अभिनेत्री अनुजा साठे करणार आता "ब्लॅकमेल' 

तेजल गावडे  
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री अनुजा साठे करणार आहे "ब्लॅकमेल'

हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री अनुजा साठे "बाजीराव मस्तानी'नंतर "ब्लॅकमेल' या हिंदी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झालीय. त्यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा... 

"ब्लॅकमेल' चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली? 
- रमेश देव प्रोडक्‍शन (आरडीपी) बरोबर मी "तमन्ना' ही मालिका केली होती. तिथली कास्टिंग डिरेक्‍टर मला व्यक्तिशः ओळखते. तिने मला एके दिवशी "ब्लॅकमेल' चित्रपटाच्या ऑडिशनसाठी फोन केला. तिने मला या चित्रपटाबद्दल बाकी काहीच सांगितलं नाही. फक्त एवढंच म्हणाली की, एक हिंदी चित्रपट आहे आणि यात मुख्य भूमिकेत अभिनेता इरफान खान आहे. माझी काय भूमिका आहे, याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती; पण आरडीपीसारख्या इतक्‍या मोठ्या प्रॉडक्‍शनकडून फोन आला म्हणून मी ऑडिशनला गेले. तिथे अभिनय देव दिग्दर्शक आहे हे कळलं. या सिनेमासाठी माझ्या तीन ऑडिशन झाल्या. तिसऱ्या ऑडिशननंतर मला फायनली सिलेक्‍शन झाल्याचा कॉल आला. त्या वेळी मला खूप आनंद झाला. त्यानंतर मला या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगण्यात आलं. ते ऐकल्यानंतर माझा आनंद द्विगुणीत झाला. कारण माझी भूमिका चित्रपटात महत्त्वाची आहे. 

"ब्लॅकमेल' चित्रपट आणि भूमिकेबद्दल काय सांगशील? 
- हा ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे आणि या चित्रपटातील प्रत्येक पात्र कथानकासाठी महत्त्वाचं आहे. प्रत्येक पात्राला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. या चित्रपटात मी प्रधा घाटपांडेची भूमिका साकारलीय. ही महाराष्ट्रीयन कुटुंबातील मुलगी आहे. मी इरफान खान जिथे काम करतो. त्या ऑफिसमध्ये नवीन जॉबला लागलेली असते. ती महत्त्वाकांक्षी, प्रचंड हुशार मुलगी आहे. एक वेळ अशी येते की तिला काही सिक्रेट्‌स कळतात आणि तिचा सीनियर इरफान असतो. त्याला ती ब्लॅकमेल करते. त्यामुळे इरफानच्या टेन्शनमध्ये आणखीन भर पडते. असा माझा मजेशीर रोल आहे. ही भूमिका करायला खूप मजा आली. माझा जास्त परफॉर्मन्स हा इरफान खान, प्रद्युमन सिंग आणि ओमी वैद्यबरोबर आहे. इतक्‍या चांगल्या कलाकारांसोबत काम करायला खूप मजा आली. 

इरफान खानसोबतचा अनुभव कसा होता? 
- पहिल्यांदा इरफान सोबत काम करताना मी खूप नर्व्हस झाले होते. माझ्या डोक्‍यात इरफान खान म्हणजे सीरियस ऍक्‍टर अशी इमेज होती. त्यांच्यापुढे मी नवीन कलाकारच होते. माझ्याकडे फक्त टेलिव्हिजनचा अनुभव पाठीशी होता; पण चित्रपट माध्यम आणि त्यात अनुभवी प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करण्याचा माझा तसा हा पहिलाच अनुभव. "बाजीराव मस्तानी'त मी काम केलं होतं; पण त्यात माझं छोटंसं पात्र होतं. "ब्लॅकमेल'मधील माझं पात्र महत्त्वाचं असल्यामुळे महत्त्वाचे सीन्स होते. त्यामुळे मी खूपच नर्व्हस होते; पण इरफान खानसोबत काम करण्याचा माझा अनुभव अप्रतिम होता. कारण ते प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करतात. त्यामुळे ते कधी काय करतील याचा नेम नाही आणि त्यात तुम्हाला तुमचाही परफॉर्मन्स चांगला हवा असेल तर तुम्हाला काम करताना खूप लक्ष द्यावं लागतं. अशा मोठ्या कलाकारांसोबत सादरीकरण करत असताना कलाकार म्हणून तुम्ही स्वतःला खूप चॅलेंज करत असता. त्यांच्यासोबत काम करताना मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मी त्यांच्या कामाचं बारकाईनं निरीक्षण केलं. एकूणच मजा आली. 

तू आता हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर होण्याचा विचार करतेयस का? 
- अजिबात नाही. "ब्लॅकमेल' प्रदर्शित झाल्यानंतर माझा जॉन अब्राहमसोबतचा "परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' नावाचा हिंदी सिनेमा प्रदर्शित होणारेय. ज्यात मी जॉनसोबत दिसणारेय. या दोन्हीमध्ये माझ्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिका आहेत. अजून मी एक मराठी चित्रपट करतेय. त्याचं नाव आहे "मी पण सचिन.' स्वप्नील जोशी, प्रियदर्शन जाधव आणि अभिजित खांडकेकर असे कलाकार यात आहेत. असं काही नाही की आता मी फक्त हिंदीमध्येच काम करणार. माझी मातृभाषा मराठी आहे आणि माझ्या करिअरला सुरुवात मी मराठी इंडस्ट्रीतून केलीय. नक्कीच मला एकेक पायरी चढत करिअरमध्ये यश संपादन करायचंय. हिंदीतही मला काम करण्याची इच्छा आहे आणि मी करेनही. 

सहकलाकार म्हणून जॉनबद्दल काय सांगशील? 

- जॉन अब्राहम हा सुपरस्टार आहे. तो खूप साधा व गोड मुलगा आहे. जॉन अब्राहम एण्टरटेन्मेंट प्रॉडक्‍शनचा "परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' हा चित्रपट आहे. हा चित्रपट 1998 साली पोखरणमध्ये झालेल्या अणुचाचणीवर आधारित आहे. मला हा चित्रपट करताना जॉन स्टारडम कॅरी करतोय असं कुठेही वाटलं नाही. त्याच्यासोबत काम करताना मी खूप सहज वाटलं. सेटवर हसतखेळत चित्रीकरण झालं. त्यामुळे आता हिंदीतील दोन वेगळे अनुभव मिळाले. मला या दोन संधी मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. 

Web Title: Anuja sathe play role in blackmail movie interview