ऑन स्क्रीन : शी सेड : महत्त्वपूर्ण गोष्टींचे दस्तावेजीकरण

लैंगिक शोषण व गैरवर्तनाच्या घटनांमध्ये अनेकदा खरे कोण नि खोटे कोण, हे लक्षात येत नाही. अशावेळी ‘ही सेड, शी सेड’, असे म्हणत विषय सोडून द्या असे सुचवले जाते.
She Said Movie
She Said MovieSakal
Summary

लैंगिक शोषण व गैरवर्तनाच्या घटनांमध्ये अनेकदा खरे कोण नि खोटे कोण, हे लक्षात येत नाही. अशावेळी ‘ही सेड, शी सेड’, असे म्हणत विषय सोडून द्या असे सुचवले जाते.

लैंगिक शोषण व गैरवर्तनाच्या घटनांमध्ये अनेकदा खरे कोण नि खोटे कोण, हे लक्षात येत नाही. अशावेळी ‘ही सेड, शी सेड’, असे म्हणत विषय सोडून द्या असे सुचवले जाते. ‘झाले गेले, नदीला मिळाले’ म्हणत प्रत्येक व्यक्ती जबाबदारी झटकण्याचे काम करते. मारिया श्रेडर दिग्दर्शित ‘शी सेड’ या चित्रपटाचे शीर्षक ‘ही सेड, शी सेड’ या प्रसिद्ध उक्तीतील अनावश्यक भाग वगळत चित्रपटातील आशयाशी सुसंगत मुद्दा समर्पक व मार्मिकरीत्या मांडते. जिथे प्रस्थापित जबाबदारी झटकत पुरूषांच्या चुकांवर, गुन्ह्यांवर पांघरूण घालण्याचा भाग बाजूला सारला जातो.

चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेली व्यक्ती आहे अगदी आतापर्यंत हॉलिवुडमधील एक बडे प्रस्थ असलेला हार्वी वाइन्स्टीन हा चित्रपट निर्माता. २०१७मध्ये मेगन टूही व जोडी कॅन्टर या न्यूयॉर्क टाइम्समधील पत्रकारांच्या स्टोरीनंतर केवळ वाइन्स्टीनच नव्हे, तर जगभरातील अनेक पुरूषांच्या गैरवर्तनाच्या घटना समोर आणणाऱ्या ‘#मीटू’ या ऐतिहासिक सामाजिक चळवळीची सुरुवात झाली. श्रेडरने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट टूही व कॅन्टर यांनी त्यांच्या शोधपत्रकारितेच्या मोहिमेविषयी लिहिलेल्या ‘शी सेड’ याच नावाच्या पुस्तकावर बेतलेला आहे.

कथानकातील आशय-विषय फारच संयतपणे मांडणाऱ्या मारिया श्रेडरचा ‘शी सेड’ पाहत असताना ‘स्पॉटलाइट’ (२०१६) आणि ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ (१९७६) या दोन चित्रपटांची आठवण येणे काहीसे स्वाभाविक आहे.

शोधपत्रकारितेचे चित्रण, या पत्रकारांचे अशक्यरीत्या कंटाळवाणे व पुनरावृत्तीने ग्रासलेले काम, नीरस रंगसंगती अशा अनेक आशयविषय व दृश्यविषयक समानता यात येतात. असे असले तरी श्रेडरच्या चित्रपटातून प्रसूत होणारा आशय या चित्रपटांइतकाच महत्त्वाचा आहे. विशेषतः सामाजिक तसेच संस्थात्मक स्तरावर वाइन्स्टीनसारख्या प्रस्थापितांना मिळणारे संरक्षण व न्यायालयीन आश्रय चीड आणणारा आहे. ही चीड अनुक्रमे टूही व कॅन्टरच्या भूमिका साकारणाऱ्या कॅरी मुलिगन व झोई कझॅनच्या कामातून समर्पकपणे व्यक्त होते. ज्यांचे काम चित्रपटाच्या प्रभावात भर घालणारे आहे. विशेषतः गेल्या वर्षी कॅरी मुलिगनने ‘प्रॉमिसिंग यंग वुमन’ हा रंजक चित्रपट केल्यानंतर तिचे या चित्रपटात असणे योग्यच वाटते. ‘प्रॉमिसिंग यंग वुमन’मध्ये लैंगिक शोषण करणाऱ्यांचा सूड घेतल्यानंतर ‘#मीटू’ची सुरुवात करून देणाऱ्या चित्रपटात असण्यातून एक रोचक, सुप्त आंतरसंबंध निर्माण होतो.

वाइन्स्टीन किंवा एकूणच कुणाही व्यक्तीच्या शोषणास बळी ठरलेल्या स्त्रियांच्या वैयक्तिक, व्यावसायिक व सामाजिक आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचेही पुरेसे सखोल चित्रण चित्रपटात येते. याखेरीज ‘या स्त्रिया इतकी वर्षे का बोलल्या नाहीत? आताच का यांना जाग आली?’ या प्रश्नांचीही उत्तरे चित्रपटात पाहायला मिळतात. त्या बोलल्या नाहीत, कारण त्यांना बोलू दिले गेले नाही. शिवाय, त्यांनी पुढे येऊन बोलावे असे सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात व ते अबाधित राखण्यात सामाजिक, न्यायालयीन व संस्थात्मक पातळीवर अपयश आले.

वाइन्स्टीनच्या प्रस्थापित व सामाजिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या प्रबळस्थानी असण्याचे कारण म्हणजे चित्रपटनिर्मिती क्षेत्रातील त्याचे काम. या पार्श्वभूमीवर त्याच्याविषयीची अनेक सत्ये उघडकीस आणणाऱ्या या घटनाक्रमावर एक चित्रपट येणे हेच मुळात फार सरीयल आहे. ज्यामुळे गेल्या दशकातील महत्त्वपूर्ण बातमीदारीवर बेतलेला हा चित्रपट नक्कीच पाहावासा ठरतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com