विद्या बालन साकारणार मायावती?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मार्च 2019

मायावती यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती होत असून या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. आतापर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बायोपिकची निर्मिती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायोपिक प्रदर्शनाच्या मार्गावर आहे तर तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्याही बायोपिकची चर्चा सुरु आहे. यातच आणखी एक नाव आता सामिल झाले आहे, ते म्हणजे बसपा अध्यक्ष मायावती यांचे. 

मायावती यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती होत असून या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 'जॉली एलएलबी' चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. मायावती यांच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींच्या नावांचा विचार सुरू होता, मात्र अखेर विद्या बालनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

चित्रपटाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच या चित्रपटाचे नाव काय असेल किंवा चित्रीकरणाला कधीपासून सुरवात होईल या गोष्टी अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Vidya Balan to play a role of Bahujan Samaj Party President Mayawatis Biopic