ऑन स्क्रीन : ब्लॅक बर्ड : महत्त्वाकांक्षी हेरगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

black bird serial

गुन्हेगारी विश्वातील सत्य घटनांवर आधारलेल्या मालिका आता प्रेक्षकांना नवीन नाहीत. डेनिस लहेनने निर्माण केलेली ‘ब्लॅक बर्ड’ ही मालिका म्हणजे या विधेतील एक महत्त्वाची भर.

ऑन स्क्रीन : ब्लॅक बर्ड : महत्त्वाकांक्षी हेरगिरी

गुन्हेगारी विश्वातील सत्य घटनांवर आधारलेल्या मालिका आता प्रेक्षकांना नवीन नाहीत. डेनिस लहेनने निर्माण केलेली ‘ब्लॅक बर्ड’ ही मालिका म्हणजे या विधेतील एक महत्त्वाची भर. जी. जेम्स कीनच्या ‘इन वुईथ द डेव्हिल’ नावाच्या संस्मरणावर आधारित आहे.

कीनच्या पुस्तकाच्या शीर्षकात उल्लेखलेला दुष्ट व विकृत मनुष्य म्हणजे लॅरी हॉल (पॉल वॉल्टर हॉजर) हा सिरीयल किलर. अंदाजे १४ किंवा त्याहून जास्त अल्पवयीन मुलींची हत्या करणाऱ्या लॅरी हॉलला एफबीआयने अटक केलेली असली, तरी सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका होण्याच्या शक्यता अधिक असतात. अशात हॉल सुटू नये यासाठी एफबीआयमधील काही अधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. त्यासाठी तुरुंगात एखादा खबरी पेरून हॉलकडून गुन्हा कबूल करून एखादा सबळ पुरावा मिळवण्याचा हेतू असतो. अशात ड्रग्जच्या व्यापाराच्या गुन्ह्यामुळे दहा वर्षांची शिक्षा झालेला जिमी कीन (टॅरन एजर्टन) हा उन्मत्त तरुण आपल्या कामी येईल, असा कयास काही अधिकारी बांधतात. या कामात सफल झाल्यास जिमीला मिळालेली शिक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर मांडलेला असतो. मात्र, हॉलसोबत राहून स्वतःचे मानसिक स्थैर्य अबाधित राखणे, ही जिमीच्या स्वातंत्र्याची किंमत असते. जिथून एका अतिमहत्त्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात होते.

जिमीवर सोपवलेली कामगिरी त्याला वाटते तितकी सोपी नसते. सुरुवातीला हॉलने एफबीआय अधिकाऱ्यांना खरीखोटी माहिती देत कोड्यात टाकण्याचे जे काम केलेले असते, तेच जिमीच्याही वाट्याला येते. मालिकेत जिमीची मोहीम हा मुख्य मुद्दा असला तरी त्यापलीकडे जात इतर काही संकल्पना पाहायला मिळतात. याखेरीज ‘ब्लॅक बर्ड’मध्ये प्रत्यक्ष हिंसा कमी असली तरी हॉलच्या बोलण्यात प्रचंड हिंसा असते. या हिंसेचे आणि हॉलच्या अतिरेकी प्रवृत्तीचे जिमीवर होणारे मानसशास्त्रीय परिणाम, हा कंगोरा इथे आहे. एका हिंसक पुरुषाच्या मनातील किळसवाणे, अंगावर शहारा आणणारे विचार इतक्या जवळून ऐकायला मिळत असल्याने त्याच्यासोबत राहणे जिमीला जवळजवळ अशक्य बनते. कीनच्या पुस्तकातील ‘डेव्हिल’ हा शब्द त्यामुळेच योजिलेला आहे.

मार्टिन स्कॉर्सेसीच्या ‘गुडफेलाज’मध्ये रे लिओटाने साकारलेले मुख्य पात्र हे लिओटाच्या काही प्रभावी आणि कायम स्मरणात राहणाऱ्या भूमिकांमध्ये मोडते. ‘ब्लॅक बर्ड’मधील जिमी कीन लिओटाच्या पात्राच्याच पंखांखाली वाढलेला असावा, इतपत साधर्म्य या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये आहे. शिवाय, मग्रुरी ते हतबलता हा प्रवासही दोन्ही व्यक्तिरेखांमधील समान धागा आहे. लिओटाने ‘ब्लॅक बर्ड’मध्ये साकारलेली (जिमी कीनच्या वडिलांची) भूमिका त्याच्या काही शेवटच्या भूमिकांपैकी एक. त्या अर्थाने स्कॉर्सेसीच्या चित्रपटांतील एक विलक्षणरीत्या परिणामकारक व्यक्तिरेखा ते ‘ब्लॅक बर्ड’मधील हतबल व खचलेला पोलिस अधिकारी हे वर्तुळ फारच समर्पक आहे.

मालिकेचा निर्माणकर्ता डेनिस लहेनने यापूर्वी ‘द वायर’ या लोकप्रिय मालिकेसाठी लेखन केले होते. त्यामुळे त्याच लेखकाचे एक अधिक महत्त्वाकांक्षी व रोचक काम म्हणूनही ‘ब्लॅक बर्ड’ पाहायला हवी.

टॅग्स :Entertainment