
ॲना (झोई लिस्टर-जोन्स) आणि बेन (ॲडम पॉली) हे एक अमेरिकन जोडपं आहे. दोघंही वयाच्या तिशीत आहेत आणि त्यांची एकेकाळची स्वप्नं एव्हाना धुळीस मिळाली आहेत.
ऑन स्क्रीन : ‘बॅंड एड’ : वैवाहिक जीवनातील समस्यांवरील सांगीतिक मलमपट्टी
मध्यवर्ती पात्रांच्या वैवाहिक जीवनातील समस्या, घटस्फोटाची टांगती तलवार, त्याला लागून येणारी न्यायालयातील दृश्यं म्हटलं, की तुमच्या डोळ्यांसमोर कुठलं चित्र उभं राहतं? चित्रपटांचे संदर्भ द्यायचे झाल्यास ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ (१९७९), ‘अ सेपरेशन’ (२०११), ‘मॅरेज स्टोरी’ (२०१९), इ. बऱ्यापैकी गंभीर आशय व मांडणी असलेले चित्रपट आठवण्याची शक्यता अधिक आहे; पण अशा गंभीर संकल्पना घेऊन एक मजेशीर सांगीतिका बनवली जाऊ शकते, असा विचार तुम्ही केला आहे का? आज आपण ज्या चित्रपटाविषयी बोलणार आहोत, तो चित्रपट अशाच प्रकारचा आहे.
ॲना (झोई लिस्टर-जोन्स) आणि बेन (ॲडम पॉली) हे एक अमेरिकन जोडपं आहे. दोघंही वयाच्या तिशीत आहेत आणि त्यांची एकेकाळची स्वप्नं एव्हाना धुळीस मिळाली आहेत. दोघांचंही व्यावसायिक जीवन खूप मोठं अपयश ठरलं आहे. लेखिका असलेली ॲना चित्रपट सुरू होतो, तेव्हा उबर ड्रायव्हर म्हणून काम करत असते, तर व्हिज्युअल आर्टिस्ट असलेला बेन घरून काम करण्याचं सोंग घेत रिकामटेकडा बसलेला असतो. त्यांच्या वैवाहिक जीवनाचीही अशीच परिस्थिती असते. अशात हे दोघंही कलात्मक प्रेरणांच्या शोधात असतात. मात्र, दोघांचा बहुतांशी वेळ एकमेकांना शिव्या घालण्यात व भांडण्यात जात असतो. त्यांच्या भूतकाळातील चुका त्यांच्या मानगुटीवर स्वार होऊन त्यांच्या वर्तमानातील सुखात व्यत्यय आणत असतात.

अशाच एके दिवशी दोघं नेहमीप्रमाणे भांडत असताना त्यांना एक कल्पना सुचते, ती म्हणजे त्यांच्या भांडणांना गाण्यांमध्ये रूपांतरित करण्याची. इथून एका मजेशीर अनुभवाला सुरूवात होते. मग घरातील सिंकमध्ये कायम पडून असणारी खरकटी भांडी, ॲनाचा सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू पाहणारा स्वभाव, बेनची आळशी प्रवृत्ती, चांगलं नि आकर्षक दिसण्यासाठी ॲनाचं डाएट करणं आणि बेनचं सुटलेलं पोट, ॲना व बेनचे लैंगिक जीवन अशा एक अन् अनेक बाबी त्यांच्या गाण्यांचे विषय बनतात. त्यांना एकमेकांप्रती वाटणारा राग, प्रेम, मत्सर अशा सर्व भावभावनांचे अंश या गाण्यांमध्ये आढळतात. ही मजेशीर व जोमदार गाणी स्वतंत्रपणे ऐकावीत अशी झाली आहेत.
संगीत हे थेरप्युटिक आहे, असं म्हटलं जातं. या चित्रपटात संगीतनिर्मितीची प्रक्रिया अशाच पद्धतीनं काम करते. ॲना व बेन दोघांच्या मनात खोलवर दाबल्या गेलेल्या भावनांना मोकळी वाट मिळते ती त्यांच्या गाण्यांमधून. त्यांच्या आयुष्यातील दुःखदायक भूतकाळामुळे त्यांच्यावर झालेल्या परिणामांची चर्चा करणं, त्यांस सामोरं जाणंदेखील त्यांना शक्य होतं.
मुख्य भूमिका साकारणाऱ्या झोई लिस्टर-जोन्स हिनंच या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलेलं आहे. झोईनं तिच्या पतीसोबत लिहिलेल्या ‘ब्रेकिंग अपवर्ड्स’ (२००९) आणि ‘लोला व्हर्सेस’ (२०१२) या इतर चित्रपटांप्रमाणे ‘बॅंड एड’चं स्वरूपही आत्मचरित्रात्मक आहे. प्रेमाच्या नात्यातील ताणतणावाकडे एका मजेशीर दृष्टिकोनातून पाहणारा हा सांगीतिक दृक्-श्राव्यानुभव आवर्जून पाहावा असा आहे.
Web Title: Akshay Shelar Writes Band Aid Movie Entertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..