esakal | लग्नाची गोष्ट : सूत्र सुखी संसाराचं...
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta and Dr Arun Rao

लग्नाची गोष्ट : सूत्र सुखी संसाराचं...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मनोरंजन सृष्टीत निर्माते म्हणून काम करत असताना रिस्क ही या व्यवसायातील मोठ्या बाजूची जाणीव असतेच. अशावेळी घरच्या आपल्या माणसांचा पाठिंबा असणं हेही तितकेच महत्त्वाचं असतं. असाच पाठिंबा लोकप्रिय निर्मात्या अमृता राव यांना त्यांचे पती अरुण राव यांचा मिळत आला आहे. अमृता आणि अरुण यांचं लव्ह मॅरेज. त्यांच्या लग्नाला ४२ वर्ष झाली. हे दोघंही कॉलेजमध्ये एकाच वर्गात शिकत होते. अमृता यांनी बीएससी एलएलबी केल्यावर एका कंपनीत नोकरी केली. त्यानंतर २४ वर्ष त्या दूरदर्शनवर बातम्यांचं वाचन करीत होत्या. दूरदर्शन सोडल्यावर याच क्षेत्रात काहीतरी करावं या उद्देशानं त्या चित्रपट निर्मितीकडं वळल्या, तर अरुण हे डॉक्टरेट आहेत. मुंबईत त्यांच्या स्वतःच्या नऊ केमिकल कंपन्या आहेत.

अमृता यांच्याबद्दल बोलताना त्यांचे पती अरुण म्हणाले, ‘‘अमृताचा स्वभाव खूप मनमोकळा आहे. ती मनात काही ठेवत नाही. ती खूप स्पष्टवक्ती आहे. तिच्या या स्पष्ट बोलण्यामुळे लोकांना असं वाटू शकतं, की ती उद्धट आहे; पण तसं अजिबात नाही. ती सगळ्यांना सामावून घेते. प्रत्येक माणसावर तिचा तितकाच जीव असतो. ती खूपच समजूतदार आहे. आम्ही दोघंही प्रत्येक गोष्टीत एकमेकांना स्पेस देतो. दरवेळी आमचं एकमत होतंच असं नाही, पण आम्ही एकमेकांच्या विचारांचा, मतांचा आदर करतो. पावलोपावली आम्ही एकमेकांना पाठिंबा देतो. कोणत्याही विषयावर आम्ही एकमेकांशी मनमोकळं बोलू शकतो आणि एकमेकांना सल्ले देऊ शकतो. कधी कधी मला तिचं म्हणणं त्या क्षणी पटत नाही; पण नंतर विचार केल्यावर तिनं सांगितलेलं बरोबर आहे हे माझ्या लक्षात येतं. मी शून्यातून सगळं उभं केलं आहे आणि या संपूर्ण प्रवासाची साक्षीदार अमृता आहे.’’

अमृता म्हणाल्या, ‘‘त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. ते सगळ्यांना सांभाळून घेतात, सगळ्यांशी मिळूनमिसळून वागतात. त्यांना समोरच्या व्यक्तीची खूप काळजी असते. काळ-वेळ न बघता प्रत्येकाच्या मदतीला ते धावून जातात आणि त्यांची ही बाजू मला विशेष आवडते. ते खूप मेहनती आहेत. त्यांच्या मागं कामाचा एवढा व्याप असूनही माझ्या कामातही ते तितकाच इंटरेस्ट घेतात. ‘कधी अपयश आलं तर खचून न जाता नव्या जोमानं काम करायचं,’ असं म्हणत त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आहे.’’

अमृता आपल्यासाठी ‘श्यामची आई’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. लहानपणी आपल्यातल्या अनेकांनी हे पुस्तक वाचल्यानं या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात खूप उत्सुकता आहे. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘माझं संपूर्ण शिक्षण कानडी भाषेत झालं. पण दूरदर्शनमध्ये काम करत असताना माझ्या वाचनात अनेक मराठी पुस्तकं आली; त्यातीलच एक पुस्तक म्हणजे ‘श्यामची आई’. सध्या मनोरंजन म्हटलं, की आपल्यासमोर क्राईम, मारामारी, रोमान्स, शिव्या या गोष्टी येतात. असे अनेक चित्रपट आपण संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहू शकत नाही. करिअरच्या मागे असलेले पालक आपल्या मुलांना पाळणाघरात किंवा आजी आजोबांकडं ठेऊन कामाला जातात, आपल्या मुलांना द्यायला त्यांच्याकडं पुरेसा वेळ नसतो. त्यामुळं अशा वातावरणात आपण समाजाला काहीतरी चांगलं द्यावं, संपूर्ण कुटुंब एकत्र बसून बघू शकेल असा चित्रपट तयार करावा जो पाहून माझ्या कुटुंबीयांनाही माझा आणखी अभिमान वाटेल असं मला वाटलं आणि मी ‘श्यामची आई’ची निवड केली. ही आई आणि मुलाची सुंदर गोष्ट आहे, जी पाहायला सर्वांनाच आवडेल आणि एक चांगला संदेश यातून दिला जाईल.

- अमृता, डॉ. अरुण राव

(शब्दांकन : राजसी वैद्य)

loading image
go to top