
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर मालिकेचे पैसे थकविल्याचा आरोप केला.
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर मालिकेचे पैसे थकविल्याचा आरोप केला. शर्मिष्ठाने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित कामाचे पैसे अजूनही मिळाले नसल्याची तक्रार केली. त्यानंतर मंदार देवस्थळींनीही फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांची बाजू मांडली. आर्थिक परिस्थिती बिकट असून मी खरंच वाईट माणूस नाही, अशा शब्दांत त्यांनी जाहीर माफीदेखील मागितली. आता या प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकर यांनी मध्यस्थी करायचा निर्णय घेतला आहे. अमेय खोपकर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित लवकरच यावर बैठकर करण्याची योजना असल्याचं सांगितलं. त्याचसोबत आपली एकी भंग व्हायला नको, असं आवाहनही त्यांनी केलंय.
काय म्हणाले अमेय खोपकर?
'कोरोनाकाळात मनोरंजन विश्वाला जे आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्याचं गांभीर्य आता सर्वांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. सोशल मीडियावरुन त्याची जाहीर चर्चा करुन काही निष्पन्न होईल, याची शक्यता कमीच आहे. मंदार देवस्थळीसारख्या एकट्या-दुकट्या निर्मात्याला लक्ष्य करुन काही साध्य होणार नाही. मंदारसारखेच इतरही बरेच टीव्ही निर्माते आर्थिक अडचणीत आहेत आणि त्याचा फटका कलाकार-तंत्रज्ञ सर्वांनाच बसतोय. कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे दूर झालेलं नाही. अशा या काळात सामंजस्याने वागून मध्यम मार्ग कसा काढता येईल या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. लवकरच मराठी टीव्ही निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ आणि चॅनल अधिकारी यांच्याबरोबर ‘झूम’ बैठक करण्याची योजना आहे. या परिस्थितीतून तोडगा काढता आला तर चांगलंच आहे, पण त्याहीपेक्षा एकत्र चर्चेनंतर गढूळ वातावरण जरी पूर्ववत झालं तरी पुरेसं आहे. कोरोनामुळे आपली एकी भंग व्हायला नको. एकत्र येऊया आणि या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करुया,' अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
शर्मिष्ठाचे आरोप
चॅनलचा उत्तम सपोर्ट असूनही निर्माते कामाचा योग्य तो मोबदला देत नाही. अनेक कारणं वारंवार मिळतात. कलर्स मराठीने आम्हा कलाकारांना, तंत्रज्ञानांना वेळोवेळी पैसे मिळवून देण्यासाठी मदत केली. परंतु आमच्या निर्मात्याने कोणालाही पैसे दिले नाही, असे आरोप शर्मिष्ठाने केले.
हेही वाचा : अध्ययनच्या आत्महत्येच्या खोट्या वृत्तावर शेखर सुमनचा संताप; मोदींकडे केली तक्रार
मंदार देवस्थळींचं स्पष्टीकरण
'मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचं पेमेंट थकलं आहे. पण मीसुद्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीमधून जात आहे. त्यामुळे आता पैसे देण्याची माझी खरंच परिस्थिती नाही. तुम्हा सगळ्यांचे पैसे परत देईन, पण मला थोडा वेळ हवा. मी खरंच वाईट माणूस नाही. माझी परिस्थिती वाईट आहे', असं त्यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये लिहिलं. मंदार देवस्थळी यांनी 'आभाळमाया', 'वादळवाट', 'अवघाची संसार', 'होणार सून मी या घरची' यांसारख्या गाजलेल्या मालिकांची निर्मिती केली.