
दिग्दर्शक के. विश्वनाथ यांच्या निधनानंतर 24 दिवसातच पत्नी जयलक्ष्मी यांचे निधन..
K.Jayalakshmi passes away : दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक कासिनाथनि विश्वनाथ म्हणजेच के विश्वनाथ यांचे निधन होऊन महिना पूर्ण झालेला नसतानाच त्यांच्या पत्नी जयलक्ष्मी यांचे निधन झाले आहे. या वार्तेने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी शोकाकुल झाली आहे.
के विश्वनाथ यांचे गुरुवारी २ फेब्रुवारीला निधन झाले होते. त्यांच्या निधनाला २४ दिवस उलटले आणि त्यांच्या पत्नीनेही जगाचा निरोप घेतला आहे. जयलक्ष्मी यांचे २६ फेब्रुवारी रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या.
जयलक्ष्मी या कित्येक वर्षांपासून आजारी होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्राणज्योत मालवली.
सध्या सोशल मीडियावर अभिनेता पवन कल्याण आणि चिरंजीवी यांचा एक फोटो व्हायरल होत आहेत. यात ते दोघेही जयलक्ष्मी यांना भेटायला गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.
दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे गुरुवारी २ फेब्रुवारीला निधन झाले होते. त्यांना वयोमानाशी संबंधित काही आजार होते. त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.
२०१७ मध्ये त्यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन भारत सरकारने सन्मानित केलं होतं. त्यांना कला तपस्वी म्हणूनही ओळखलं जायचं. ते तेलगू दिग्दर्शक असले, तरी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही तेवढीच मोठी भूमिका पार पाडली होती.
तेलुगू दिग्दर्शक के. विश्वनाथ यांच्या पत्नी जयलक्ष्मी या कुरनूल जिल्ह्यातील रहिवाशी होत्या. त्यांचे वडील स्टेशन मास्तर म्हणून काम करत होते. त्यांना २ मुलं आणि १ मुलगी असून त्यांचे लग्न झाले आहे. त्यांना ६ नातवंड आहेत.