
'बाहुबली' प्रभासचा 'आदिपुरुष' लांबणीवर; 'या' तारखेला होणार प्रदर्शित
सैफ अली खान(Saif ali khan) आणि प्रभास(Prabhas)यांच्या बहुचर्चित 'आदिपुरुष'(Adipurush) सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. महाशिवरात्री निमित्तानं या सिनेमाच्या नव्या तारखेची घोषणा सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अभिनेता प्रभासनं ही पोस्ट केली आहे. त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे,''आदिपुरुष हा सिनेमा जगभरातील सिनेमागृहात आता थ्रीडी स्वरुपात '१२ जानेवारी,२०२३' रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. त्यानं ही पोस्ट सिनेमा दिग्दर्शक ओम राऊत,क्रिती सनन,सनी सिंग यांनाही टॅग केली आहे. क्रितीनं देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार,प्रभास या सिनेमात रामाची भूमिका करीत आहे तर सनी सिंग लक्ष्मणाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर क्रिती या सिनेमात सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे. आणि सैफ अली खान रावणाच्या खलनायकी भूमिकेत दिसेल. हा सिनेमा हिंदी भाषेसोबतच तेलगु,तामिळ,मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. खरंतर याआधी 'आदिपुरुष' सिनेमा हा येत्या ऑगस्ट महिन्यात याचवर्षी प्रदर्शित केला जाणार होता. पण 'लाल सिंग चड्ढा' सिनेमानं आपली १४ एप्रिल २०२२ ही प्रदर्शनाची तारीख बदलत नेमकी ११ ऑगस्ट,२०२२ केली आणि सगळा घोळ झाला. कारण ११ ऑगस्ट रोजीच 'आदिपुरुष' प्रदर्शित केला जाणार होता. आमिरनं यासंदर्भात पोस्ट करीत 'आदिपुरुष' टीमचे धन्यवाद मानले होते. कारण आमिर साठी आदिपुरुष टीमनं आपलं प्रदर्शन लांबणीवर टाकायला सहमती दर्शवली होती. 'लाल सिंग चड्ढा' या सिनेमात आमिरसोबत करिना कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
'आदिपुरुष' व्यतिरिक्त प्रभासचेही अनेक सिनेमे पुढे एकामागोमाग एक प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. 'स्पिरीट','राधे श्याम','सलार' अशी त्यांची नावे आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबतही 'प्रोजेक्ट के' या सिनेमात तो दिसणार आहे. अर्थात या सिनेमाचं हे नाव नंतर बदलण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. असो,आता प्रभासच्या चाहत्यांना त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी पुढील वर्षापर्यंत थांबावं लागेल.