शहेनशहानं नव्या वर्षाची लिंबू मिरचीनं काढली दृष्ट

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 15 December 2020

अमिताभ बच्चन यांनी लिंबू मिरची लावून येणा-या 2021 या नव्या वर्षाची दृष्ट काढली आहे.

मुंबई - सरतं वर्ष किती भयानक आणि दु:खदायक गेले आहे याची प्रत्येकाला जाणीव आहे. कोरोनासारख्या आजाराला तोंड देताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. नोक-या गेल्या आहेत. सगळी अर्थव्यवस्था वेगळ्या संकटाचा सामना करत आहे. असे असताना नवे वर्ष सुखासमाधानाचे आणि आनंदाचे असावेत यासाठी चक्क शहेनशहा अमिताभ यांनी देवाकडे प्रार्थना केली आहे.

बॉलीवूडचे महान अभिनेते अमिताभ बच्चन यांनी लिंबू मिरची लावून येणा-या 2021 या नव्या वर्षाची दृष्ट काढली आहे.2020 या वर्षाने अनेक धक्के पचवले. अगदी कोरोनाच्या संकटापासून तर अनेक दिग्गजांच्या निधनापर्यंत या वर्षाने सर्वांची अक्षरश: सत्त्वपरीक्षा घेतली. विशेष म्हणजे अमिताभ यांच्या घरातही कोरानानं शिरकाव केला होता. अशावेळी त्यांनीही योग्य ती काळजी घेतली होती.

मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन हे तिघेही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले होते. याशिवाय चालू वर्षात  अनेक दिग्गज कलाकारांचे निधन झाले. त्यात सुशांत सिंग राजपूत, इरफान खान, ऋषी कपूर यांचे नाव घ्यावे लागेल. सर्वांकरिता त्रासदायक ठरलेले 2020 सारखे वर्ष पुन्हा कुणाच्या वाट्याला येऊ नये यासाठी महानायकानं प्रार्थना केली आहे. 

‘ जर का देवानं आपल्याला असे बनवले आहे तर मग...’

सोशल मीडियावर अमिताभ यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे.  त्यात खाली लिंबू आणि मिरची लटकलेली दिसत आहे. ‘कृपा कृपा कृपा...’ या कॅप्शनसह बिग बींनी हा फोटो शेअर केला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan social media post viral limbu mirchi photo