अदिती गोवित्रीकर म्हणतेय, 'स्माईल प्लीज'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 May 2019

अभिनेत्री अदिती गोवित्रीकर यांची 'स्माईल प्लीज' मराठी चित्रपटात वर्णी लागली आहे. 

वैविध्यपूर्ण भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अदिती गोवित्रीकर. 2009 मध्ये अदितीने संजय जाधव यांच्या 'रिंगा रिंगा' या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आता लवकरच ती विक्रम फडणीस यांच्या 'स्माईल प्लीज' या दुसऱ्या मराठी चित्रपटात झळकणार आहे. 

विक्रम फडणीस आणि अदिती गोवित्रीकर यांची मैत्री खूप जुनी आहे. आपल्या या मैत्रीबद्दल आणि ही भूमिका कशी मिळाली याबद्दल अदिती सांगते, ''सुरवातीच्या काळात विक्रम नृत्य दिग्दर्शक होता आणि त्याचे शोज मी आवर्जून पाहायचे. तेव्हापासून आमची मैत्री आहे. ज्यावेळी त्याने 'हृदयांतर' हा चित्रपट केला त्यावेळी मला मनापासून वाटायचे, की भविष्यात त्याच्या चित्रपटाचा भाग व्हावा आणि माझी ही इच्छा लवकरच पूर्ण झाली. त्याने मला त्याच्या 'स्माईल प्लीज' या चित्रपटासाठी विचारणा केली.''

मित्रासोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत अदिती म्हणाली, ''ओळखीच्या व्यक्तीसोबत काम करणे नक्कीच सोपे असते. कारण त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी आपल्याला माहित असतात. त्यामुळे अभिनय करणे सहज शक्य होते.''

चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी अदिती म्हणते, ''या चित्रपटाचे कथानकच मुख्य पात्र आहे. या चित्रपटात मी एक महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. वैयक्तिक आयुष्यात मी डॉक्टर असल्याने पडद्यावरही डॉक्टरची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाल्याने मी खूप खुश आहे. माझ्या शिक्षणाचा मला अभिनय करताना खूपच उपयोग झाला. माझी ही भूमिका प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल.'' टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून तिने समुपदेशन हा अभ्यासक्रम घेऊन पदविका संपादित केली आहे. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून सायकॉलॉजीमधून मास्टर्स केले आहे. सध्या ती हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून सायकोलॉजीमध्ये पुन्हा मास्टर्स करत आहे. 'स्माईल प्लीज' हा चित्रपट येत्या 19 जुलैला प्रदर्शित होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditi Govitrikar is selected for smile please marathi film