'ए दिल है..'ची बॉक्‍स ऑफिसवर 35 कोटींची कमाई 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

ए दिल है मुश्‍कील 
दिग्दर्शक :
करण जोहर 
प्रमुख भूमिका : रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्‍वर्या राय बच्चन, फवाद खान 

शिवाय 
दिग्दर्शक :
अजय देवगण 
प्रमुख भूमिका : अजय देवगण, साएशा सेहगल, वीर दास, गिरिश कर्नाड, सौरभ शुक्‍ला 

मुंबई : प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या करण जोहरच्या 'ए दिल है मुश्‍कील' चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. भारतासह परदेशांतही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत 'ए दिल..'ने 35.60 कोटी रुपयांची कमाई केली. 

या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्‍वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेवरून 'ए दिल..' वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध केला होता. 28 ऑक्‍टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 13.30 कोटी रुपये मिळविले होते. परदेशात या चित्रपटाने 41.05 कोटी रुपयांची कमाई केली. 

याच दिवशी अजय देवगणचा 'शिवाय' हा चित्रपटही झळकला होता. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने 28.56 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला 'शिवाय' एकपडदा चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचत आहे, तर 'ए दिल है मुश्‍कील'ला मल्टिप्लेक्‍समध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ae Dil Hai Mushkil box office record