
Akash & Shloka Blessed Baby Girl: अंबानींच्या घरी 'लक्ष्मी' आली..आकाश आणि श्लोका अंबानी यांना कन्यारत्नाचा लाभ..
Akash & Shloka Blessed Baby Girl: देशातील सर्वात श्रीमंत बिझनेसमन मुकेश आणि नीता अंबानी यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचं सेलिब्रेशन करायचं मोठं निमित्त मिळालं आहे. त्यांच्या कुटुंबात एका नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे.
त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका अंबानी हे दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत. त्यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. या दोघांना पहिला मुलगा आहे,ज्याचे नाव पृथ्वी अंबानी असं आहे.
आकाश अंबानीची पत्नी श्लोकानं आज ३१ मे रोजी मुलीला जन्म दिला आहे. बाळाच्या आगमनानं अंबानी परिवारात खुशीचं वातावरण पसरलं आहे.
माहितीसाठी इथं नमूद करतो की, १० डिसेंबर २०२० रोजी श्लोका आणि आकाश पहिल्यांदा आई-बाबा बनले होते. त्यांनी आपलं पहिलं अपत्य म्हणजे मुलगा पृथ्वी अंबानीचं आपल्या आयुष्यात स्वागत केलं होतं. आता मुलीचा जन्म झाल्यानं त्यांचं परफेक्ट चौकोनी कुटुंब पूर्ण झालं म्हणायला हरकत नाही. पृथ्वी अंबानीला आता त्याची लहान बहिण मिळाली आहे.
श्लोका अंबानी ही पूर्वाश्रमीची श्लोका मेहता. मेहता आणि अंबानी यांची मैत्री खूप वर्षांपासून आहे. आकाश आणि श्लोका एका शाळेत शिकले आहेत. १२ वी मध्ये असताना म्हणे आकाशनं श्लोकासमोर आपलं प्रेम कबुल केलं होतं.
परिक्षा संपल्यानंतर त्यानं श्लोकाला प्रपोज केलं होतं आणि तिनं देखील त्याचा स्विकार केला होता. दोघांनी आपलं पुढील उच्चशिक्षण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमधून पूर्ण केलं. पण कायम एकमेकांसोबत राहिले. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर दोघांनी आपलं व्यावसायिक करिअर सुरू केलं आणि त्यानंतर अधिकृतरित्या आपल्या नात्याला सर्वासमोर स्विकारलं अन् लग्नाची घोषणा केली. आकाश आणि श्लोकानं २०१८ मध्ये साखरपुडा केला आणि त्या वर्षात डिसेंबर महिन्यात लग्न केलं.
काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांच्यासोबत श्लोका,आकाश आणि त्यांचा मुलगा पृथ्वी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.
आकाश हा मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा तर अनंत अंबानी हा छोटा मुलगा आहे ,ज्याचं लग्न लवकरच राधिका मर्चंट हिच्यासोबत होणार आहे. मुकेश अंबानी यांना ईशा अंबानी ही मुलगी देखील आहे. आकाश आणि ईशा दोघे जुळी मुलं आहेत.