esakal | लझानिया लई भारी! : 'मी त्याच्या प्रेमात पडले'
sakal

बोलून बातमी शोधा

लझानिया लई भारी! : 'मी त्याच्या प्रेमात पडले'

लझानिया लई भारी! : 'मी त्याच्या प्रेमात पडले'

sakal_logo
By
शब्दांकन : अरुण सुर्वे

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे नेहमी चाहत्यांच्या चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. ती सोशल मी़डियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. याशिवाय ती तिच्या परखड स्वभावाबद्दलही ओळखली जाते. वेगवेगळ्या उत्सवांच्या निमित्तानं ती आकर्षक वेशभूषा करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. रियॅलिटी शो मध्ये तिच्या निवेदनानं तिला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. तिनं आता एका तिला आवडणाऱ्या पदार्थाविषयी सांगितलं आहे. ती म्हणते, व्हेज लझानिया खूप आवडतो. मुंबईतील बांद्रामध्ये कॅफे आहे, तिथं हा लझानिया उत्तम मिळतो, मी त्याच्या प्रेमात आहे.

लॉकडाउनमुळे आणि लांब असल्याने मी तो फार खाऊ शकले नाही. हा लझानिया माझ्या एका मित्रानी ऑफर केला होता. तो मला खूप आवडला. म्हणतात ना पाहताच क्षणी प्रेमात पडले, तसंच खाता क्षणी मी त्याच्या प्रेमात पडले. मध्यंतरी मी ‘मस्त महाराष्ट्र’ नावाचा शो करत होते, त्यासाठी मी खूप फिरले. ताडोबा अभयारण्यात जात असताना आम्हाला खूप कडकडून भूक लागली आणि एका अतिशय पडक्या खराब ठिकाणी ठेला होता. तिथं मला जगातला सर्वांत स्वादिष्ट ‘आलू बोंडा’ खायला मिळाला आणि त्या प्रवासामध्ये मला विदर्भातले पदार्थ खूप आवडले. अमरावती, नागपूरमधल्या भाज्या मला प्रचंड आवडल्या. मला कुकिंग अजिबात आवडत नाही; पण चहा करायला आवडतो आणि मला मी बनवलेला चहा आवडतो. मला पोळ्या चांगल्या येतात आणि भाकरीही चांगली येते; पण करायला आवडतं असं नाही.

पहिल्या लॉकडाउनमध्ये मला लझानिया खूपच खावसा वाटत होता आणि मी तो युट्यूबवर बघून बनवायचं ठरवलं; पण तीनही वेळा मला जमलंच नाही. एकावेळी तर तो पूर्णच कच्चा राहिला होता आणि एका वेळी ओव्हर कुक झाला आणि सगळ्यांनी मला बडबड केली. कारण, मी सगळ्यांना कामाला लावलं होतं. माझी आई मसाले भात फारच उत्तम करते. त्यातच बदल करून ती माझ्यासाठी आणखी वेगळा मसालेभात करते. त्यात भाज्या भरपूर प्रमाणात टाकते. मी त्यात तूप घालून मस्तपैकी खाते आणि ते आहारासाठीही चांगलं असतं. मी आता पूर्ण शाकाहारी असून, मला शाकाहार प्रमोट करायचा आहे. माझ्या मते, निदान भारतीयांनी शाकाहाराकडे वळावं.

हेही वाचा: प्राजक्ता माळीने कवितेतून दिली प्रेमाची कबुली

हेही वाचा: प्राजक्ता माळी ते अमृता खानविलकर: पाहा मराठी अभिनेत्रींचे टॅटू

loading image
go to top