esakal | 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये मारली गोळी; खऱ्या आयुष्यात पंकज त्रिपाठीने केली अशी मदत
sakal

बोलून बातमी शोधा

pankaj tripathi and vineet kumar singh

'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये मारली गोळी; खऱ्या आयुष्यात पंकज त्रिपाठीने केली अशी मदत

sakal_logo
By
स्वाती वेमूल

स्वत:साठी आणि कुटुंबीयांसाठी औषधांची व्यवस्था होत नसल्याची पोस्ट अभिनेता विनीत कुमार सिंहने सोशल मीडियावर लिहिली. त्याच्या या पोस्टनंतर अभिनेता पंकज त्रिपाठी त्याच्या मदतीला धावून आला आणि त्याला औषधं पाठवली. 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटात सोबत काम केलेल्या कलाकारासाठी पंकजने मदतीचा हात पुढे केला. विनीतने ट्विट करत पंकजचे आभार मानले आणि सरकारविरोधात रागही व्यक्त केला.

'मी वाराणसीत आहे. बाजारात औषध (FabiFlu) मिळत नाहीये. जवळचे लॅब हे गेल्या पाच दिवसांपासून कोरोना चाचणी करू शकत नाहीयेत. आजारी असणाऱ्यांना मी काय देऊ? तुमची वचनं की गर्दीने खचाखच भरलेल्या तुमच्या रॅलींचे व्हिडीओ, जे तुम्ही सतत पोस्ट करत आहात. धिक्कार आहे, स्वार्थ माणसाला आंधळा बनवतो. जागे व्हा, सामान्य माणूस जीव गमावतोय', अशा शब्दांत विनीत कुमारने संताप व्यक्त केला. त्याच्या या ट्विटनंतर पंकजने त्याची मदत केली.

हेही वाचा : सोनू सूदनंतर सुमित व्यास, मनिष मल्होत्रा यांना कोरोनाची लागण

विनीत आणि पंकज यांनी 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात पंकज विनीतला गोळी झाडत असल्याचं एक दृश्य आहे. या दृश्याला आठवत विनीतने पुढच्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'ज्यांना शंका आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की, माझ्या कुटुंबातील काही जण आणि काही माझे मित्र आजारी आहेत आणि मीसुद्धा आजारी आहे. आता औषधं मिळाली आहेत. मदतीसाठी पंकज त्रिपाठी यांचे खूप खूप आभार. माझ्या भूमिकेला सुलतानने वासेपूरमध्ये गोळी मारली होती, पण आता खऱ्या आयुष्यात माझ्यासाठी गोळ्या (औषधं) पाठवल्या आहेत.'

पंकज त्रिपाठी आणि विनीत यांनी नुकतंच 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' या चित्रपटातही एकत्र काम केलं होतं.

loading image
go to top