'अब किसी की खैर नही'; ६५ वर्षीय अनुपम खेर यांची  फिट बॉडी पाहून चाहते अवाक्!

स्वाती वेमूल
Monday, 22 February 2021

अनुपम खेर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील त्यांची शरीरयष्टी पाहून चाहते अवाक् झाले आहेत. 

आपल्या दमदार अभिनयासाठी व बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे अभिनेते अनुपम खेर हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. कधी फोटो, व्हिडीओ पोस्ट करत तर कधी एखाद्या मुद्द्यावर आपलं मत मांडत ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. मात्र त्यांनी नुकताच पोस्ट केलेला एक फोटो पाहून, वय हा केवळ आकडा आहे, असं तुम्हीसुद्धा म्हणाल. ६५ वर्षीय अनुपम खेर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील त्यांची शरीरयष्टी पाहून चाहते अवाक् झाले आहेत. 

व्यायाम करण्यासाठी सज्ज झालेल्या अनुपम खेर यांनी दोन मोनोक्रोम फोटो पोस्ट केले आहेत. 'त्या व्यक्तीला हरवणं कठीण आहे, जो कधीच हार मानत नाही, सही जा रहा हूँ ना?', असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. या फोटोंमध्ये त्यांचे दंड व व्यायाम करून फिट झालेली त्यांची शरीरयष्टी पाहून नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एकाने त्यांना 'बाहुबली' अशी उपमा दिली तर दुसऱ्याने 'अब किसीकी खैर नाही' अशी मजेशीर कमेंट केली. तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात, असंही काहींनी म्हटलंय. अनुपम खेर यांच्या या फोटोला लाखांमध्ये लाइक्स मिळाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

हेही वाचा : 'एक जमाना था जब हम भी..'; लहान भावाच्या जन्मानंतर तैमुरवरून भन्नाट मीम्स व्हायरल 

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या अनुपम खेर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली होती. गेल्या वर्षी त्यांनी एक पुस्तकसुद्धा लिहिलं होतं. या पुस्तकात त्यांनी कोरोनो महामारी आणि इतर काही घटनांचा उल्लेख केला होता. अनुपम खेर, त्यांची आई दुलारी खेर आणि भाऊ राजू खेर यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर या तिघांची प्रकृती ठीक झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anupam Kher leaves fans drooling over his toned upper body see pic