
Bookmyshow: 'बुक माय शो'ला मनसे देणार दणका.. अमेय खोपकरांच्या अल्टिमेटम
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे (maharashtra navnirman chitrapat sena) अध्यक्ष अमेय खोपकर (amey khopkar) हे वारंवार कलाकारांच्या पाठीशी उभे असतात. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह , प्राईम टाइम मिळण्यापासून ते त्यांच्या वैयक्तिक अडचणीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्यांना पाठिंबा असतो. असाच पाठिंबा अमेय खोपकर यांनी नाट्य निर्मात्यांना दिला आहे. ते स्वतः चित्रपट आणि नाट्य निर्माते आहेत. शिवाय नाट्यधर्मी निर्माता संघाचेही ते अध्यक्ष आहेत. यंदा त्यांनी थेट बुक माय शो वर निशाणा साधला आहे.
हेही वाचा: 'राज ठाकरे म्हणजे एक अव्वल कलाकार' केदार शिंदे यांची खास पोस्ट
सध्या नाटकाचे तिकीट नाट्यगृहात येऊन घेण्यापेक्षा ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या बुक करण्याचे प्रमाण वाढले आहे. करोना नंतर त्यात विशेष भर पडली. प्रेक्षक कष्ट वाचवण्यासाठी अधिकचे पैसे मोजून 'बुक माय शो' साईटवर तिकीट बुक करतात, पण गेल्या काही दिवसपासून प्रेक्षक आणि निर्माते दोघांनाही अनेक अडचणी येत आहेत. नाटकांची पुरेशी माहिती न मिळणे, एरर येणे, निर्मात्यांना पैसे वेळेत न मिळणे अशा तक्रारी समोर येत होत्या. याकडे बुक माय शो कडून सुधारणा होत नसल्याने निर्मात्यांनी थेट मनसे दरबारात धाव घेतली आहे. (amey khopkar on book my show)
या प्रकरणात अमेय खोपकर यांनी स्वतः लक्ष घातले असून बुकमायशोला पत्र दिले आहे. तसेच या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. अमेय खोपकर म्हणतात, 'बुकमायशो प्रणालीकडून मराठी नाट्यनिर्मात्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय, अशा तक्रारी आलेल्या आहेत. पैसे वेळेवर न मिळणं, नाटकांच्या वेळा आणि नाट्यगृहांची माहिती योग्यवेळी अपडेट न करणं, हे प्रकार बुकमायशो कडून वारंवार होतायत.यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मनसेतर्फे बुकमायशोला सध्या निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणाचा मनसे पद्धतीने पाठपुरावा करू हे ठोस आश्वासन मी निर्मात्यांना देत आहे' असे खोपकर यांनी ट्विट केले आहे.
Web Title: Amey Khopkar Gives Ultimatum To Bookmyshow For Marathi Drama Producers Complaints
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..