गोष्ट महानायकाची : अठरा बरस की तू होने को आयी रे

Amitabh
Amitabh

सिनेमाच्या पडद्यावर अमिताभ आणि क्रिकेटच्या मैदानावर सुनील गावस्कर यांच्या बाबतीतील कुठलीही तडजोड आम्हाला मंजूर नव्हती, ते वर्ष होतं १९७९. आम्ही अठराव्या वर्षात प्रवेश केला होता. पुढे गावस्कर निवृत्त झाल्याच्या दुसऱ्याच वर्षी सचिनचा उदय झाला आणि त्या दु:खावर थोडं मलम लागलं, पण अमिताभने तसं दु:ख दिलं नाही. ‘बदला’ चित्रपटापर्यंत त्याची जादू कायम आहे.

अठरा वर्षांच्या आम्हाला अमरावतीच्या तेव्हाच्या श्री (आता जानकी) टॉकीजच्या भव्य पडद्यावर तारुण्याने ओसंडून वाहणारी रेखा आणि दमदार अमिताभचे ‘सुहाग’ चित्रपटातील ‘अठरा बरस की तू...’ हे गाणे बघायला मिळाले आणि आम्ही कावरे-बावरे झालो. त्या दोघांची केमिस्ट्री... हा शब्द अलीकडचा... तेव्हाचा शब्द ‘जोडा फिट्ट’ होता. अंगाला चापून-चोपून बसवलेली सुती नववारी नेसून या गाण्यात नाचलेल्या रेखाचं खरंखुरं वर्णन केल्यास ते सभ्यपणाला धरून होणार नाही.

‘जंजीर’पासून सिनेमात अँग्री यंग मॅन झालेल्या अमिताभवर विनोदी भूमिका करण्याची वेळ पहिल्यांदा आणली होती हृषिकेश मुखर्जीनी ‘चुपके चुपके’ या सिनेमात. या सिनेमात मूळचा इंग्रजी साहित्याचा प्राध्यापक असलेला अमिताभ बॉटनीचा प्राध्यापक असण्याचं नाटक वठवायला जातो आणि धमाल होते. पण तो विषय होता थोडा शिष्ट प्रेक्षकांसाठीचा. अमिताभला विनोदी भूमिकेत क्‍लासेसपासून मासेसपर्यंत भिडेल असा प्रस्तूत केला होता तो मनमोहन देसाईंनी ‘अमर, अकबर, अँथनी’ मध्ये. अँथनीच्या नंतर हिंदी सिनेमातील नियमित विनोदी कलाकारांना अमिताभपायी बेरोजगार व्हायची वेळ आली होती. मनमोहन देसाई तसे मसाला सिनेमाचे यशस्वी दिग्दर्शक होते, तरी प्रतिभा उच्च दर्जाची होती. राज, शशी, शम्मी, रणधीर, ऋषी असे सगळे कपूर आणि राजेश खन्नापासून अमिताभपर्यंत सगळे सुपरस्टार त्यांनी दिग्दर्शित केले होते. अमिताभसोबत अँथनीची त्यांची पहिलीच वेळ होती; पण नंतर विनाअमिताभ सिनेमा त्यांनी बनवला नाही. १९७७ मध्ये ‘अमर, अकबर, अँथनी’ आणि परवरीश, १९७९ मध्ये सुहाग, १९८०- नसीब, १९८३- कुली, १९८५- मर्द इ. ते म्हणत असत की ‘अमिताभ का बैठा हाथी भी सवा लाख का होता है.’

अँथनीप्रमाणेच सर्व तर्क बासनात गुंडाळून तयार केलेला लाँस्ट अँड फाऊंड फॉर्म्युला होता ‘सुहाग’चा. कॅमेऱ्याच्या मागे देसाई आणि पुढे अमिताभ. बाकी सगळं गौण. ‘अठरा बरस की तू’ या गाण्यात मादक नृत्य करणाऱ्या रेखाकडेही लक्ष जाऊ नये इतकं करंटेपण आमच्यात अमिताभप्रतीच्या वेडाने भिनलं होतं. दुसऱ्या सायकलचे पार्किंगचे पंचवीस पैसे वाचवायचे म्हणून आम्ही तिघे मित्र एकाच सायकलवर बसून सिनेमाला जात असू. माझ्या एका मित्राची छाती भर तारुण्यात सरासरीपेक्षा तीन इंच आत होती, तो अमिताभचा असा फॅन की सुरुवातीच्या सेंसॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रापासून सिनेमा पाहायला मिळावा म्हणून अमरावती येथील तीव्र चढावाच्या रेल्वे पुलावरूनही ट्रिपल सीट, सायकलवरून न उतरता तो चालवत राहायचा. त्याच्या छातीच्या भात्यात दम केवळ अमिताभच्या आकर्षणाचा राहत असे. सिनेमा संपून परत येताना मात्र तो सायकलला हात लावत नसे. ‘जाताना अमिताभच्या जोशात होऊन जाते, आता नाही दम पूरत,’ असं म्हणायचा. हा मित्र तसाही उच्च दर्जाचा कलाकार होता. कुठलीही आवडलेली क्‍लिप हजार वेळा मोबाईलवर पाहायची तेव्हा सोय नव्हती. ‘सुहाग’ सिनेमा केवळ एकदा थिएटरमधे पाहून या पठ्ठ्याने ‘अठरा बरस की तू’ या गाण्यात पांढऱ्या शर्टावर काळी नक्षी असलेले, अमिताभने घातलेले शर्ट, जसेच्या तसे साकारले होते. कनिष्ठ महाविद्यालयाच्या गणवेशातील त्याच्याकडे असलेल्या एकमेव पांढऱ्या शर्टाचा त्याने अमिताभच्या प्रेमापोटी बळी दिला होता. ते वैशिष्ट्यपूर्ण शर्ट घालून जेव्हा तो गावभर फिरला, तेव्हा त्याला अमरावतीत ‘सिलेब्रिटी’चा दर्जा प्राप्त झाला होता.

लक्ष्मीकांत-प्यारेलालची दणकेबाज ठेक्‍यातील चाल, मोहम्मद रफी - लता मंगेशकरचे खणखणीत स्वर, आनंद बख्शीचे उडते तरी अर्थपूर्ण बोल, मुंबईतील त्या जमान्यातील कोठ्यावरील मुजऱ्याचा सिनेमॅटिक सेट आणि अमिताभ-रेखाच्या लाजवाब अदाकारीने युक्त असे धमाल नृत्य. भीषण कडकीवर मात करून दोन तीन वेळा आम्ही हा सिनेमा पाहिला, पण इतके वेळा हे गाणे पाहूनही अतृप्तीची हूरहूर मनात राहूनच जात असे.

या टपोरी टाईप गाण्यातील
‘करले हम से मुहोब्बत,
गुजर ना जाये घडीया,
टूटती है पायल तो,
बनती है हथकडिया’
असे अर्थपूर्ण बोलही अमिताभच्या अदाकारीत त्या काळी वाहून जायचे आणि उरायचा तो तना-मनावर राज्य करणारा सुपरस्टार. ‘सुहाग’च्या कथेत सांगण्यासारखं काही नव्हतंच. विचार करायला वेळ न देता ॲक्‍शन, इमोशन्स, ड्रामा, म्युझिक आणि प्रसंगांची गर्दी करणाऱ्या देसाईंच्या सिनेमात या सगळ्या घटकाना दुसऱ्या स्थानावर ढकलून उभा राहायचा अमिताभ. आधी अमिताभ, बाकी सगळं मागाहून. अठरा रिळे अमिताभ पडद्यावर असण्याची अपेक्षा असण्याचा त्या काळात ‘सुहाग’ सुपरहिट न होता तरच नवल. आमची पिढी सिनेमा बघतच नव्हती, केवळ त्यातील अमिताभच बघत होती. ‘अठरा बरस की तू’ म्हणजे निर्भेळ मनोरंजन होतं.
gbdeshmukh21
@rediffmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com