सहा महिन्यांपासून बंद असलेले चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी द्या; व्यवसायिकांची सरकारकडे मागणी

संतोष भिंगार्डे
Wednesday, 16 September 2020

सरकारने अन्य व्यवसायाप्रमाणे लवकरात लवकर चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी, अशी मागणी सिंगल स्क्रीन तसेच मल्टिप्लेक्सवाल्यांकून केली जात आहे

मुंबई ः महाराष्ट्रातील चित्रपटगृहे बंद होऊन तब्बल सहा महिने झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये काहीही उत्पन्न नसल्यामुळे हा व्यवसाय पूर्णतः कोलमडला आहे. आता हा व्यवसाय सावरायचा असेल तर सरकारने अन्य व्यवसायाप्रमाणे लवकरात लवकर चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी, अशी मागणी सिंगल स्क्रीन तसेच मल्टिप्लेक्स व्यवसायिकांकडून केली जात आहे.

सलमान खानसोबत सिद्धार्थ शुक्ला करणार बिग बॉस १४ होस्ट? 

कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील सगळी चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय सरकारने मार्च महिन्यात घेतला. त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये चित्रपटगृहे सुरू होतील असे वाटलेले होते. परंतु दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत गेला आणि चित्रपटगृहे लवकर सुरू होण्याची आशा मावळली. मध्यंतरी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात चित्रपटगृहे सुरू होतील अशी चर्चा रंगली होती. परंतु आता तब्बल पंचवीस आठवडे झाले आहेत. एक प्रकारे चित्रपटगृह बंद ठेवण्याचा रौप्यमहोत्सव झाला आहे आणि अजूनही सरकारने कोणताही निर्णय याबाबतीत घेतलेला नाही. त्यामुळे आता  सरकार या व्यवसायाबाबत कधी निर्णय घेणार याकडे थिएटर चालक आणि अन्य मंडळींचे लक्ष लागलेले आहे.

अभिनेता संजय दत्त पत्नी मान्यतासोबत खाजगी विमानाने दुबईला रवाना - 

सिनेमा ओनर्स एॅण्ड एक्झीबीटर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार म्हणाले, की गेल्या सहा महिन्यांमध्ये सिगल स्क्रीनवाल्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रोजेक्टर तसेच वीज बिल पाणी बील वगैरे बाबींवर खूप खर्च झाला आहे. त्यामुळे आता सरकारने अन्य व्यवसायाप्रमाणे चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी द्यावी. सरकारची काही नियमावली असेल तर ती पाळली जाईल. अन्य काही देशांमध्ये चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. मग आपल्याकडे सरकार कोरोनावर औषध आल्यानंतर चित्रपटगृहे सुरू करणार की कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आल्यानंतर सुरू करणार....सरकारने याबाबतीतील आपली भूमिका लवकर स्पष्ट करणे आवश्यक आहे. सरकारने लवकर हा व्यवसाय सुरू करावा नाही तर आताच परिस्थिती कठीण झाली आहे आणि पुढे भयानक होईल.

अभिनेत्री जया बच्चन यांच्या सुरक्षेत महाराष्ट्र सरकारने केली वाढ 

मल्टिप्लेक्स असोसिएशनचे सचिव प्रकाश चाफळकर म्हणाले, की सरकारने चित्रपटगृहे कधी उघडायची याची तारीख तरी जाहीर करावी कारण तारीख जाहीर झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस चित्रपटगृहे सुरू करण्यास लागणार आहेत. चित्रपटगृहांची डागडुजी करावी लागणार तसेच सरकारची नियमावली असणार आहे आणि त्याची तयारी करावी लागणार तसेच अन्य काही कामे असणार आहेत. याकरिता पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे.  त्यामुळे सरकारने लवकरात लवकर तारीख जाहीर करावी.  

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allow cinemas that have been closed for six months to start