
‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही गेले अनेक महिने कलर्स मराठीवर सुरू असलेली मालिका खरोखरच प्रेक्षकांच्या मनात भरली आहे.
दिल, दोस्ती : मैत्री खेळकर ‘सुंदरां’ची!
- अक्षया नाईक, गौरी किरण
‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही गेले अनेक महिने कलर्स मराठीवर सुरू असलेली मालिका खरोखरच प्रेक्षकांच्या मनात भरली आहे. यातल्या प्रत्येक भूमिकेला रसिकांकडून भरभरून प्रेम मिळते आहे. या मालिकेमुळं झालेल्या दोन खास मैत्रिणी म्हणजे अक्षया नाईक आणि गौरी किरण. मालिकेच्या वाचनाच्या निमित्तानं त्यांची पहिली भेट झाली होती. त्यांचा स्वभाव, आवडीनिवडी सारख्या असल्यानं थोड्याच दिवसात त्यांची छान मैत्री झाली.
अक्षयानं सांगितलं, ‘गौरी खूप उत्साही आणि उदार आहे. ती कधीच कुणासाठी काही करायला मागंपुढं पाहात नाही. एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज आहे हे कळल्यावर ती आधी त्या मदतीच्या हाकेला धावून जाते. एखाद्या मालिका किंवा चित्रपटातली नायिका जशी बहुगुणी असते, ती घर आणि करिअर उत्तम सांभाळते, सर्व माणसांना जपते, मित्र-मैत्रिणींना छान वेळ देते, सगळ्यांशी प्रेमाने वागते; तशी गौरी माझ्यासाठी खऱ्या आयुष्यातली नायिका आहे. दिसायला तर ती सुंदर आहेच, सगळ्यांशी ती मिळूनमिसळून वागते, ती तिचं घर उत्तमरीत्या सांभाळते, घरासाठी काहीही करायला तिला खूप आवडतं, वेगवेगळे पदार्थ ती उत्कृष्ट बनवते. तिच्याकडून मी बरेच पदार्थ बनवायला शिकले. त्यासोबत तिचं करिअरही ती खूप छान चाललं आहे. घर आणि करिअर या दोन्हीमध्ये ती ज्याप्रकारे समतोल साधते ते मला तिच्याकडून शिकून जोपासायला नक्कीच आवडेल. एक अभिनेत्री व सहकलाकार म्हणूनही बेस्ट आहे. मुळात ती स्वावलंबी आणि मनात असुरक्षितता न बाळगणारी अभिनेत्री आहे. आपलं काम चांगलं होता होता समोरच्याचंही काम कसं चांगलं होईल, याचा ती प्रयत्न करते. तिच्याबरोबर काम करताना मला खूप मजा आली. सेटवर रिकाम्या वेळात आम्ही खूप मजा मस्ती करायचो, ते मी आता खूप मिस करते. पण सध्या ‘तुझ्या रूपाचं चांदनं’ या मालिकेतलं तिचं काम मी बघते आणि मला ते अतिशय आवडतं; कारण खऱ्या आयुष्यात गौरी जशी आहे त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका ती या मालिकेत साकारत आहे. यापुढं कधी संधी मिळाल्यास मला तिच्याबरोबर काम करायला खूप आवडेल.’’
गौरीनं सांगितलं, ‘अक्षयाला भेटण्यापूर्वी मी तिला मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहिलं, तेव्हाच माझ्या मनात तिची आत्मविश्वासू आणि बिनधास्त मुलगी अशी प्रतिमा निर्माण झाली होती. मात्र, आम्ही पहिल्यांदा भेटल्यावर अक्षया खऱ्या आयुष्यात तशीच आहेस हे मला जाणवलं. ती खूप समजूतदार व खंबीर आहे. तिच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ती अत्यंत आत्मविश्वासानं करते. तिला लोकांशी खूप चांगल्याप्रकारे संवाद साधत आपलं म्हणणं मांडता येतं. तिला कुठल्या वेळी बोलावं आणि काय बोलावं हे पक्क माहीत असतं. ती फार दिलखुलास आहे. सगळ्यांमध्ये छान मिळूनमिसळून राहते, प्रत्येक गोष्टीचा ती आनंद घेते. ती भूतकाळात किंवा वर्तमानात रेंगाळत नाही; तर पुढं काय करता येईल याचा ती विचार करते.
सेटवरतीही सिन्सच्या मध्ये तिची भरपूर चेष्टामस्करी सुरू असते. तिच्या अशा स्वभावामुळं सेटवरचं वातावरण नेहमी खेळीमेळीचं राहतं. आमच्या दोघींच्या स्वभावातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघीही कोणाशीही जाऊन बोलू शकतो.
एखाद्या व्यक्तीशी संवाद साधायला आम्हाला ओळखीची गरज नसते. त्यामुळं आमचं कधीच काही अडत नाही. तिच्या अशा स्वभावामुळं तिचा मित्र परिवार खूप मोठा आहे व सगळ्यांशी ती संपर्कात असते. नाशिकला सुरू असलेल्या या मालिकेच्या शूटिंगच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून ती मुंबईत राहणारं तिचं कुटुंब, मित्र-मैत्रिणी यांना भेटत असते. अशातच तिची फिरण्याची आवडही ती अधूनमधून जोपासाते. यासोबतच ती सोशल मीडियावरही स्वतःला सक्रिय ठेवत फॅन्सच्याही संपर्कात असते; यासाठी मला तिचं फार कौतुक वाटतं.’’
(शब्दांकन - राजसी वैद्य)