिता असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच, याव्यतिरिक्त या नाटकाने नुकताच ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेला 'माझा पुरस्कार'ही पटकावला.

या नाटकासाठी मयुरीला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' आणि 'सर्वोत्कृष्ट लेखिका' या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. थिएटर आर्ट्समध्ये मास्टर्स केलेल्या मयुरीने पाच वर्षांपूर्वीच हे नाटक लिहिले होते. लिखाणाच्या प्रयत्नाने लिहिलेली तिची ही कथा अनेक दिग्गजांना आवडली.

परंतु आपल्या लिखाणाच्या आवडीबद्दल मयुरी म्हणते, 'मी थिएटर आर्ट्सला असताना शफात खान आम्हाला नाट्यलेखन शिकवायचे आणि नाट्यलेखन मला खूप मजेशीर वाटले. काहीतरी आव्हानात्मक वाटले म्हणून मी लिखाणाला सुरवात केली.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Mayuri Deshmukh got Best Writer award