"मुख्यमंत्र्यांनी राजू सापतेंच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा"

अभिनेत्री निवेदिता सराफ यांची विनंती
nivedita saraf
nivedita saraf

मराठीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी शनिवारी पिंपरी चिंचवडमधील राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ शूट करत त्यात युनियनच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनंती केली आहे. राजू सापते यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी या व्हिडीओत केली आहे.

काय म्हणाल्या निवेदिता सराफ?

"आज मला हा व्हिडीओ करताना खूप दु:ख होतंय. आमचे कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली. खरंतर कुठल्याही समस्यांवर आत्महत्या हा उपाय असूच शकत नाही. इतक्या प्रतिभावान, इतक्या मनमिळाऊ आणि इतक्या मितभाषी व्यक्तीला हे असं पाऊल का उचलावं लागलं? त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं की युनियन अधिकाऱ्याच्या त्रासामुळे त्यांनी हे पाऊल उचललं. 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेच्या निमित्ताने मी त्यांच्या संपर्कात आले होते. फक्त तीन-चार दिवसांत त्यांनी सेट उभारला होता. महाराष्ट्राबाहेर शूटिंग करावं लागलं, तेव्हा उपलब्ध असेल त्या साहित्यात त्यांनी आम्हाला सेट उभारून दिलं. त्यांच्यासोबत गेल्या पाच वर्षांपासून ही टीम काम करतेय. त्यांनी कधीच कोणाचं पेमेंट थकवलं नव्हतं. मग त्यांच्यावर असे आरोप का केले गेले? या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्याकडे पाच प्रोजेक्ट्स होते. त्या पाच प्रोजेक्ट्समध्ये काम करणारी ३०-३५ माणसं पोरकी झाली. हे सगळं का घडलं? माझी कळकळीची विनंती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना, राज ठाकरेंना, अमेय खोपकरांना, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा तपास केला पाहिजे. राजू सापतेंच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा," असं त्या म्हणाल्या.

nivedita saraf
'यापुढे सेटवर येऊन त्रास दिला तर..'; राजू सापतेंच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक

राजू सापते यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून एकाला अटक केली आहे तर इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजू सापते यांनी 'आंबडगोड', 'मन्या- द वंडर बॉय' यांसारख्या चित्रपटांसाठी तर 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेसाठी कला दिग्दर्शनाचं काम केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com