'Chandramukhi' साठी आधी मला विचारणा झाली होती..' मानसी नाईकच्या या दाव्यावर अमृता खानविलकरचा पलटवार Amruta Khanvilkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Khanvilkar Manasi Naik

'Chandramukhi' साठी आधी मला विचारणा झाली होती..' मानसी नाईकच्या या दाव्यावर अमृता खानविलकरचा पलटवार

Amruta Khanvilkar : सध्या प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'पटलं तर घ्या' हा चॅट शो नव्यानं सुरु झाला आहे. यामध्ये सेलिब्रिटी येतात अन् आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्या संदर्भात अनेक खुलासे करताना दिसतात.

नुकतंच या चॅट शो मध्ये अमृता खानविलकर आणि 'आदिपुरुष'चा दिग्दर्शक ओम राऊत येऊन गेले. यावेळी अमृतानं आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत.

चंद्रमुखी या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची नावं चर्चेत होती. यात प्राजक्ता माळी,सोनाली कुलकर्णी,पुजा सावंत,मानसी नाईक अशी नावं होती. त्यात एका मुलाखतीत मानसी नाईकनं मी आणखी चांगली चंद्रमुखी साकारली असती असं म्हटल्यानं वादातीत चर्चा रंगली होती. आता पटलं तर घ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मात्र अमृतानं मानसीच्या दाव्यावर थेट उत्तर देत विषयाला पूर्ण विराम दिला.

अमृताला जेव्हा शो ची अॅंकर जयंतीनं विचारलं की, 'चंद्रमुखी सिनेमासाठी मानसी नाईकला आधी विचारलं होतं,याविषयी तुझं म्हणणं काय आहे?'

त्यावर अमृता म्हणाली, ''फिल्म इंडस्ट्रीत असं अनेकदा घडतं जेव्हा एखाद्या सिनेमासाठी तुम्हाला विचारणा होते खरी पण त्याचं पुढे काहीच घडत नाही आणि काही दिवसांनी तुम्हाला त्या सिनेमात भलतीच अभिनेत्री दिसते. असं माझ्याबाबतीत अनेकदा घडलंय..तसंच मानसी सोबतही झालं असावं''.

पुढे अमृता म्हणाली, ''विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' कांदंबरीचे हक्क २ वर्षापूर्वी अक्षय बर्दापूरकर यांनी विकत घेतले होते. त्याआधी अनेकांनी यासाठी विश्वास पाटील यांच्याकडे विचारणा केली होती. माझं याविषयी मानसीशी काही बोलणं झालेलं नाही. पण मला वाटतंय की इतर कुणीतरी हा प्रोजेक्ट करत असावा आणि मानसीला त्यांच्याकडून विचारणा झाली असावी''.

''पण प्रसाद ओक जेव्हा माझ्याकडे हा सिनेमा घेऊन आला तेव्हा तूच माझी चंद्रमुखी असं त्यानं मला सांगितलं होतं. आणि याबाबतीत मी प्रियंका चोप्राचं एक वाक्य इथे सांगू इच्छिते की,माझ्या आधी कोणाला विचारलं गेलंय किंवा नाही गेलंय,याचा मला काही फरत पडत नाही. मी ते पात्र करते,जेव्हा मी त्या चित्रपटाच्या सेटवर जाते''.

''मी त्या सेटवर गेले..तो रोल केला..'चंद्रमुखी' त्याआधी १०० लोकांनी किंवा दोन-चार लोकांनी प्लॅन केला असेल,याची मला कल्पना नाही...''

'चंद्रमुखी' हा सिनेमा २९ एप्रिल,२०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत होती तर दौलत देशमानेची भूमिका आदिनाथ कोठारेनं साकारली होती.