esakal | लग्नाची गोष्ट : ‘टकाटक’ जोडीचा ‘डार्लिंग’ संसार
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Thakur and Vandana Thakur

लग्नाची गोष्ट : ‘टकाटक’ जोडीचा ‘डार्लिंग’ संसार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मराठी चित्रपटसृष्टीत सुरुवातीपासूनच विविध आशयघन चित्रपटांची निर्मिती होत आली आहे. आजही वेगवेगळ्या पण महत्त्वाच्या विषयांना चित्रपट रूपात आणण्याचे काम अनेक निर्माते करत आहेत. निर्मिती क्षेत्रात आपल्या चित्रपटांतून ठसा उमटवणारी जोडी म्हणजे अजय ठाकूर आणि वंदना ठाकूर. ‘तानी’, ‘फुंतरू’, ‘टकाटक’ या वेगळा विषय असणाऱ्या चित्रपटांची निर्मिती अजय ठाकूर आणि वंदना ठाकूर यांनी केली. त्यांच्या लग्नाला लवकरच पंधरा वर्षे पूर्ण होतील.

लग्नापूर्वीपासूनच या दोघांची खूप चांगली मैत्री होती. अजय संकलक होते, तर वंदना वकील. आजही वंदना या चित्रपटांच्या निर्मितीसोबतच वकील म्हणूनही काम करत आहेत. त्यांची स्वतःची लॉ फर्म आहे. २-३ वर्षं एकमेकांना नीट समजून घेतल्यांनतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजय यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘गुजारिश’ या चित्रपटाचं संकलन केलं आहे. या चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यावर संजय लीला भन्साळी यांनी अजय यांना चित्रपट निर्मिती क्षेत्रात येण्याचं सुचवलं. आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो या विचारानं अजय यांनीही चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. वंदना यांनीही अजय यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आणि तिथून त्यांचा चित्रपट निर्मितीचा प्रवास सुरु झाला.

२०१३मध्ये साली प्रदर्शित झालेला ‘तानी’ हा त्यांनी निर्मित केलेला पहिला चित्रपट. अजय म्हणाले, ‘‘मी ‘तानी’ची निर्मिती केल्यावर या चित्रपटाला महाराष्ट्रात पुरेसे स्क्रीन्स न मिळाल्यामुळं आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो होतो. त्यावेळी वंदना ‘आपण हार मानायची नाही, यापुढंही आपण चित्रपट करत राहू,’ असं म्हणत खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. आम्ही दोघं मिळून चित्रपट निर्मिती करतो. वंदना चित्रपटाच्या क्रिएटिव्ह बाजूकडंही लक्ष देते.’’ वंदना यांच्या स्वभावाबद्दल बोलताना अजय यांनी सांगितलं, ‘‘वंदना आणि माझ्या स्वभावात बरच फरक आहे. ती खूप पॉझिटिव्ह, समजूतदार, शांत आहे. वकील असल्यामुळं ती बरीच मॅच्युअरही आहे. ती बोलायला अत्यंत प्रेमळ आणि मनमिळाऊ आहे. तिला विविध गोष्टींचं ज्ञान आहे. मी याच्या बऱ्यापैकी विरुद्ध आहे. परंतु इतकी वर्ष तिच्यासोबत राहून तो शांतपणा, मॅच्युरिटी माझ्यात आली आहे.’’

अजय यांच्याबद्दल बोलताना वंदना म्हणाल्या, ‘‘अजय खूप काळजी करणारे, समजूतदार, कोणत्याही गोष्टीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारे आहेत. त्यांच्या स्वभावानं ते सर्वांना सामावून घेतात. ते स्वतः उत्कृष्ट लेखक, संकलक असल्यानं एखादा विचार समोरच्यापर्यंत कसा पोहोचवायचा, हे त्यांना बरोबर माहिती असतं. कामाच्या बाबतीत ते अत्यंत डेडिकेटेड असतात. त्यांना त्यांचं काम हे परफेक्टच हवं असतं आणि त्यासाठी ते खूप मेहनत घेतात. काम करण्याला ते पहिलं प्राधान्य देत आले आहेत. त्यांच्या कामाप्रमाणंच त्यांनी मला माझ्या कामातही वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. सुरुवातीला मी लॉ ॲडव्हायजर म्हणून एका कंपनीत काम करत होत, परंतु ‘तू स्वतःचं काहीतरी सुरू केलं पाहिजेस,’ असं त्यांनी मला सुचवलं. मात्र, स्वतःची लॉ फर्म सुरू करण्याचा आत्मविश्वास माझ्यात नव्हता. त्यांनी माझ्यात तो आत्मविश्वास निर्माण केला आणि मला प्रोत्साहन दिलं. आमच्या आतापर्यंतच्या सहजीवनाच्या प्रवासात आम्ही अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. या सगळ्यांत त्यांनी ज्या धीरानं सर्व परिस्थिती हाताळली, ते बघता माझ्या दृष्टीनं खरोखरच ते आदर्श पती आहेत.’’

लवकरच ही निर्मात्यांची जोडी आपल्यासाठी ‘डार्लिंग’ हा चित्रपट घेऊन येणार आहेत. त्याबद्दल ते दोघेही फार उत्सुक आहेत. ‘‘गेलं वर्षभर आपण सर्वच कठीण परिस्थितीचा सामना करत आहोत. याकाळात आपलं कुटुंबाचं आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान असतं, हे आपण अनुभवलं आहे. हा चित्रपट यावरच भाष्य करतो. प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवत त्यांचं मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे,’’ असं वंदना यांनी सांगितलं.

- अजय ठाकूर, वंदना ठाकूर

(शब्दांकन - राजसी वैद्य)

loading image