मृण्मयी देशपांडे करणार सूत्रसंचालन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

सर्वांची लाडकी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे "युवा सिंगर, एक नंबर'  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. 

"युवा सिंगर, एक नंबर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या "एक नंबर' गोष्टी पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. "झी युवा'वरील या गाण्याच्या स्पर्धेत गायिका सावनी शेंडे हिच्यासह अभिनेता वैभव मांगले हे परीक्षकाची भूमिका बजावणार आहेत. राज्यातील निरनिराळ्या भागांतून आलेल्या तरुण गायकांची ही स्पर्धा नेमकी कशी असेल, हे पहिला एपिसोड पाहिल्यावरच प्रेक्षकांना समजणार आहे. सर्वांची लाडकी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. 

मालिका किंवा चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापेक्षा सूत्रसंचालन अधिक आव्हानात्मक असते, हे मृण्मयी आवर्जून नमूद करते. प्रेक्षक, स्पर्धक आणि परीक्षकांमधील दुवा साधण्याची कला अवगत असणे यासाठी गरजेचे असते. तिच्या सूत्रसंचालनाची पद्धत, स्वाभाविक शैली, स्पर्धकांना तिच्याकडून मिळणारे प्रोत्साहन, यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे. ही भूमिका उत्तमरीतीने पार पाडण्यासाठी व "युवा सिंगर्स'च्या मंचावर "एक नंबर' धुमाकूळ घालण्यासाठी ही अभिनेत्री सज्ज झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anchoring will be done by Mrunmayee Deshpande