बदललेल्या ‘ट्रॅक’वरही ‘ट्रेंड’ होत राहिलो

Anand shinde
Anand shindesakal media

संगीत क्षेत्रातील आजवरच्या प्रवासात खुप वेगवेगळे बदल मी माझ्या कारकिर्दीत पाहिले आहेत. या बदलांचा मी साक्षीदार असणे, याचा अभिमान वाटतो. तंत्रज्ञानाने बदल केला असला तरी लाईव्ह वाद्यांना आजही तोड नाही. आधी आमची गाणी भोंग्यावर वाजत; पण आज थरावर थर लागलेल्या डीजेवर वाजतायत, याचं कौतुकही वाटतं. बदलत गेलेल्या प्रत्येक ट्रॅकवर मी माझं गाणं गात राहिलो आणि त्यात ट्रेंडही होत राहिलो.

मी स्वतःला भाग्यवान समजतो की, ॲनलॉगच्या जमान्यात माझी भरपूर गाणी लाईन्स रेकॉर्डिंग होऊन सुपरहिट झाली. आताच्या डिजिटल काळातही बदलत्या ट्रेंडनुसार, बदलत्या साऊंडमध्ये माझ्या गाण्यांवर प्रेक्षकांचे पाय थिरकतात आणि भरभरून प्रेम मिळतं. जेव्हा मी माझं गाणं सुरू केलं होतं तो काळ फार वेगळा होता. तो ॲनलॉग सिस्टमचा जमाना होता. ॲनलॉग सिस्टमवर आजच्यासारखे मल्टिपल ट्रॅक्स रेकॉर्डिंग होत नव्हतं. त्यामुळे गाण्यातील प्रत्येक घटकाला एकत्र येऊन काम करावं लागायचं.

तशाच रिहर्सल व्हायच्या. सर्व वादक, संगीतकार, गायक यांना एकत्रित करून सलग गाणं रेकॉर्ड व्हायचं. त्या काळात एका अल्बममध्ये आठ गाणी असायची. त्यामुळे महिनाभर आधी वादकांसोबत सर्व गाण्यांच्या तालमी व्हायच्या. मग स्टुडिओत जाऊन सर्वांसमवेत एक एक गाणं रेकॉर्ड केलं जायचं. रेकॉर्डिंगमध्ये एकाही कलाकाराची चूक झाली तर सर्वांना पुन्हा पहिल्यापासून गाणं रेकॉर्ड करावं लागायचं. तेव्हा कॉपी पेस्ट हा पर्याय नव्हता. आज जरी तांत्रिकदृष्ट्या साऊंड अधिक पारदर्शक आणि ॲडव्हान्स झाले असले तरी त्याकाळी तशा पद्धतीने गाणी रेकॉर्ड करण्याची मजा औरच होती.

मी तो काळ मनापासून खूप मिस करतो. कारण एका गाण्याशी निगडित सर्व कलाकार एकत्र बसून त्याचा विचार करायचे. प्रत्येकाचं एकमेकांच्या साथीनं, परंतु आपापलं योगदान फार मोलाचं असायचं. कारण त्यातूनच गाण्याला दिशा मिळायची, गाणं खुलायचं! म्हणूनच आजही तो काळ संगीताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो.हळूहळू ॲनलॉगमध्येसुद्धा १९९० नंतर चार ट्रॅक्सवर रेकॉर्डिंग होऊ लागलं. मग आठ ट्रॅक्स आले. त्याचे सोळा झाले आणि आताच्या डिजिटल जमान्यात शेकडो ट्रॅक्समध्ये रेकॉर्डिंग करता येतं. हा आमूलाग्र प्रवास मी स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवला आहे.

मला अजूनही आठवतं, पहिल्यांदा जेव्हा चार ट्रॅक्स आले तेव्हा आम्हाला झालेला आनंद शब्दांच्या पलीकडला होता. कारण आम्हाला कळलं होतं की, आता आपल्याला रिदम आणि मेलडी दोन स्वतंत्र ट्रॅक्सवर रेकॉर्ड करता येईल. त्यावर मुख्य गायकांचे आवाज आणि कोरस असे दोन ट्रॅक्स रेकॉर्ड करता येतील. ॲनलॉगच्या बदलत्या काळात आता आपल्याला स्वतंत्र टॅक्सवर रेकॉर्डिंग करून आणखी चांगला साऊंड मिळणार, याची मजा येत होती. त्यानंतर जेव्हा आणखी प्रगत आठ आणि सोळा ट्रॅक्सच्या मशीन्स आल्या तेव्हा काम सोपं होऊ लागलं. कारण आता एकदा का गाणी तयार झाली की, प्रत्येक कलाकार, वादक आपल्या स्वतंत्र वेळेत स्टुडिओत येऊन आपलं काम रेकॉर्ड करून जाऊ शकत होता.

त्यामुळे काम तुलनेने जलद आणि सोपं होऊ लागलं; परंतु नंतर नंतर सर्वांच्याच हे लक्षात येऊ लागलं की, आता ती एकत्र येऊन महिनोंमहिने एका अल्बमसाठी घेतली गेलेली मेहनत आणि एकत्रित रेकॉर्डिंगची गंमत पुन्हा कधी परत मिळणार नाही. जेव्हा संगीत क्षेत्रातही कम्प्युटरने पदार्पण केलं तेव्हा ॲनलॉग मशीन्सचा काळ मागे पडत गेला आणि मोठमोठ्या मशिन्सची जागा एका लॅपटॉप, कम्प्युटरने घेतली. मग मात्र ही प्रगती कुठे थांबणारी नव्हती.

कालांतराने लाईव्ह मेलडी, रिदमची जागा की-बोर्ड कम्प्युटराईज साऊंडसने घेतली, ज्याला आता आम्ही गाण्याचं प्रोग्रॅमिंग करणं म्हणतो. तिथून खऱ्या अर्थाने लाईव्ह म्युझिक, लाईव्ह रेकॉर्डिंग, लाईव्ह वादन होणं बंद झालं. हा काळ लोककलाकारांसाठी धक्कादायक होता. या बदलत्या प्रामुख्याने पाश्चिमात्य साऊंडशी जाणून घेणं सुरुवातीला कठीण गेलं. पण त्यातून एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे गाण्याचा साऊंड अधिकाधिक श्रीमंत होत गेला आणि प्रेक्षकांनाही माझी गाणी या बदलत्या पद्धतीत आवडू लागली, लोकप्रिय ठरू लागली. त्यामुळे प्रत्येक जण लोकांचा बदलता कल पाहून काम करू लागला.

मी आजही माझ्या प्रत्येक गाण्यामध्ये लाईव्ह वादकांकडून जास्तीत जास्त वाजवून घेण्याचा प्रयत्न करतो आणि कमीत कमी प्रोग्राम्ड साऊंड वापरण्याचा प्रयत्न करतो. कारण लाईव्ह वाद्यांना आजही तोड नाही. आधी आमची गाणी भोंग्यावरती वाजत असत; पण आज थरावर थर लागलेल्या डीजे या साऊंडवर वाजतायत, याचं कौतुकही वाटतं. बदलत्या ट्रेंडनुसार आजही लोकांचं मनोरंजन आपल्या संगीताद्वारे, आवाजाद्वारे मी करतोय आणि ते लोकांना आवडतंय, हे पाहून बरं वाटतं. आजकालच्या आधुनिक पाश्चात्य साऊंडमध्ये संगीतकार माझ्यासाठी गाणी बनवतात, तेव्हा आनंदच होतो. आजकाल लोकांच्या घराघरांत कम्प्युटर आल्यामुळे प्रोग्राम साऊंडच्या मदतीने कुठेही गाणी बनवता येतात. असाही काळ येईल असा कधी विचारही केला नव्हता. ॲनलॉगपासून ते डिजिटल युगात आजही आपलं काम दणक्यात वाजतं याचा मला आनंद आहे.

पूर्वी कवी गाणं लिहायचा, मग संगीतकार चाल लावायचा, मग गाणं गायकाकडे यायचं आणि मग गाण्याला साजेसं असं सगीत संयोजन केलं जायचं. आजकाल आधी चाल केली जाते. मग प्रोग्रामिंग साऊंडच्या मदतीने ट्रॅक बनवला जातो. मग चालीवर शब्द लिहिले जातात. त्यानंतर गायकाला स्टुडिओत बोलवून गाणं ऐकवलं जातं. थोड्याच वेळात ते गाणं बसवून एक-दोन ओळी करत करत कधीकधी अर्ध्या तासात गाणं रेकॉर्डही होतं. थोड्या-फार फरकाने हा सध्याचा ट्रेंड झाला आहे.

खऱ्या अर्थाने आता गाणं बनवणं सोपं झालं आहे. त्यामुळे कधीकधी असंही वाटतं की, पूर्वी चांगल्या चाली बांधण्यावर लोकांचा भर असायचा आणि आता चांगला साऊंड क्रिएट करण्याकडे लोकांचा कल आहे. जे चांगलंही आहे आणि मारकही. या सगळ्या बदलत्या ट्रेंडमध्ये संगीतातला मानवी स्पर्श हरवता कामा नये, एवढचं मला वाटतं. आजकाल हुकलाईनवरही गाणी बनतात, हाही ट्रेंड आत्मसात करतो आहे. एखादा कॅची शब्द घेऊन त्यावर अख्खं गाणं करायचं, हा विचारही हिट होतोय.

पण कधीकधी पाश्चात्य संगीत आणि आपली भारतीय लोकवाद्यं यांचं मिश्रण करून एक वेगळं फ्युजन काही संगीतकार, संगीत संयोजक उत्तमरीत्या साध्य करतात, त्यावेळी त्यांचं मनापासून कौतुकही करावसं वाटतं. या सर्व बदलत्या ट्रेंडसमध्ये एकच वाटतं की, शेवटी संगीत हे प्रवाही असलं आणि बदलत्या काळानुसार गाणं बदलणं स्वाभाविक असलं तरी मेलडीचं महत्त्व कमी होऊ नये. गाण्याच्या भावना हरवू नयेत. कारण पुढे जाताना ही सांगड घालणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com