'तांडव' प्रकरणी अखेर अ‍ॅमेझॉननं मागितली माफी 

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 2 March 2021

तांडव नावाच्या काल्पनिक सीरिजमध्ये काही दृश्य हे आपत्तीजनक असल्याचे नेटक-य़ांचे म्हणणे होते. त्यातून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या.

मुंबई - तांडव मालिकेवरुन गेल्या काही दिवसांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावरुन ते प्रकरण न्यायालयातही गेले होते. त्या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना न्यायालयानं फटकारले होते. त्यावर ती मालिका ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती त्या अ‍ॅमेझॉन प्राईमनं व्हिडिओनं सोशल मीडियावर माफी मागितली आहे. त्यातून त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली आहे. प्रेक्षकांच्या भावना दुखावण्याचा आमचा कुठलाही हेतु नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अ‍ॅमेझॉनच्या वतीने एक अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे की, आम्हाला प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी अतिशय वाईट वाटत आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी तांडव नावाची जी मालिका प्रदर्शित केली होती त्यावरुन मोठ्या वादाला सामोरं जावं लागलं होतं. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील काहींनी त्यावर आक्षेप घेतला होता. न्यायालयात ते प्रकरण गेलं. अखेर न्यायालयानंही निर्माते आणि दिग्दर्शत यांना समज दिली आहे. तांडव नावाच्या काल्पनिक सीरिजमध्ये काही दृश्य हे आपत्तीजनक असल्याचे नेटक-य़ांचे म्हणणे होते. त्यातून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या.

प्रेक्षकांच्या भावनांशी खेळणे असा आमचा कोणताही हेतू नव्हता. सैफ अली खान याची प्रमुख भूमिका असलेली तांडव मालिका अनेकांसाठी टीकेचा विषय झाली होती. ब-याचशा वादानंतर त्या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अली अब्बास जाफर यांनी माफी मागितली होती. त्यानंतरअ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या वतीनंही एक अधिकृत स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. आता आम्हाला प्रेक्षकांना असे सांगायचे आहे की, ज्या प्रसंगावरुन वाद झाला होता ती दृश्ये त्या मालिकेतून काढून टाकण्यात आली आहेत. आम्ही प्रेक्षकांच्या भावनेचा आदर करतो. त्यामुळे त्यांना दुखावण्याची चूक आम्ही करणार नाही.

भारतीय कायद्याचे पालन करुन प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजन सेवा देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा आदर राखत यापुढील काळात योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. अ‍ॅमेझ़ॉन पूर्वी दिग्दर्शक जाफर यांनीही आपला माफीनामा सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांनी सांगितले होते की, ही मालिका पूर्णत; काल्पनिक आहे. मात्र त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांची आम्ही माफी मागतो. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amazon prime video apology for hurting sentiments in web series taandav