गलवान वॅलीमध्ये शहीद झालेल्या २० जवानांवर अजय देवगण बनवणार सिनेमा

टीम ई सकाळ
शनिवार, 4 जुलै 2020

अजय देवगणने इतर निर्मात्यांच्या तुलनेत घाई करत भारत चीन सैन्यामध्ये गलवान वॅलीमध्ये झालेल्या झटापटीत शहीद झालेल्या जवानांवर सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई- बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांची देशभक्ती त्यांच्या सिनेमांमधूनही दिसून येते. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता अजय देवगण. अजय देवगणने इतर निर्मात्यांच्या तुलनेत घाई करत भारत चीन सैन्यामध्ये गलवान वॅलीमध्ये झालेल्या झटापटीत शहीद झालेल्या जवानांवर सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 

खुशखबर: '१२ जुलै रोजी नाट्यगृहे सुरु होणार!' या व्हायरल मेसेजचं हे आहे सत्य..

अजय देवगणच्या अधिकृत प्रवक्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजयने अजुन या सिनेमाचं शिर्षक ठरवलेलं नाही आणि सिनेमातील कलाकारांबद्दलही अजुन काही विचार केलेला नाही. सध्या हे देखील ठरलं नाही की या सिनेमात स्वतः अजय काम करणार की नाही ते. अजय हा सिनेमा बनवणार हे कळाल्यापासून या सिनेमात कोणाची मुख्य भूमिका असेल?, कोणते कलाकार पाहायला मिळतील? याचीच जास्त चर्चा आहे. मात्र एवढं नक्की की हा सिनेमा अजय देवगणचं होम प्रोडक्शन अजय देवगण फिल्म्स अंतर्गत बनेल.

या सिनेमाची कहाणी  भारत-चीनमधील सीमेवर झालेल्या झटापटीत शहीद झालेल्या २० जवानांच्या कहाणीवर आधारित असेल. १५ जूनला लडाखमधील गलवान वॅलीमध्ये चीनी सैन्यासोबत भारतीय सैन्याची झटापट झाली होती. यावेळी यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. यानंतर संपूर्ण देशात चीनी सामानावर बहिष्कार घालण्यासाठी सोशल मिडियावर एक आंदोलन सुरु आहे. नुकतंच भारत सरकारने अधिकृतरित्या ५९ चीनी ऍप्लिकेशन्सना भारतात बॅन केलं आहे. 

अजयच्या सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अजय शेवटचा 'तानाजी- द अनसंग वॉरियर' या सिनेमात दिसून आला होता. आता अजय आगामी 'भूज- द प्राईड ऑफ इंडिया' या सिनेमात दिसून येणार आहे. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. या सिनेमात अजयसोबत संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, एमी वर्क, शरद केळकर हे कलाकार मुख्य भूमिकेत असतील. 

ajay devgn announce a film based on martyrdom of 20 indian soldiers in ladakh galwan valley   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajay devgn announce a film based on martyrdom of 20 indian soldiers in ladakh galwan valley