esakal | उर्दूचा गोडवा | Urdu Kavali
sakal

बोलून बातमी शोधा

Pralhad Shinde and Anand Shinde
उर्दूचा गोडवा

उर्दूचा गोडवा

sakal_logo
By
आनंद शिंदे

वडिलांमुळे मला उर्दू कव्वालीची ओढ लागली. त्यानंतर उर्दू भाषेने माझा सांगीतिक प्रवास समृद्ध झाला. माझा मुलगा आदर्श शिंदे यालाही उर्दू भाषेचा लहजा, शायरी आणि गझल याविषयी खास आवड निर्माण झाली आहे. हा प्रवास असाच आमच्या पिढ्यांमध्ये सुरू राहील...

माझे वडील एक उत्तम कव्वाल होते. तबल्याची तालीम वडिलांकडून घेत असताना त्यांच्या कव्वाल्यांच्या ठेक्याची आणि उर्दू कव्वाल्यांची ओढ लागली. तिथून मलाही उत्तम उर्दू गाणी गाता यावी, यासाठी माझे प्रयत्न सुरू झाले. सुरुवातीच्या काळात तबल्याची तालीम पूर्ण झाल्यानंतर कव्वाल परवीन सबा यांना मी घुंगरू-तबल्याची साथ करू लागलो. त्या दरम्यान त्यांच्यावर उर्दू गायकीने प्रभावित होऊन पुन्हा एकदा उर्दू भाषा आवर्जून शिकण्याची इच्छा प्रबळ झाली. मग त्या काळच्या मोठ्या उर्दू कव्वालांना साथ करून त्यांच्याकडून उर्दूचे धडे घ्यायला लागलो.

वडील प्रल्हाद शिंदे यांची ‘उड जायेगा एक दिन पंछी...’ एक कव्वाली सुपरहिट झाली. वडिलांची ही आणि अशा असंख्य कव्वाल्या आपल्याला योग्य आणि स्पष्ट उर्दू उच्चारांसोबत गाता यायला हव्यात, यासाठी माझ्या गोरेगावच्या घराशेजारी राहणाऱ्या उर्दू शिक्षकेकडून मी उर्दू भाषेचे धडे घ्यायला लागलो. अशाप्रकारे अगदी शालेय शिस्तीप्रमाणे उर्दू पहिली आणि दुसरी असं करत उर्दू भाषेचा पुस्तकी प्रवास सुरू झाला. म्हणजेच गाण्यातून आणि उर्दू बोलीतून कानांवर होणाऱ्या भाषेचा संस्कारापलीकडे मी अभ्यास सुरू केला. यातूनच वडिलांची उर्दू गाणी माझ्या कार्यक्रमांमध्ये मी गाऊ लागलो. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद बघून स्वतःची उर्दू गीते तयार करण्याला सुरुवात केली.

माझ्या उर्दू गाण्यांना त्या काळात कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. अशा उर्दू गाण्यांचा मी अल्बम प्रसारित करायला सुरुवात केली. त्यातील काही गाणी म्हणजे ‘बाबा ताजुद्दीन करम हो’, ‘ख्वाजा तो हमारा हमारे है’, ‘एक तीर दो शिकार’, ‘सोलवाह सावन’, ‘हो निगाहे करम’, ‘मेरे करम अली बाबा’, ‘आशिकाना कव्वाली’, ‘हटके लगा दुकान’ अशी असंख्य गाणी आणि अल्बम्स सुपरहिट झाली. एकीकडे माझी मराठी भीमगीते आणि बुद्धगीते सुपरहिट होत असतानाच तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उर्दू भाषेतूनही मी गावेत, अशी लोकांची फर्माइश येऊ लागली. त्यामुळे मी भीमगीते आणि बुद्धगीतांचे उर्दू भाषेतील अल्बम्स गाऊ लागलो. तेही तितकेच लोकप्रिय ठरले. त्यातील काही गाणी म्हणजे ‘एकता दिखाओ’, ‘हम भीमवाले तुफानों से डरते नहीं’, ‘पिपल की छाँव में’, ‘दिवाने जय भीमवाले’, ‘भीम फर्मान’, ‘भीम का नाम लिये जा.’ आता इतक्या वर्षांनंतरही यातील काही गाणी मी टीव्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांसमोर सादर केली. त्याला तितकाच प्रतिसाद आणि प्रेम मिळालं. याचा मला फार आनंद आहे.

माझ्या गायकीत मी उर्दूसारखी मधाळ भाषा जोडू शकलो. त्यामुळे केवळ उर्दू गाणीच नव्हे तर माझ्या संपूर्ण सांगीतिक प्रवासाला समृद्धता प्राप्त झाली. हा माझा उर्दू भाषेचा जिव्हाळा फक्त माझ्यापुरता मर्यादित नाही राहिला. माझा मुलगा आदर्श शिंदे यालाही उर्दू भाषेचा लहजा, शायरी आणि गझल याविषयी खास आवड निर्माण झाली. याचेच फळ म्हणून त्याला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला, तोही एका गझलसाठीच! ती गझल म्हणजे ‘ऐ सनम.’ माझ्या वडिलांपासून मिळालेला हा उर्दू भाषेचा वसा आता माझ्या मुलानेही घेतला आहे आणि हा प्रवास असाच आमच्या पिढ्यांमध्ये सुरू राहील, त्याचे मला एक कलाकार म्हणून समाधान आहे.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

loading image
go to top